महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कौल आळी, घणसोली येथे 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' कार्यान्वित
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चे ऑनलाईन लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते, उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री ना. डॉ. तानाजी सावंत आणि इतर मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत संपन्न झाला.
राज्यभरात आजपासून सुरू होत असलेल्या 317 आपला दवाखान्यांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कौलआळी, घणसोली येथील आपल्या दवाखान्याचा समावेश आहे. या दवाखान्यामध्ये एलईडी स्क्रीनवर ऑनलाईन लोकार्पण समारंभाचे थेट प्रक्षेपण प्रदर्शित करण्यात आले होते. याप्रसंगी नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण व डॉ. वैशाली म्हात्रे, डॉ शिवलता सिंग तसेच कार्यकारी अभियंता श्री. मदन वाघचौडे, श्री. प्रवीण गाडे, घणसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. संजय तायडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते घणसोली येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अनौपचारिकरित्या फीत कापून सुरू करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सर्वसामान्य लोकांना उत्तम आरोग्य सुविधा त्यांच्या कामाच्या वेळेचा विचार करून उपलब्ध करून देण्याचा हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. कष्टकरी श्रमिकांना अनेकदा आपल्या कामाच्या वेळेत औषधोपचारासाठी दवाखान्यात जाणे शक्य होत नाही, त्यामुळे त्यांच्या कामाच्या वेळेनंतरही त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून या आपला दवाखानाची वेळ दुपारी 2 पासून रात्री 10 वाजेपर्यंत लोकांना सुविधाजनक अशी दिलासा देणारी असल्याचे ते म्हणाले.
आपला दवाखाना अंतर्गत बाह्यरुग्ण सेवा, मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार, टेलीकन्सल्टेशन / मल्टी स्पेशालिटी, गर्भवती मातांची तपासणी, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, एक्स-रे साठी संदर्भ सेवा अशा विविध 7 प्रकारच्या सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार सात प्रकारच्या तज्ञ सेवाही उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केलेल्या कोविडमुळे आरोग्य व्यवस्था सक्षमीकरणाचा धडा आपण शिकलो या विधानाचा आधार घेत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी कोविड काळात नवी मुंबई महानगरपालिकेनेही आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाकडे विशेष लक्ष दिल्याचे नमूद केले. आज घणसोली येथे सुरू होणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रमाणेच दिवाळेगाव आणि शिरवणे, जुईनगर या ठिकाणीही शहर आरोग्यवर्धिनी केंद्र महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सुरू होत असल्याचे सांगत एक प्रकारे आरोग्य सेवेचा विस्तार होत असल्याचे आयुक्तांनी विशेषत्वाने नमूद केले.
Published on : 02-05-2023 06:38:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update