वसुंधऱा रक्षण व संवर्धनाच्या संदेशाचे पथनाट्यातून हसतखेळत प्रसारण

22 एप्रिल या अर्थ दिवसापासून 29 एप्रिल पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने माझी वसुंधरा अभियान 4.0 अतर्गत अर्थ आठवडा साजरा करून पर्यावरणाची जपणूक व संवर्धन करणारे विविध उपक्रम राबविणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभाग क्षेत्रात पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यावर भर दिला जात असून यामध्ये व्यापक लोकसहभाग घेतला जात आहे. या अंतर्गत पथनाट्यासारख्या लोकप्रिय माध्यमातून जनजागृती केली जात आहे. रेल्वे स्टेशन, बस डेपो, मार्केट परिसर, मॉल, वर्दळीची ठिकाणे अशा विविध जागी पथनाट्य सादर करून निसर्गाच्या पंचतत्वांचे रक्षण व संवर्धन करण्याविषयीचा संदेश मनोरंजक माध्यमातून प्रसारित केला जात आहे.
आज सीवूड ग्रॅड सेंट्रल मॉल मध्ये आतील मोकळ्या पॅसेजमध्ये तसेच मॉल समोरील मोठ्या चौकात पथनाट्यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. दैनंदिन जीवनातील गोष्टींवर भाष्य करीत निसर्गाच्या पंचतत्वांशी असलेले मानवी जीवनाचे नाते आणि त्यांच्या संरक्षणासाठीची असलेली जबाबदारी याविषयी या पथनाट्यातून जागृती आणली जात आहे. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने पथनाट्य पहात दाद दिली. आरंभ क्रिएशनच्या पथनाट्य कलावंतांनी अत्यंत प्रभावी सादरीकरण करीत वसुंधरा रक्षण संवर्धनाचा संदेश हसत खेळत प्रसारित केला.
अशाच प्रकारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वर्दळीच्या ठिकाणी या पथनाट्यांचे सादरीकरण केले जाणार असून नागरिकांमध्ये वसुंधरा रक्षण व संवर्धनाचा संदेश प्रसारित केला जाणार आहे.
Published on : 28-04-2023 13:37:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update