*टायर रिट्रेडिंग प्रकल्पाव्दारे एनएमएमटी उपक्रम स्वयंपूर्ण*

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातील बसेसना लागणारे टायर झीज झाल्यानंतर रिट्रेडिंग करून पुन: वापरात आणले जातात. हे रिट्रेडिंगचे काम बाह्य एजन्सीव्दारे करण्यात येत होते. तथापि आता विविध बाबींमध्ये एनएमएमटी उपक्रम स्वयंपूर्ण होत असताना टायर रिट्रेडिंगचे कामही उपक्रमामार्फत केले जावे व यामधून उपक्रमास आर्थिक लाभ व्हावा यादृष्टीने एनएमएमटी उपक्रमाच्या आसुडगाव आगारात टायर रिट्रेडिंगचा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा शुभारंभ नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश कडुसकर, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. तुषार दौडंकर, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.विवेक अचलकर, मुख्य वाहतूक अधिकारी श्री. अनिल शिंदे, आसुडगांव आगार व्यवस्थापक श्री. उमाकांत जंगले, प्रशासन अधिकारी श्रीम. दिपिका पाटील व उपक्रमातील अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यापूर्वी हे काम कंत्राटदारामार्फत ई निविदेव्दारे करण्यात येत होते. यासाठी वार्षिक साधारणत: रू. 60 ते 70 लाख इतका खर्च होत होता. याबाबत नमुंमपा परिवहन उपक्रमाने नियोजन करून स्वत:चा टायर रिट्रेडिंग प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले व त्यादृष्टीने कार्यवाही सुरु केली. त्याकरिता मे. इल्जी रबर कं. लि. यांच्यामार्फत 22 लाखाची टायर रिट्रेडिंग मशीनची खरेदी केली व त्यांच्यामार्फतच प्रकल्पाची उभारणी केली. या प्रकल्पाकरिता मशीनचा खर्च एकदाच करावयाचा असून मशीनचे आयुर्मान 10 ते 12 वर्षे इतके आहे.
नमुंमपा परिवहन उपक्रमातील झीज झालेले टायर रिट्रेडिंगकरिता केवळ कच्चा माल दरवर्षी घ्यावा लागणार आहे. टायर रिट्रेडिंग कामाबाबत परिवहन उपक्रमातील कर्मचा-यांना मे. इल्जी रबर कं. लि. या उत्पादक कंपनीमार्फत रिट्रेडिंगचे प्रशिक्षण देण्यात आले असून या प्रशिक्षित झालेल्या उपक्रमातील कर्मचाऱ्यांमार्फतच झीज झालेल्या टायरचे रिट्रेडिंग करण्यात येणार आहे. याकरिता अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता असणार नाही.
या टायर रिट्रेडिंग प्रकल्पामुळे उपक्रमास एका वर्षात साधारणत: 550 ते 600 रिट्रेड केलेले टायर वेळेत उपलब्ध होऊन टायरअभावी बसेस नादुरूस्त राहणार नाहीत. यामुळे बसेसचे दैनंदिन संचलन सुस्थितीत राहणार असून प्रवाशी जनतेस वेळेत बस उपलब्ध करून देणे सुलभ होईल. पर्यायाने उपक्रमाच्या उत्पन्नात वाढ होणार असून टायर रिट्रेडिंग करतेवेळी टायरचे खराब झालेले रबरही भंगारात विक्री करता येईल. या टायर रिट्रेडिंगच्या कामामुळे नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या खर्चात साधारणत: 15 ते 20 टक्के बचत होणे अपेक्षित असून याव्दारे एनएमएमटी उपक्रम अधिक स्वयंपूर्ण होणार आहे.
Published on : 15-06-2023 13:52:06,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update