बहुमजली वाहनतळाचे काम जलद पूर्ण करून नागरिकांना पार्कींग सुविधा उपलब्ध करून देण्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे निर्देश
झपाट्याने विकसित होत असलेल्या शहरांमध्ये पार्कींग ही मोठी अडचण असून यावर तोडगा काढण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या जातात. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पार्कींग नियोजनासाठी सिडकोकडे महानगरपालिकेमार्फत वारंवार पाठपुरावा केला जात आहे. या अनुषंगाने सिडकोमार्फत पार्कींग सुविधेकरिता सीबीडी बेलापूर विभागात 2 आणि वाशी विभागात 1 भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
यापैकी सेक्टर 15 बेलापूर येथील भूखंड क्र. 39 वर बहुमजली वाहनतळ (Multistorage Parking) विकसित करण्यात येत असून या कामाची प्रत्यक्ष पाहणी करताना पुढील 3 महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिले.
या बहुमजली वाहनतळात 476 चारचाकी वाहने व 121 दुचाकी वाहने पार्कींग करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून सेक्टर 15 येथील कै. नागा गना पाटील उद्यानासमोरून पूर्व दिशेला वाहनतळात येण्यासाठी प्रवेशव्दार ठेवण्यात आलेले आहे. या वाहनतळातून बाहेर जाण्यासाठी पश्चिम दिशेला प्रवेशव्दार व्यवस्था आहे.
वाहनतळाच्या पूर्वेकडील बाजूस दर्शनी भागात मोठी भिंत असून त्या भिंतीवर डिजीटल बोर्ड लावून जाहिरातीसाठी सुविधा उपलब्ध करून देणे शक्य आहे काय याची सर्व बाजूंनी पडताळणी करण्याचे निर्देश आयुक्तानी परवाना विभागाला दिले. याव्दारे महानगरपालिकेस उत्पन्न मिळू शकते. याशिवाय वाहनतळावर दर्शनी ठिकाणी पार्कींगच्या सद्यस्थितीतील उपलब्धतेबाबत डिजीटल बोर्डवर माहिती प्रदर्शित करण्यात यावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
आगामी काळात इलेक्ट्रीकल वाहनांची संख्या वाढणार असून त्यादृष्टीने पुरेशा प्रमाणात चार्जींग स्टेशनची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
वाहनतळाच्या लगत महावितरणाचे इलेक्ट्रीकल सबस्टेशन असल्याने त्याचा विचार करूनच व त्यानुसार इमारतीच्या आराखड्यामध्ये अत्यावश्यक बदल करून हे बहुमजली वाहनतळाचे काम सुरु करण्यात आल्याची माहिती यावेळी आयुक्तांनी देण्यात आली. ही सर्व कामे नियोजनबध्दरित्या पूर्ण करून आगामी तीन महिन्यात कामाला गती देत बहुमजली वाहनतळ कार्यान्वित होईल व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर सोय होईल याकडे लक्ष देण्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी अभियांत्रिकी विभागास सूचित केले.
अशाचप्रकारची आणखी एक वाहनतळाची जागा सीबीडी बेलापूर विभागात उपलब्ध करून देण्यात आली असून त्याठिकाणी सदस्यस्थितीत डांबरीकरण करून तसेच वाहने उभी करण्यासाठी पट्टे मारून भूखंडावर वाहनतळ विकसित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
संपूर्ण नवी मुंबई शहरात पार्कींगचे नियोजन करण्याबाबत नुकतीच वाहतुक पोलीस व पोलीस विभागाशी चर्चात्मक बैठक संपन्न झाली असून चर्चाअंती 15 दिवसात विद्यमान पार्कींग स्थितीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत अभियांत्रिकी विभाग व सर्व विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्वेक्षण कार्यवाही सुरु आहे. सदर सर्वेक्षण जलद पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी आदेशित केले आहे.
Published on : 10-05-2023 13:37:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update