फोन पे व्दारे सर्वाधिक तिकीट वितरण करणा-या एनएमएमटी वाहकांचा सन्मान

आजच्या आधुनिक तंत्रस्नेही युगात अनेक गोष्टींत झपाट्याने बदल होत असून ऑनलाईन डिजीटल अर्थव्यवहाराला कमालीचे महत्व आले आहे. त्यानुसार बदलत्या काळाचा वेध घेत नवे तंत्रज्ञान आत्मसात करून त्या ज्ञानाचा आपल्या संस्थेला फायदा करून देणा-या कर्मचा-यांचा आजच्या महाराष्ट्र दिनी व कामगार दिनी सत्कार होत असल्याचा आनंद व्यक्त करीत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते एनएमएमटी बसेसमध्ये ‘फोन पे’ चा प्रभावी वापर करून जास्तीत जास्त कॅशलेस तिकीट वितरित करणा-या 6 वाहकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या ॲम्फिथिएटरमध्ये संपन्न झालेल्या या विशेष कार्यक्रमाप्रसंगी महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे व श्रीम. सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन नार्वेकर, परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश कडुस्कर, शिक्षणाधिकारी श्रीम. अरूणा यादव, मुख्य वाहतुक अधिकारी श्री.अनिल शिंदे, वाहतुक अधिक्षक श्री. सुनील साळुंखे, लेखा अधिकारी श्री. प्रशांत सकपाळ, कनिष्ठ अभियंता श्री. तुषार गरूड, फोन पे चे राष्ट्रीय मुख्य अधिकारी श्री. राकेश कुमार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
फोन पे व्दारे कॅशलेस प्रणालीचा वापर करून एनएमएमटी बसेसमध्ये जानेवारी 2022 पासून तिकीट वितरण करण्यास सुरूवात झालेली असून जानेवारी 2022 मध्ये 4 हजार इतका असणारा अर्थव्यवहार (Transaction) एक वर्षातच जानेवारी 2023 पर्यंत 16 हजाराहून अधिक झालेला आहे. तसेच फोन पे व्दारे तिकीट वितरणाची रक्कम जानेवारी 2022 मध्ये 26 लाखाहून अधिक होती, ती आता जानेवारी 2023 पर्यंत 1 कोटी 8 लाखाहून अधिक झालेली आहे. यामध्ये ऑनलाईन प्रणालीचा प्रभावी वापर करणा-या वाहकांच्या नवे तंत्रज्ञान शिकून ते अंमलात आणण्याच्या मनोभूमिकेचा व कार्यप्रणालीचा महत्वाचा वाटा असून फोन पे च्या वतीने मागील वर्षभरात फोन पे व्दारे सर्वाधिक तिकीट वितरण करून ऑनलाईन अर्थव्यवहार (Transaction) करणा-या 6 वाहकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते फोन पे व्दारे तिकीट वितरण करून सर्वाधिक वार्षिक ऑनलाईन अर्थव्यवहार (Transaction) करणारे एनएमएमटी वाहक श्री. शिवाजी देवकर, श्री. राजेंद्र पाटील, श्री. मयूर नायकोडी या 3 वाहकांना रू. 21 हजार रक्कमेची धनादेश भेट तसेच सर्वाधिक सहामाही ऑनलाईन अर्थव्यवहार (Transaction) करणारे वाहक श्री.दिपक दराडे, श्री. शंकर गवते, श्री. दिलीप पवार या 3 एनएमएमटी वाहकांना विशेष भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले.
आधुनिकतेची कास धरणा-या व नवे तंत्रज्ञान शिकू पाहणा-या एनएमएमटी वाहकांच्या चांगल्या कामाची दखल फोन पे मार्फत घेण्यात आली असून त्यामधून त्यांना प्रोत्साहन मिळेलच याशिवाय इतर वाहकांनाही यामधून आणखी चांगले काम करण्याची स्फुर्ती मिळेल असा विश्वास आयुक्तांनी याप्रसंगी व्यक्त केला. मा. पंतप्रधान महोदय, मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतील कॅशलेस सोसायटीच्या दिशेने हे सकारात्मक पाऊल असल्याचाही उल्लेख आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी याप्रसंगी केला.
Published on : 02-05-2023 11:08:22,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update