नमुंमपा आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांच्या निर्देशनानुसार नवी मुंबईत कोव्हीड 19 टेस्टींगवर भर
कोव्हीड 19 रुग्णसंख्येची होत असलेली वाढ लक्षात घेऊन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी कोव्हीड विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी तपासणी, विलगीकरण व उपचार या त्रिसूत्रीच्या अनुषंगाने कार्यवाहीचे निर्देश आढावा बैठकीत दिले होते. त्यानुसार कोव्हीड 19 टेस्टींग वाढ करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले असून सद्यस्थितीत दररोज 2 हजारहून अधिक कोव्हीड 19 चाचण्या केल्या जात आहेत.
सर्दी, खोकला व तापावरील उपचारासाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयात अथवा नागरी आरोग्य केंद्रात येणा-या लक्षणे असलेल्या आजारी व्यक्तींची कोव्हीड 19 टेस्ट केली जात असून आयएलआर आणि सारी रुग्णांचीही कोव्हीड 19 टेस्ट केली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची 23 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे व 4 रुग्णालये या ठिकाणी कोव्हीड 19 टेस्ट्स केल्या जात असून नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयातील आरटी-पीसीआर प्रयोगशाळा 24 तास पूर्ण क्षमतेने कार्यांन्वित आहे. या ठिकाणाहून आरटी-पीसीआर टेस्टचे रिपोर्ट 24 तासाच्या आत संबधित व्यक्तीस एसएमएस संदेशाव्दारे लिंक पाठवून उपलब्ध करून दिले जात असून कोव्हीड 19 पॉझिटिव्ह रुग्णांना 5 दिवसांचे विलगीकरण सूचित करण्यात येत आहे.
कोव्हीड 19 रुग्ण्संख्येची आसपासच्या शहरात वेगाने होणारी वाढ लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण आरोग्य यंत्रणेने सतर्कता राखण्याची गरज लक्षात घ्यावी आणि टेस्टींगवर भर द्यावा व कोव्हीड प्रतिबंधात्मक पावले उचलावीत असे निर्देश सर्व वैदयकिय अधिका-यांना देतानाच नागरिकांनीही कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक नियमांचे विशेषत्वाने गर्दीच्या ठिकाणी व रुग्णालयात जाताना पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
Published on : 17-04-2023 16:02:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update