स्वच्छोत्सव अंतर्गत विन्स पुरस्काराने नवी मुंबईतील 5 महिला व संस्थाचा गौरव
अनेक शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाकडे एक शासकीय उपक्रम म्हणून पाहिले जाते, मात्र नवी मुंबईत नागरिकांच्या मनात स्वच्छतेचा विचार खोलवर रुजलेला असल्याने नवी मुंबईत स्वच्छतेची चळवळ उभी राहिल्याचे दिसून येत असल्याचे मत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केले. महापालिका मुख्यालयातील ॲम्फीथिएटरमध्ये आयोजित स्वच्छोत्सव अंतर्गत विंन्स ॲवॉर्ड वितरण समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन नार्वेकर, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. अनंत जाधव, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबईत कोणताही कार्यक्रम आयोजित केला की त्यामध्ये नागरिकांचा भरभरून सहभाग मिळतो. 7 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत राबविण्यात आलेल्या स्वच्छोत्सवामध्ये देखील महिलांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. विभागाविभागात आयोजित केलेल्या स्वच्छता विषयक वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये महिलांनी पुढाकार घेऊन काम केले. स्वच्छता संग्राम रॅलीमध्ये 5000 हून अधिक महिला भगिनींनी सहभागी होत देशातील सर्वाधिक सहभागाचा उच्चांक प्रस्थापित केला. त्याचप्रमाणे स्वच्छता कार्यात महिला सहभाग आणि नेतृत्व या अनुषंगाने विंन्स ॲवॉर्डसाठी मागविलेल्या प्रवेशिकांमध्ये देशात सर्वाधिक 616 इतक्या मोठ्या संख्येने महिला व महिला संस्थांनी प्रवेशिका दाखल केल्या. यामधील सर्वोत्तम कामगिरी करणा-या 5 महिला संस्थांना विविध कॅटेगरीमध्ये आयुक्तांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
यामध्ये ‘महिला नवउद्योजक आणि चेंज एजन्ट (Individual Women Entrepreneurs and Change Agents)’ या कॅटेगरीत ‘लेट्स सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या प्रमुख श्रीम. रिचा समीत’ यांस ‘विन्स ॲवॉर्ड‘ प्रदान करून सन्मान करण्यात आला.
‘अशासकीय संस्था (NGO's)’ कॅटेगरीत ‘शेल्टर असोसिएट्स’ तसेच ‘लघु उद्योजक (Micro Enterprises)’ कॅटेगरीत फुलांच्या पाकळ्यांपासून अगरबत्ती बनविणा-या ‘समता महिला मंडळ’ यांचा ‘विन्स ॲवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात आला.
‘महिला बचत गट (Self Help Groups)’ या कॅटेगरीत झिरो वेस्ट स्लम मॉडेल प्रभावीपणे राबविणा-या ‘सिध्दी बचत गट’ यांचा तसेच ‘स्टार्टअप अंतर्गत नवउद्योजक (Startup)’ या कॅटेगरीत कापडी पिशव्या निर्मितीत पुढाकार घेऊन प्लास्टिक पिशव्यांना पर्याय देणा-या ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई महिला विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था’ यांना सन्मानीत करण्यात आले.
नवी मुंबईच्या स्वच्छताविषयक यशस्वी कामगिरीत सफाई कर्मचारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रमाणेच लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तसेच महिला, स्वच्छताप्रेमी नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यापुढील काळातही समस्त नवी मुंबईकर नागरिकांच्या सहयोगाने अधिक उत्तम कामगिरी करून देशात प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा प्राप्त करूया असा विश्वास आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात स्वच्छोत्सवामध्ये महिलांच्या स्वच्छता कार्यातील सहभाग व नेतृत्व याचे सक्षमीकरण झाल्याचे सांगत विन्स
ॲवॉर्डकरिता देशात सर्वाधिक सहभाग दिल्याबद्दल महिला व महिला संस्था यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी
महिला संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published on : 17-05-2023 11:57:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update