स्वच्छताकर्मींसाठीच्या आरोग्यासाठी योग उपक्रमात पद्मश्री शंकर महादेवन यांच्या अचानक उपस्थितीने आनंदयोग
सेक्टर 29, वाशी येथील राजीव गांधी उद्यान. सकाळी 7.30 ते 8.00 च्या दरम्यानची वेळ. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी विभागातील स्वच्छतामित्रांसाठी ‘स्वच्छतेतून आरोग्य व आरोग्यसाठी योग’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले. ‘सहजयोग मेडिटेशन’ संस्थेचे योग प्रशिक्षक श्री. चंद्रशेखर खेरोडकर यांच्याकडून योगाचे धडे घेतले जात होते. महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता मित्रांच्या आरोग्यपूर्ण जीवनासाठी राबविला जात असलेला अभिनव उपक्रम म्हणून महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचीही याप्रसंगी आवर्जून उपस्थिती. स्वच्छताकर्मींसमवेत आयुक्त व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि इतर अधिकारी, कर्मचारीही उत्साहाने योगप्रशिक्षणात सहभागी झालेले. उद्यानाच्या निसर्गरम्य वातावरणात एकाग्र झालेले.
आणि अशावेळी अचानक उद्यानात मॉर्नींग वॉकसाठी आलेले श्री. शंकर महादेवन सहज कुतुहल म्हणून याठिकाणी काय चालले आहे हे बघण्यासाठी येतात, जरावेळ थांबून निरीक्षण करतात. स्वच्छ नवी मुंबई मिशनचा प्रत्यक्ष ब्रॅंड ॲबेसेडरच तेथे योगायोगाने आलेला पाहून योग उपक्रमाचा माहौलच बदलून जातो.
कोणताही अभिनिवेश न आणता पद्मश्री शंकर महादेवन योग शिबिराच्या दिशेने पुढे येतात आणि गर्दीत सहभागी होत आपुलकीने सगळ्यांना भेटतात. याप्रसंगी दोन शब्द बोलण्याची त्यांना विनंती केली जाते. तेही सहजपणे माईक हातात घेऊन उपस्थितांशी संवाद साधू लागतात.
उद्यानाच्या शेजारीच रहात असल्याने अधूनमधून उद्यानात चालण्यासाठी येत असतो. आज आलो तर उद्यानात गर्दी दिसली आणि माझा फोटो असलेले बॅनर दिसले. त्यामुळे पुढे येऊन पाहतो तर आपल्या स्वच्छताकर्मींचा योग कार्यक्रम सुरु असलेला दिसला आणि मग रहावले नाही. नवी मुंबई महानगरपालिेकेला आजवर राज्यात, देशात जे बहुमान लाभले त्यामध्ये सर्वात मोठा वाटा ऊन,पाऊस,थंडीची पर्वा न करता शहर स्वच्छतेसाठी झटणा-या स्वच्छताकर्मींचा आहे. अशा आपल्या स्वच्छतामित्रांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका योग शिबिर आयोजित करीत आहे ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट असल्याचे श्री. शंकर महादेवन सांगतात. योग शिबीराचे औचित्य साधून ते स्वयंप्रेरणेने गायत्रीमंत्र म्हणायला सुरुवात करतात. त्यानंतर उद्यानातले सकाळचे प्रसन्न वातावरण ‘सूर निरागस हो’ या अभिजात स्वरांनी ते भारून टाकतात. कोणत्याही संगीत साथीशिवाय त्यांनी अंत:प्रेरणेने उजळलेला निरागस स्वर हा योगामुळे एकाग्र झालेल्या उपस्थितांच्या प्रफुल्लीत मनाला भावतो. मग श्री. शंकर महादेवन यांच्यासह आयुक्त श्री. राजेश नार्वेकर, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अधिकारी – कर्मचारी आणि योग उपक्रमात सहभागी स्वच्छताकर्मी व उत्सुकतेने जमलेल्या उपस्थित नागरिकांसह सर्वच जण ‘निश्चय केला - नंबर पहिला’ असा एकमुखाने घोष करतात.
योगाचे महत्व निरोगी जीवनासाठी अत्यंत मोठे असून नवी मुंबई महानगरपालिका आपल्या स्वच्छतामित्रांच्या आरोग्य जपणूकीसाठी योगाचा आधार घेऊन प्रत्येक विभागात योग शिबीर आयोजित करीत असल्याचे यावेळी महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सांगितले. याआधी बेलापूर, नेरूळ व ऐऱोली या विभागांमध्ये अशा प्रकारची योग शिबीरे झाली असून आजच्या शिबिरात जगप्रसिध्द गायक, संगीतकार व नवी मुंबई स्वच्छ मिशनचे ब्रॅंड अँबेसेडर श्री. शंकर महादेवन यांची अकल्पित उपस्थिती सुखावणारी व प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी आयुक्तांनी व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महिला स्वच्छताकर्मींसाठीही विभागाविभागांत सभागृहांमध्ये अशा प्रकारचे योग प्रशिक्षण उपक्रम राबविण्याचे नियोजन असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी पद्मश्री शंकर महादेवन यांना कोणतेही निमंत्रण नसताना त्यांनी उपक्रम सुरु असलेल्या ठिकाणी कुतुहलापोटी उपस्थिती दर्शविली व स्वयंस्फुर्तीने यामध्ये सहभागी झाले त्याबद्दल आभार व्यक्त केले. यावर श्री. शंकर महादेवन यांनी नवी मुंबई शहराचा नागरिक म्हणून शहराविषयी असलेले आत्मिक प्रेम प्रकट करीत महानगरपालिकेच्या कोणत्याही उपक्रमात व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आवर्जुन उपस्थित राहीन असे सांगितले.
अशाप्रकारे स्वच्छता मित्रांसाठी वाशीतील राजीव गांधी उद्यानात ‘स्वच्छतेतून आरोग्य व आरोग्यासाठी योग’ या स्उपक्रमात पद्मश्री शंकर महादेवन यांची योगायोगाने उपस्थिती व त्यांनी पारंपारिक योग प्रकारांना स्वरयोगाची दिलेली जोड या उपक्रमाला आनंदयोग बहाल करणारी ठरली.
Published on : 26-04-2023 12:25:21,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update