सुरू असलेल्या कामांना गती देण्याचे व आवश्यक कामेच करण्याचे महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे स्पष्ट निर्देश

*नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेली स्थापत्य कामे गती देऊन विहित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश देत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी कामाची गरज तपासूनच कामे करावीत व अनावश्यक कामे टाळावीत असे आदेश अभियांत्रिकी विभागाला दिले.*
मागील आठवड्यात बेलापूर ते घणसोली विभागाचा पाहणी दौरा केल्यानंतर महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी ऐरोली व दिघा भागातील सुविधा कामांचा पाहणी दौरा करत त्यासोबतच नालेसफाई व बंदिस्त गटारे सफाईचीही पाहणी केली. याप्रसंगी आयुक्तांसमवेत शहर अभियंता श्री संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री महेंद्र सप्रे, कार्यकारी अभियंता श्री मनोहर सोनवणे व श्री संजय पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
*नालेसफाईची कामे आता अंतिम टप्प्यात असून आयुक्तांनी दिघ्यातील ग्रीन वर्ल्डपासून नालेसफाईची पाहणी सुरू करत दिघ्याच्या आतील भागातील व ऐरोलीच्या निवासी भागातील तसेच दिघा आणि ऐरोली येथील एमआयडीसी भागातील नाले व बंदिस्त गटारे सफाईची बारकाईने पाहणी केली. नाल्यांच्या काठाशी काढून ठेवलेला गाळ त्वरित उचलण्याचे निर्देश आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन विभागास दिले.
विशेषत्वाने दिघ्याच्या पश्चिमेकडील सेंच्युरी नाला, बिंदूमाधवनगर नाला, आंबेडकरनगर नाला येथील नाल्यांची पाहणी करताना त्या ठिकाणी नवीन रेल्वे स्टेशनचे काम झालेले असल्याने तसेच रेल्वे ट्रॅक विस्तारीकरणाचे काम करण्यासाठी भराव टाकलेला असल्याने ट्रॅकखालून नाल्यातील पाणी पलिकडे वाहून जाण्यासाठी रेल्वेमार्फत सुरू असलेले कल्व्हर्टचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करावा असे निर्देश त्यांनी अभियांत्रिकी विभागास दिले. त्याचप्रमाणे तोपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून टाकण्यात आलेल्या पाईपची क्षमता पडताळून पावसाळी कालावधीत अतिवृष्टी झाली तरी पाणी व्यवस्थितरित्या वाहून जाईल व पाणी साचून कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे याठिकाणी व पाणी साचण्याच्या इतर संभाव्य ठिकाणी पुरेशा संख्येने पाणी उपसा पंपांची व्यवस्था करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले.
ऐरोली काटई मार्गाचे काम सुरू असल्याने सेक्टर 3 येथील नाल्याची सफाई एमएमआरडीए मार्फत होत आहे. त्या ठिकाणी नालेसफाई करताना रस्ता आणि नाला यामधल्या भागात नाल्यातून काढलेला गाळ लवकरात लवकर हलवावा यासाठी एमएमआरडीए कडे पाठपुरावा करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले.
ग्रीन वर्ल्ड आणि पटनी भागातील नाल्यांची पाहणी करताना जाणवलेली डेब्रीजची समस्या लक्षात घेत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी एमआयडीसी आणि ठाणे महानगरपालिका यांच्याशी समन्वय ठेवून तेथील डेब्रीज लवकरात लवकर हटविले जाईल याबाबत कार्यवाही करण्याचे सूचित केले.
इलठणपाडा दिघा भागातील दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणांना भेट देऊन पावसाळा कालावधी लक्षात घेता खबरदारीची उपाययोजना म्हणून तेथील नागरिकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
या पाहणी दौऱ्यामध्ये आयुक्तांनी ऐरोली स्मशानभूमीची पाहणी कर पावसाळ्यापूर्वी तेथील 3 बर्निंग स्टॅन्ड कार्यान्वित करावे आणि संपूर्ण काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
यादव नगर येथे बांधण्यात येत असलेल्या नवीन शाळा इमारतीची पाहणी केल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या अग्निशमन यंत्रणेत आयुक्तांनी सुधारणा सुचविल्या तसेच जूनमध्ये शाळा कार्यान्वित होईल यादृष्टीने कार्यवाहीला गती द्यावी असे निर्देश दिले.
चिंचपाडा नागरी आरोग्य केंद्राजवळील झोपडपट्टी येथे ग्रंथालय संकल्पनेतील नवीन ग्रंथालय देखील त्वरित कार्यान्वित करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
दिघ्यातील ओ एस 1प्लॉट शेजारी बांधण्यात येत असलेल्या उच्चस्तरीय जलकुंभाच्या कामाची तसेच त्याशेजारी बांधण्यात येत असलेल्या माता बाल रुग्णालयाच्या कामाचीही पाहणी करताना आयुक्तांनी विहित कालावधीत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे सूचित केले.
*या पाहणी दौऱ्यामध्ये आयुक्तांनी गटारे, पदपथ, रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी केली तसेच रस्ते दुरुस्तीबाबत सतर्क राहण्याचे निर्देश देत कोणत्याही परिस्थितीत खड्डे असणार नाहीत याची काटेकोर दक्षता घेण्याचे अभियंतावर्गास निर्देशित केले.*
*रस्ते, गटारे, पदपथ अशा प्रकारची कामे सूचित करताना त्या कामांची गरज लक्षात घेऊनच सूचित करावीत असे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी अनावश्यक कामे टाळावीत तसेच खर्चावर नियंत्रण ठेवावे अशाही स्पष्ट सूचना दिल्या आहेत.*
Published on : 29-05-2023 06:56:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update