*नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांनी आपापल्या निवासी क्षेत्रातील स्वच्छता व सुनियोजनाविषयी* *पुढाकार घेण्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे निर्देश*

*नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छतेमधील मानांकनात महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाचा महत्वाचा वाटा आहे. त्यांच्यासह स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच नवी मुंबई स्वच्छतेत अग्रभागी राहिलेली आहे.*
*आपले शहर स्वच्छ व सुंदर दिसावे आणि स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिल्या नंबरचा निश्चय प्रत्यक्षात यावा यादृष्टीने स्वच्छता ही कायमस्वरुपी करण्याची गोष्ट असल्याने यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी पुढाकार घेत आपण राहत असलेल्या निवासी क्षेत्रातील स्वच्छता व इतर अनुषांगिक बाबींकडे बारकाईने लक्ष द्यावे व त्यामधील त्रुटी संबंधित विभाग अधिकारी व विभागप्रमुखांच्या लक्षात आणून द्याव्यात असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी स्वच्छ सर्वेक्षण विषयक आढावा बैठकीत दिले. अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या सूचनांची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देशही आयुक्तांनी विभागप्रमुख व विभाग अधिकारी यांना दिले.*
*यापुढील काळात स्वच्छता व शहराचा सुनियोजितपणा राखण्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रत्येक अधिकारी व कर्मचारी अधिक सतर्कतेने आपला सहभाग देईल असा विश्वास आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला असून याबाबतची कार्यप्रणाली निश्चित करून तिची अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले.*
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे तसेच इतर विभागप्रमुख नोडल अधिकारी आणि आठही विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान पटकाविण्याचा आपण निश्चय केला असून त्यादृष्टीने अधिक जोमाने कामाला लागण्याचे निर्देशित करीत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी प्रत्येकाने आपल्याला दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवून एक चळवळ म्हणून स्वच्छता कार्याकडे लक्ष द्यावे असे सांगितले.
सर्व स्वच्छता अधिकरी व स्वच्छता निरीक्षक तसेच संबंधित कर्मचारी यांनी नियमितपणे आपापल्या क्षेत्रात फिरून स्वच्छ सर्वेक्षणाशी संबंधित प्रत्येक बाबीची काटेकोर तपासणी करावी व त्यामध्ये काही त्रूटी आढळल्यास त्या त्वरित दूर करून घ्याव्यात असे निर्देश आयुक्तांनी दिले.
विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त तसेच विभागांसाठी नेमलेले नोडल अधिकारी यांनीही नियमितपणे आपापल्या क्षेत्रात फिरून स्वच्छतेच्या बाबींकडे बारकाईने लक्ष द्यावे असेही आयुक्तांमार्फत निर्दश देण्यात आले. या सर्वांनी आपली निरीक्षणे गुगल शीटमध्ये नोंदवावीत असे सूचित करतानाच आपण स्वत:ही नवी मुंबई क्षेत्रामध्ये फिरून स्वच्छतेची पाहणी करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
पावसाळा कालावधीच्या अनुषंगाने सुरु असलेले बंद गटारे सफाईचे काम तसेच मलनि:स्सारण वाहिन्या सफाईचे काम पूर्ण झाले असून बंद गटारांवरील झाकणे नीट लागलेली आहेत काय याची पाहणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्यासोबतच काही झाकणांना तडा गेला असल्यास अथवा ती तुटलेली असल्यास त्वरित बदलण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले. अशाचप्रकारे नालेसफाईदेखील अंतिम टप्प्यात असून नाल्यातून उपसलेला गाळ थोडासा सुकल्यानंतर त्वरित उचलून घ्यावा असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.
मोकळ्या भूखंडांवरील अस्वच्छता व डेब्रीज ही शहर स्वच्छतेमध्ये अडथळा ठरणारी गोष्ट असून स्वच्छता निरीक्षकांनी आपापल्या विभागांमध्ये फिरून तेथील मोकळ्या भूखंडांची स्थिती नोंदवून घ्यावी व त्याच्या सद्यस्थितीची छायाचित्रे अपलोड करावीत असे आयुक्तांनी सांगितले. हे भूखंड सिडको अथवा ज्या प्राधिकरणांचे आहेत त्यांना याबाबत सूचित करण्याचे निर्देश दोन्ही परिमंडळ उपआयुक्तांना यावेळी देण्यात आले.
शहरात ठिकठिकाणी अनधिकृतरित्या लागणा-या होर्डींगमुळे शहर स्वच्छतेला व सुशोभिकरणाला बाधा पोहचत असून विभाग कार्यालयांनी आपली अनधिकृत होर्डींगविरोधी कारवाई अधिक प्रभावीपणे राबवावी तसेच सोमवार आणि गुरुवार अशी आठवड्यातील दोन दिवशी ही होर्डींगविरोधी कारवाई अधिक तीव्र करावी असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.
शहरात ठिकठिकाणी लावलेल्या शिल्पाकृती तसेच सुशोभिकरणांतर्गत काढलेली चित्रे यासमोरच अनधिकृत होर्डींग लागतात व त्यामुळे या आकर्षक बाबी झाकल्या जातात हे लक्षात घेऊन याठिकाणी होर्डींग लावलीच जावू नयेत अशाप्रकारे कारवाई करावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
शौचालयांची स्वच्छता ही देखील एक अत्यंत महत्वाची बाब असून शौचालय स्वच्छतेवर व त्याच्या नियमित दुरुस्तीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
शहरातील महत्वाच्या चौकांच्या काँक्रिटीकरणाची कामे विविध विभागात सुरु असून पावसाळा कालावधीच्या अनुषंगाने ती तत्परतेने पूर्ण करावीत व पावसाळा कालावधीत वाहतुक कोंडी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्यावी असेही निर्देश आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिले.
*नवी मुंबई शहर स्वच्छतेत महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी आपापल्या निवासी क्षेत्रातील शहर स्वच्छता व नियोजनाला बाधा आणणा-या बाबींबाबत अधिक सतर्कतेने काम करावे व या बाबी संबंधितांच्या निदर्शनास आणून देऊन त्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे निर्देश देत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी स्वच्छतेच्या अनुषंगाने प्रत्यंक्ष पाहणी दौरे करणार असल्याचे सांगितले आहे.*
Published on : 02-06-2023 11:06:43,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update