*जागतिक वसुंधरा दिन स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण कार्यक्रमांतून उत्साहात साजरा*
आज जगभरात ‘वसुंधरा दिन’ साजरा केला जात असून महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियाना’मध्ये राज्यातील सर्वप्रथम क्रमांकाचे पर्यावरणशील शहर म्हणून मानांकन लाभलेल्या नवी मुंबई शहरामध्येही लोकसहभागातून नवी मुंबई महानगरपालिकेने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.
जागतिक वसुंधरा दिनी आज सकाळी 7 वाजल्यापासूनच नवी मुंबई महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत लेट्स सेलिब्रेट फिटनेस आणि रबाळे येथील क्रोडा केमिकल कंपनी याच्या सहयोगाने आयोजित विशेष उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिक वाशी येथील मिनी सी-शोअर परिसरात एकत्र जमले. या पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या परिसरात स्वच्छतेची मोहीम राबविली आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला.
मानवाच्या दृष्टीने पृथ्वीचे नैसर्गिक पातळीवर जतन करणे ही काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन आजच्या जागतिक वसुंधरा दिनी पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा स्वकृतीतून संदेश प्रसारित करण्याच्या दृष्टीने मिनी सी-शोअर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या उपक्रमात नवी मुंबई महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, स्वच्छता अधिकारी श्री. सुधीर पोटफोडे, उद्यान अधिकारी श्री. भालचंद्र गवळी, क्रोडा उद्योगसमुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मुरली दिऊर, लेट्स सेलिब्रेट फिटनेसच्या अध्यक्ष श्रीम. रिचा समीत तसेच स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक, सफाईमित्र आणि संस्था व उद्योगसमुहाचे कर्मचारी आणि स्वच्छताप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी सर्वांनी सामुहिक शपथ ग्रहण करीत वसुंधरा रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावर घेण्याचा निश्चय केला.
Published on : 22-04-2023 10:26:02,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update