जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आठही विभागात हजारो नागरिकांच्या सहभागातून पर्यावरणाचा जागर













जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार शहरात ठिकठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये विशेषत्वाने वाशी येथे कर्मवीर भाऊराव पाटील मॉडर्न महाविद्यालय येथे तृतीयपंथी संघटनेचे सदस्य, एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी तसेच लेट्स सेलिब्रेट फिटनेस संस्थेचे सदस्य यांनी एकत्र येत माझी वसुंधर अभियानाची सामुहिक शपथ अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या समवेत ग्रहण केली. यावेळी पर्यावरण विषयक जनजागृती रॅली काढण्यात आली व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ.अमितकुमार सोंडगे, नवी मुंबई स्वच्छता वुमन आयकॉन श्रीमती रिचा समित, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्रा. सारंग, झुनझुनवाला महाविद्यालयाचे प्रा. नागरे, स्वछता अधिकारी श्री. सुधीर पोटफोडे तसेच स्वछता निरीक्षक, पर्यवेक्षक व स्वच्छताकर्मी आणि तृतीयपंथी नागरिक उपस्थित होते.
अशाचप्रकारे प्रदूषण विरहित वाहन म्हणून वापरल्या जाणा-या युलू ई बाईकची विशेष जनजागृतीपर रॅली ज्वेल ऑफ नवी मुंबई पासून नेरुळ, बेलापूर परिसरात काढण्यात आली. यामध्ये आम्ही पर्यावरणपूरक वाहनांचा वापर करून प्रदूषणाला प्रतिबंध घालू असे अभिवचन देत 75 ई बाईकर्सनी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्यासह जनजागृतीपर ई बाईक रॅलीमध्ये उत्साहने सहभाग घेतला. नेरुळ व बेलापूर परिसरात एका पाठोपाठ एक शिस्तीत निघालेली ही ई बाईक रॅली रस्त्यारस्त्यावर चालणारे, उभे असणारे नागरिक उत्सुकतेने पाहत होते व बाईकर्सना हात हलवून शुभेच्छाही देत होते. याप्रसंगी ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी विविध विभागांच्या आढावा बैठकीप्रसंगी दिलेल्या निर्देशानुसार बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात नागरिकांचा मोठ्या संख्येने लोकसहभाग असलेल्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ यांच्यासह नागरिकांनी उत्साहात सहभागी होत आपापल्या परिसरात जनजागृतीपर रॅली काढून स्वच्छता, वृक्षारोपण, प्रदूषण प्रतिबंध, प्लास्टिकचा वापर टाळणे अशा विविध विषयांवर घोषणा देत तसेच संदेश लिहिलेले बॅनर्स, हस्तफलक उंचावत लोकजागृती केली. प्रत्येक विभागामध्ये शेकडो नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. रॅली झाल्यानंतर परिसरात स्वच्छता मोहिमाही राबविण्यात आल्या. त्याचप्रमाणे आरआरआर सेंटरची माहिती प्रसारित करीत त्याठिकाणी माझी वसुंधरेची व केंद्र सरकारच्या लाईफ उपक्रमाची सामुहिक शपथ ग्रहण करण्यात आली. संबंधित विभागांच्या सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमांमध्ये पर्यावरप्रेमी नवी मुंबईकर आबालवृध्द नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
जागतिक पर्यावरण दिन हा आपल्याला पर्यावरण विषयक जागरुक व्हायला हवे याचा संदेश देणारा असून प्रत्येक सामाजिक कार्यात उत्साहाने सहभागी होणारे नवी मुंबईकर नागरिक याही उपक्रमात आपापल्या विभागांमध्ये पर्यावरणाविषयी आपण जागरुक आहेत याची प्रचिती देत उत्साहाने सहभागी झाले याबद्दल आभार व्यक्त करीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Published on : 05-06-2023 17:09:38,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update