जागतिक हिवताप दिनानिमित्त नवी मुंबईत आरोग्य विभागाने राबविले विविध उपक्रम
नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग साथीचे आजार नियंत्रणात आणण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत साप्ताहिक वेळापत्रकानुसार डास अळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण कार्यक्रम राबविण्यात येतो. त्यासाठी प्रभावी किटकनाशक व अळी नाशकांचा वापर करण्यात येतो. याशिवाय बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी प्रत्यक्ष भेटीव्दारे तापाचे रुग्ण शोधून त्यांचे रक्तनमुने घेण्यात येतात. प्रयोगशाळा तपासणीअंती दूषित रुग्ण आढळल्यास त्यांना योग्य ते उपचार दिले जातात. तसेच दूषित रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी सभोवतालच्या 100 मीटर परिसरात रुग्ण संशोधन कार्यवाही करुन हिवताप नियंत्रण करण्यात येते.
या अनुषंगाने केंद्र व महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ‘शून्य हिवताप रुग्ण’ या उद्दिष्टानुसार दि. 25 एप्रिल 2023 रोजी जागतिक हिवताप दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावर्षी जागतिक हिवताप दिन 2023 करिता जाहीर करण्यात आलेल्या “हिवतापाला झिरो करू, माझ्यापासून सुरूवात करू” या घोषवाक्यास अनुसरुन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदशनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या 23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रांतर्गत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माइकिंगव्दारे हिवतापासंबंधी व्यापक जनजागृती करण्यात आली. प्रभात फेरीमध्ये एएनएम, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर व रासायनिक धुरीकरण आणि फवारणी कामगार यांचा मोठया संख्येने सहभाग होता.
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रामध्ये विविध ठिकाणी प्रदर्शने व हिवताप शिबीरांचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये नागरिकांना हिवतापाच्या प्रसाराबाबत प्रदर्शन संचाव्दारे हिवताप विषयक प्रभावी माहिती देण्यात आली. तसेच डासांच्या अळयांचे आणि गप्पी माश्यांचे प्रात्यक्षिक दाखवून डास अळया कशा ओळखाव्यात याबाबत माहिती देण्यात आली. या शिबीरामध्ये 3192 लाभार्थ्यांनी लाभ घेतला व 347 रक्तनमुने घेण्यात आले
हिवताप दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये नागरिकांना हिवताप प्रतिबंधासाठी महत्वाच्या सूचना देण्यात आल्या. यामध्ये -
Ø गच्चीवरील, घराच्या परिसरात भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंटया, रंगाचे डबे, पाण्याच्या बाटल्या, घरावरील टाकलेले प्लास्टिक, कुंडयाखालील ताटल्या यामध्ये पाणी साचून डास अंडी घालतात त्यामुळे अशा निरुपयोगी वस्तू नष्ट करणे.
Ø फुलदाण्या ट्रे, फेंगशुई, कासवाची मुर्ती ठेवण्याकरीता वापरण्यात येणारे पाणी आठवड्यातून एकदा बदलणे.
Ø शक्य झाल्यास डास प्रतिबंधात्मक मच्छरदाणीचा वापर करणे.
Ø आपल्या घरी येणा-या आरोग्य कर्मचा-यांमार्फत व महापालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये / नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तापाच्या रुग्णाची मोफत रक्त तपासणी करुन घेणे.
Ø आपले घर, कार्यालय, व परिसरात पाणी साचू न देणे.
Ø साचलेल्या पाण्यामध्ये डास अंडी घालतात, त्यामुळे घरामधील व घराबाहेरील पाणी साठविण्याचे ड्रम / टाक्या / भांडी अशी पाणी साठवण्याची ठिकाणे, पिंप व इतर भांडी आठवडयातून एक दिवस पूर्णपणे कोरडी करुन आठवडयातील एक दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून पाळणे.
त्याचप्रमाणे हिवताप दिनानिमित्त नागरिकांना हिवतापाच्या लक्षणांविषयी अवगत करण्यात आले. यामध्ये - थंडी वाजून ताप येतो, ताप थोडा वेळ टिकतो, ताप कमी होताना घाम येऊन उतरतो, तापाबरोबर खूप डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, थकवा इत्यादी लक्षणांविषयी माहिती देण्यात आली.
आगामी पावसाळा कालावधी लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाने जागरुक राहून आपल्या घरात व घराभोवताली परिसरात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच हिवतापाची लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या महानगरपालिका रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्यावेत आणि महानगरपालिकेमार्फत आपल्या घरी भेटी देणा-या हिवताप कर्मचा-यास सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर, यांनी केले आहे.
Published on : 25-04-2023 16:41:21,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update