नवी मुंबईच्या शिरपेचात ‘स्टार म्युनिसिपल लिडरशीप ॲवॉर्ड’ चा मानाचा तुरा
‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’ या मानंकित संस्थेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणा-या शहरांचा ‘अर्थ डे नेटवर्क स्टार म्युनिसिपल लिडरशीप ॲवॉर्ड’ ने गौरव करण्यात आलेला आहे. यामध्ये ‘सिंगल यूज प्लास्टिक फ्री कार्यालय’ करून प्लास्टिक फ्री शहराकडे वाटचाल करणा-या नवी मुंबई महानगरपालिकेस ‘स्टार म्युनिसिपल लिडरशीप ॲवॉर्ड’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
या अनुषंगाने संस्थेमार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या ई बुकमध्ये नवी मुंबईच्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक कामगिरीचा विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे. या पुरस्काराचे प्राप्त झालेले सन्मानचिन्ह नवी मुंबईकर नागरिकांनी याकामी दिलेल्या सक्रीय सहभागामुळे प्राप्त झाले असल्याचे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सांगत हा पुरस्कार नवी मुंबईकर नागरिकांना समर्पित केलेला आहे. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री. संजय देसाई व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे उपस्थित होते.
पर्यावरण विषयक पायाभूत व कृतिशील कामगिरी करणा-या महानगरपालिकांना ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’ या संस्थेच्या वतीने ‘स्टार म्युनिलिपल लिडरशीप पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येत असून भारत सरकारच्या लाईफ मिशनमध्ये दर्शविल्याप्रमाणे शाश्वत जीवनशैली अंगीकारण्यासाठी काम करणा-या संस्थांना अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळण्याकरिता या पुरस्काराने प्रोत्साहित करण्यात येत आहे.
हर्बल हस्तीदंत म्हणून ओळखल्या जाणा-या शोला या दुर्मिळ औषधी वनस्पतीपासून बनविलेले आकर्षक स्मृतिचन्ह नवी मुंबई महानगरपालिकेस पुरस्कार स्वरुपात प्रदान करण्यात आले असून त्यामध्येही पर्यावरण जपणूक करण्यात आलेली आहे.
अर्थ डे नेटवर्क संस्थेने यानिमित्त प्रकाशित केलेल्या पुरस्कार्थींच्या कामगिरीचा आढावा घेणा-या ई बुकमध्ये महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबई महानगरपालिकेने आपले कार्यालय सिंगल यूज प्लास्टिक फ्री घोषित केले असून याव्दारे एकल प्लास्टिकवर प्रतिबंध घालण्याचा संदेश अप्रत्यक्षपणे नागरिकांमध्ये प्रसारित केला आहे असा आवर्जून उल्लेख केलेला आहे. यासोबतच महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक प्रतिबंधाविषयी विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती करण्यासोबतच प्रभावी रितीने प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा राबविण्यातही महानगरपालिका पुढाकार घेत असल्याचे नमूद केलेले आहे. सन 2022 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने 3 लाख किलोपेक्षा जास्त प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या असून 3 लाखाहून अधिक दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे असेही नमूद करण्यात आलेले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेस मिळालेला ‘स्टार म्युनिलिपल लिडरशीप ॲवॉर्ड’ हा राष्ट्रीय स्तरावरील आणखी एक पुरस्कार नवी मुंबईच्या नावलौकीकात भर घालणारा असून महापालिका मुख्यालयाप्रमाणेच संपूर्ण नवी मुंबई शहर सिंगल यूज प्लास्टिक फ्री करण्यासाठी महानगरपालिका कटिबध्द आहे. याकामी नागरिकांनी संपूर्ण सहयोग द्यावा आणि प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 23-05-2023 12:51:26,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update