विठ्ठल नामासह नंबर वनचा निश्चय करीत नवी मुंबईत विद्यार्थ्यांची स्वच्छता दिंडी

स्वच्छता कार्यामध्ये लोकसहभागावर भर देत विविध उपक्रम राबविण्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आघाडीवर राहिली असून महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणा-या विविध उपक्रमांमध्ये आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बेलापूर विभागात करावेगाव परिसरात स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबई महानगरपालिका आणि ज्ञानदीप सेवा मंडळाचे प्राथमिक, माध्यमिक विदयालय, करावे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘आषाढी एकादशी स्वच्छता दिंडी’ मध्ये सहभागी 250 हून अधिक विदयार्थी, विदयार्थिनींनी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ तसेच ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ या नामघोषासह स्वच्छतेचे संदेश प्रसारित करीत ‘निश्चय केला, नंबर पहिला’ घोषणेने सारा परिसर दुमदुमून टाकला. शाळेच्या पटांगणापासून सुरु झालेली ही स्वच्छता दिंडी करावे, नेरुळ परिसरात साधारणत: दीड किलोमिटर फिरुन पुन्हा शाळा पटांगणात नामाचा गजर करीत परतली.
स्वच्छता ही आपल्या नवी मुंबई शहराची ओळख असून या नावलौकिकात येथील नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा फार मोठा वाटा आहे. स्वच्छताविषयक अनेक उपक्रमांमध्ये नागरिक स्वयंस्फुर्तीने सहभागी होत असतात. त्यातही महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा जपणा-या आषाढी दिंडीला स्वच्छतेची जोड देऊन ज्ञानदीप सेवा मंडळाच्या शाळेतील मुख्यध्यापक व शिक्षकांनी पुढाकार घेत स्वच्छता दिंडीचे आयोजन केले ही प्रशंसनीय गोष्ट असल्याचे मत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी व्यक्त केले. नवी मुंबईचे भविष्य असणा-या पुढच्या पिढीने विद्यार्थी मुलामुलीनी या स्वच्छता दिंडीत इतक्या मोठया संख्येने उत्साहाने सहभाग घेतला त्याबद्दल डॉ. बाबासाहेब राजळे यांनी कौतुक केले.
याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्यासमवेत, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे, स्वच्छता अधिकारी श्री. विजय नाईक तसेच स्वच्छता निरीक्षक व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ज्ञानदीप सेवा मंडळाची प्राथमिक शाळा मराठी माध्यम मुख्याध्यापक श्री. बंकट तांडेल व इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री. रत्नाकर तांडेल आणि संस्था कार्यकारिणी सदस्य श्री हरिश्चंद्र तांडेल तसेच इतर शिक्षकवृंद, शालेय कर्मचारी व 250 हून अधिक विदयार्थ्यांनी दिंडीत सहभागी होत हरीनामासह स्वच्छतेचा गजर केला.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने विठ्ठल भक्तीप्रमाणेच समाजहिताला प्राधान्य देत प्रबोधनाचीही संदेश सर्वदूर प्रसारीत केला आहे. त्याचे प्रतिबिंब या स्वच्छता दिंडीतून उमटलेले दिसले.
Published on : 28-06-2023 11:15:28,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update