कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्याकडून ऐरोली रुग्णालयीन सुविधांची पाहणी
कोव्हीड रुग्णसंख्येतील वाढीच्या पार्श्वभूमीवर नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी टेस्टींगमध्ये वाढ करण्याचे निर्देश विशेष आढावा बैठकीत दिले होते. त्याचप्रमाणे कोव्हीड आऱोग्य सुविधाही सुसज्ज राखण्याचे निर्देशित करण्यात आले होते. या अनुषंगाने आयुक्तांनी ऐरोली येथील महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयाला भेट देत आरोग्य सुविधेची बारकाईने पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. वर्षा राठोड तसेच शहर अभियंता श्री. संजय देसाई आणि इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्तांनी मागील काही दिवसातील कोव्हीड टेस्टींग संख्येचा तपशील रजिस्टरमधून तपासला तसेच रूग्णालयात उपचारासाठी येणा-या सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या आयएलआर व सारी रुग्णांची कोव्हिड टेस्टिंग होत असल्याबाबत खातरजमा करून घेतली. कोव्हीड टेस्टींगवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी वैद्यकीय अधिक्षकांना दिल्या.
आयुक्तांनी आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार वाशी, नेरूळ व ऐरोली रूग्णालयात फ्ल्यू ओपीडी सुरू करण्यात आलेली आहे. आयुक्तांनी ऐरोली रूग्णालयातील फ्ल्यू ओपीडीचीही पाहणी करून तेथील तपासणी व उपचार पध्दतीची पाहणी केली.
सद्यस्थितीत कोव्हीड लक्षणे सौम्य स्वरुपाची असल्याने टेस्ट कोव्हीड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवले जात आहे. 7 दिवसाचा गृह विलगीकरण कालावधी असून या काळात कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन रुग्णाकडून केले जात असल्याबाबत स्थानिक नागरी आरोग्य केंद्रामार्फत लक्ष ठेवले जावे व तशा सूचना संबंधित रुग्णांना व कुटुंबियांना देण्याच्या सूचना आयुक्तांमार्फत पुन्हा देण्यात आल्या.
कोव्हीड रुग्णांसाठी आरोग्य सेवेची सज्जता ठेवण्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी आढावा बैठकीत सूचित केले होते. त्यानुसार ऐरोली रुग्णालयात पुरुष व महिला कोव्हीड रुग्णांकरिता प्रत्येकी 20 बेड्सची क्षमता असलेले कोव्हीड उपचारार्थ कक्ष राखीव ठेवण्यात आलेले आहेत. याकरिता आवश्यक मेडीसीन व ऑक्सिजन सुविधेचीही व्यवस्था करण्यात आली असून त्याची प्रत्यक्ष पाहणी व आढावा यावेळी आयुक्तांनी घेतला.
या पाहणी दौ-यात आयुक्तांनी सर्व ओपीडी टेस्टींग, डायलेसीस सेंटर, प्रसुती व इतर सर्व वॉर्ड्स, अभिलेख कक्ष, उपहारगृह, निर्जंतुकीकरण विभाग अशा विविध सुविधा कक्षांना भेटी देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. रजिस्टर तपासणी करून रुग्णसेवेची संख्या जाणून घेतली. त्याचप्रमाणे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांच्या महापालिका आरोग्य सेवेविषयीचे अभिप्राय व सूचना जाणून घेतल्या.
सध्या सगळीकडेच कोव्हीड रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून नागरिकांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे असे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळल्यास त्वरित महानगरपालिकेच्या रूग्णालयात व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रास भेट देऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा व उपचार करून घ्यावेत असे सूचित करीत कोव्हीड टेस्ट करून घेण्याचेही आवाहन केले आहे.
Published on : 14-04-2023 09:11:25,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update