दहावी बोर्ड परीक्षेत राबाडा नमुंमपा माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी गायत्रीदेवी योगी (93.80 टक्के) महापालिका शाळांमध्ये सर्वप्रथम नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळांचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 91.96 टक्के

मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी एस.एस.सी. बोर्ड परीक्षेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या 21 माध्यमिक शाळांचा सरासरी निकाल 91.96 टक्के लागला असून नमुंमपा माध्यमिक शाळा क्रमांक 104, राबाडा (हिंदी माध्यम) येथील गायत्रीदेवी मनोजकुमार योगी ही विद्यार्थिनी 93.80 टक्के गुण संपादन करुन नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये सर्वाधिक गुण संपादन करणारी विद्यार्थिनी ठरली आहे.
नमुंमपा शाळा क्रमांक 106, सेक्टर 5, कोपरखैरणे येथील तनुजा पोपट पाटील ही विद्यार्थिनी तसेच नमुंमपा माध्यमिक शाळा क्र. 104 राबाडा (हिंदी माध्यम) येथील पवनकुमार उमाशंकर यादव हा विद्यार्थी 93.40 टक्के गुण संपादन करुन महापालिका शाळांमध्ये संयुक्तपणे व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
तसेच नितू लालचंद यादव ही नमुंमपा शाळा क्र. 104, राबाडा (हिंदी माध्यम) येथील विद्यार्थिनी व भाग्यश्री अशोक सावंत ही नमुंमपा शाळा क्र. 106, कोपरखैरणे येथील विद्यार्थिनी 93.20 टक्के गुण प्राप्त करुन संयुक्तपणे तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या आहेत.
इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत उत्तम गुण संपादन करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या लौकीकात भर घालणा-या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी अभिनंदन केले आहे.
सन 2006-2007 या शैक्षणिक वर्षापासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांतून विद्यार्थी इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा देत असून प्रत्येक वर्षी निकालाची गुणवत्ता उंचावताना दिसत आहे. यावर्षी महानगरपालिकेच्या 21 शाळांमधून 2575 विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेला बसले असून 91.96 टक्के इतका महानगरपालिका शाळांचा सरासरी निकाल लागला आहे.
त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय क्र. 111 तुर्भे स्टोअर व क्र. 117 दिवाळे या शालांचा निकाल 100 टक्के लागलेला आहे. त्याचप्रमाणे श्रमिकनगर – 97.67, पावणेगांव – 96.61, कातकरीपाडा राबाडा – 96.10, सानपाडा – 96, दिघा – 95.16, कोपरखैरणे से. 7 – 95, कुकशेत – 94.64, दिवा – 94.50, तुर्भेगांव – 93.51, महापे – 92.85, ऐरोली – 91.91, घणसोली - 90.33, कोपरखैरणे से. 5 – 90, करावे – 89.24, शिरवणे – 89.08, नेरुळ – 88.67, गोठिवली – 84.78, वाशी – 83.69, खैरणे – 83.58 अशाप्रकारे शाळांचा निकाल जाहीर झाला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या शैक्षणिक सुविधा, साहित्य व गुणवत्तापूर्ण शिक्षण याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
प्राथमिक शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण माध्यमिक शिक्षण मिळावे ही ऐच्छिक जबाबदारी स्विकारुन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 21 माध्यमिक शाळांमधून शिक्षण दिले जाते असून त्यामध्ये सर्व सामाजिक स्तरांतील विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने खाजगी शाळांच्या तुलनेत महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी संपादित केलेले हे यश सर्वार्थाने अभिनंदनास पात्र आहे असल्याचे सांगत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या समवेत शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांचेही अभिनंदन केले आहे. तसेच या विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीकरिता शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.
Published on : 02-06-2023 14:34:10,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update