*नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्याकडून नागरी सुविधांचा तपशीलवार आढावा*

नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या दैनंदिन बाजार इमारतींमधील ज्या ठिकाणी विक्रेते बसविलेले नसतील असे बाजार कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश देत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी हे बाजार कार्यान्वित करण्याकरिता त्या त्या भागातील बायोमॅट्रिक सर्व्हे झालेल्या फेरीवाल्यांना प्राधान्य द्यावे व लॉटरी प्रक्रिया तत्परतेने राबवावी अशा सूचना दिल्या. त्यादृष्टीने संबंधित विभाग कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या बायोमॅट्रिक सर्व्हे झालेल्या फेरीवाल्यांची यादी प्रसिध्द करून ज्यांनी जागेचा लाभ घेतलेला नाही अशा फेरीवाल्यांना सूचना देऊन कागदपत्रांसह कार्यालयात संपर्क साधण्यास सांगणे व लॉटरी काढून ओटले वाटप करण्याचे निर्देश आयुक्तांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे तसेच इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेने बांधलेल्या व सद्स्थितीत वापर नसलेल्या इमारतींचा आढावा घेऊन त्याचाही अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेश देत आयुक्तांनी महानगरपालिकेच्या मालमत्ता वापरात आणण्याच्या दृष्टीने ठोस पाऊल उचलण्याचे निर्देशित केले. याकरिता आवश्यक समितीचे गठण तत्परतेने करावे अशाही सूचना त्यांनी दिल्या.
अशाचप्रकारे महापालिका क्षेत्रात असलेल्या विनावापर भूखंडांवर डेब्रीज व केरकचरा टाकला जात असल्यामुळे शहर स्वच्छतेमध्ये बाधा येत असून त्याबाबत सिडको व इतर प्राधिकरणांना भूखंड संरक्षित करण्याविषयी परिमंडळ कार्यालयांमार्फत पत्र देण्यात आले आहे. याबाबतच्या कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्याचे आयुक्तांनी दोन्ही परिमंडळ उपायुक्तांना निर्दिशित केले.
शाळा दुरुस्तीची सुरु असलेली कामे या आठवड्यात पूर्ण करण्याचे अभियांत्रिकी विभागाला सूचित करत घणसोली व यादवनगर येथील शाळांच्या नवीन बनविण्यात येणा-या इमारती तत्परतेने पूर्ण करून शाळा कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचेही आयुक्तांनी आदेशित केले. काही शाळांमधील सभागृहे वापरात आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
पावसाळी कालावधी लक्षात घेता महापालिका इमारतींच्या त्यातही विशेषत्वाने शाळा इमारतींच्या टेरेसवर टाकाऊ साहित्य आहे काय याची तपासणी करावी व त्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावावी असेही सूचित करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका सेवेतून निवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचारी यांना त्यांचे निवृत्तीनंतरचे लाभ लगेच मिळावेत यादृष्टीने प्रलंबित सेवा निवृत्तीची प्रकरणे विनाविलंब मार्गी लावावीत व पुढील बैठकीत त्याबाबतचा तपशील द्यावा असेही निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले.
शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सीसीटिव्ही लावण्यात येत असून त्यामध्ये उद्यान सुरक्षेच्या दृष्टीनेही उद्यानात सीसीटीव्ही लावण्याला प्राधान्य द्यावे असेही आयुक्तांनी निर्देश दिले.
वंडर्स पार्कचे लोकार्पण मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते झालेले असून लोक मोठ्या प्रमाणावर वंडर्स पार्क पाहण्यासाठी येण्याची शक्यता लक्षात घेता याठिकाणची व्यवस्था चोख ठेवावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
स्वच्छता आणि सुशोभिकरण ही आपल्या शहराची मुख्य ओळख असून शहर स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याचे निर्देशित करीत स्वच्छता हा विषय केवळ घनकचरा व्यवस्थापन विभागापुरता मर्यादित नाही तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही विभागातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांच्या दृष्टीने महत्वाचा विषय असला पाहिजे व प्रत्येकाने त्यादृष्टीने जागरुक राहिले पाहिजे असे स्पष्ट निर्देश आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी या बैठकीत दिले.
Published on : 31-05-2023 14:11:31,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update