‘थ्री आर ऑन व्हील्स’व्दारे नवी मुंबईच्या स्वच्छता कार्याला गतीमानता
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नागरी मंत्रालयाच्या वतीने ‘माझे जीवन, माझे स्वच्छ शहर (Meri Life Mera Swachh Shahar)‘ अभियानांतर्गत ‘21 दिवस चॅलेंज’ उपक्रम राबविण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 92 थ्री आर सेंटर्स कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामध्ये स्वच्छ भारत मिशनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘थ्री आर ऑन व्हिल्स’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेने ऑनलाईन टाकाऊ वस्तू विक्रीच्या ऑनलाईन ‘स्क्रॅपनेस्ट (SkrapNest)’ प्रणालीला प्रोत्साहित केले आहे.
नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते ‘थ्री आऱ ऑन व्हिल्स’ या संकल्पनेचा आरंभ करण्यात आला. याप्रसंगी स्क्रॅपनेस्ट वाहनाचे अनावरण करताना आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी या माध्यमातून नवी मुंबईतील नागरिकांना त्यांच्या घरातून विविध प्रकारचा सुका कचरा घेऊन जाणारी सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत याव्दारे नवी मुंबईच्या शून्य कचरा मोहिमेला गती मिळणार असल्याचे म्हटले आहे.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरिष आरदवाड व इतर महापालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी आयुक्तांनी स्क्रॅपनेस्टसारखी संकल्पना राबविण्यासाठी स्क्रॅपनेस्टचे संचालक श्री. सनत पाटील व श्री. प्रथमेश ढोके यासारख्या युवकांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
‘स्क्रॅपनेस्ट’ उपक्रमांतर्गत नागरिक आपल्या घरातील वर्तमानपत्रे, इतर कागद, प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिकच्या इतर वस्तू, पुठ्ठा, जुनी पुस्तके, स्टीलची भांडी, ई वेस्ट, लोखंड तांबे पितळ ॲल्युमिनियमच्या वस्तू अशा विविध प्रकारच्या वापरून जुन्या झालेल्या निरुपयोगी वस्तू, साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ शकतात. या वस्तूंचे दर स्क्रॅपनेस्टच्या वेबसाईटवर व ॲपवर सहजपणे उपलब्ध आहेत व ते दर 7 दिवसांनी अद्ययावत केले जातात.
ज्यांना आपल्या घरातील अशा टाकाऊ वस्तू द्यायच्या आहेत ते स्क्रॅपनेस्टचे ॲप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून अथवा स्क्रॅपनेस्टच्या www.skrapnest.com या वेबसाईटला भेट देऊन किंवा 9372394925 या व्हॉट्सॲप क्रमांकावरून संपर्क साधू शकतात. यावर संपर्क साधल्यानंतर थ्री आर ऑन व्हिल्स या संकल्पनेअंतर्गत स्क्रॅपनेस्टचे वाहन नागरिकांच्या घरापर्यंत येऊन त्यांच्या घरातील टाकाऊ वस्तू स्विकारतील व त्या बदल्यात त्यांना टाकाऊ वस्तूंच्या वजनाप्रमाणे निश्चित दरांनुसार पैसे दिले जातील.
यामध्ये एक विशेष बाब म्हणजे स्क्रॅपनेस्टमार्फत टाकाऊ वस्तू विक्रीप्रमाणेच नागरिकांना या टाकाऊ वस्तू गरजूंना विनामूल्य प्रदान करण्याचा पर्यायही उपलब्ध करून दिला जाईल व अशाप्रकारे नागरिकांनी प्रदान केलेल्या वस्तू नवी मुंबई महानगरपालिकेच्या 92 थ्री आर सेंटर्सपैकी नजीकच्या सेंटरवर आणून ठेवतील. याशिवाय 92 थ्री आर सेंटर्सवर अनेक दिवसांपासून कुणीही न नेल्याने पडून राहिलेल्या वस्तूंमुळे कचरा होऊ नये याकडेही स्क्रॅपनेस्टमार्फत लक्ष ठेवले जाईल व येथील कचरा वेळेवेळी उचलण्याची खबरदारी घेतली जाईल.
नवी मुंबई महानगरपालिकेची 92 थ्री आर सेंटर्स बाबतची जनजागृतीही स्क्रॅपनेस्टमार्फत केली जाणार असून सामाजिक बांधिलकी जपणा-या पर्यावरणप्रेमी नागरिकांपर्यंत व्यापक स्वरुपात थ्री आर सेंटर्सची माहिती पोहचवली जाणार आहे व त्यांना या उपक्रमाचे महत्व पटवून देऊन शहर स्वच्छता कार्यात प्रत्यक्ष सहभागी करून घेतले जाणार आहे. अशा नागरिकांना प्रशस्तीपत्रे देऊन प्रोत्साहित केले जाणार आहे तसेच या साखळीत सातत्यपूर्ण वस्तू विक्री किंवा वस्तू प्रदान करणा-या नागरिकांना पॉईन्ट स्वरुपात रिवॉर्डस् देऊन त्याबदल्यात दैनंदिन जीवनावश्यक वस्तू मूल्य स्वरुपात भेट म्हणून दिल्या जाणार आहेत.
केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या वतीने टाईड 2 अंतर्गत स्क्रॅपनेस्ट (SkrapNest) या उपक्रमाला आयआयटी मंडी मार्फत सरकारचे नव उद्योजकता प्रोत्साहनपर अनुदान लाभले असून सदर उपक्रम नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आयोजित केलेल्या स्वच्छ इनोव्हेशन टेक्नॉलॉजी चॅलेंज या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. त्या अनुषंगाने स्वच्छता कार्यात योगदान देणा-या व थ्री आर संकल्पनेला गती देणा-या थ्री आर ऑन व्हिल्स उपक्रमांतर्गत स्क्रॅपनेस्ट (SkrapNest) शी संपर्कात राहून नवी मुंबईकर नागरिकांनी हा उपक्रम यशस्वी करावा व नवी मुंबईच्या स्वच्छता कार्यात योगदान द्यावे आहे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 25-05-2023 12:59:56,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update