मिशन इनोव्हेशन प्रोग्रामव्दारे नवनिर्मितीला संधी व शहर विकासाला गतीमानता



नागरिकांच्या नाविन्यपूर्णतेला वाव देत व तशा प्रकारच्या संकल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी प्रकल्प निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देऊन शहर विकासाला गतीमानता देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला असून नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन इनोव्हेशन प्रोग्राम’ प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. ग्रोक लर्निंग प्रा. लि. यांचे सहयोगाने राबविला जाणा-या या अभिनव उपक्रमात डॉ. डि.वाय.पाटील इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर सहकार्याची भूमिका बजावित आहे. नुकतीच याबाबतची प्रशिक्षण कार्यशाळा डॉ. डि.वाय. पाटील विद्यापीठ सभागृहात संपन्न झाली.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत यापूर्वी प्रत्येक वर्षी ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी चॅलेंज’ आयोजित केले जात असून त्याला उत्तम प्रतिसाद लाभला आहे. त्याचेच पुढचे व ठोस पाऊल या ‘मिशन इनोव्हेशन प्रोग्राम’ अंतर्गत टाकले जात असून याव्दारे नवनिर्मितीच्या संकल्पना राबविणारे इनोव्हेटर्स, इनक्युबेटर व या संकल्पनांची अंमलबजावणी करणारे इम्प्लिमेंटर्स यांना एकाच व्यासपीठावर आणले जात आहे. याव्दारे नवी मुंबईतील विद्यार्थी, युवक, तरूण व्यावसायिक, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक हे एकत्र येऊन शहर उपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार आहेत.
नवी मुंबईतील नागरिकांना शहरापुढे असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करणे व सक्षम बनविणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट असून त्याकरिता नागरिकांच्या कल्पनेतील विविध संकल्पनांना मुक्त वाव देऊन उपलब्ध संसाधनांचा व कौशल्याचा उपयोग करून घेतला जाणार आहे. याकरिता व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या वेगळ्या स्वरुपाच्या संकल्पना प्रत्यक्ष राबविण्यासाठी प्रोत्साहन देणे, मार्गदर्शन करणे व त्यासाठी पाठिंबा देण्याचे काम नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत केले जाणार आहे.
यादृष्टीने ए आय आधारित शैक्षणिक व्यासपीठ हे ग्रॉक लर्निंग प्रा. लि. यांच्यामार्फत उपलब्ध करून दिले जाणार असून नवी मुंबई महानगरपालिका ग्रॉक समवेत तशा प्रकारचा करार करणार आहे. ग्रॉकमार्फत या तंत्रशिक्षणासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणि तांत्रिक माहिती दिली जाणार असून यामध्ये अत्याधुनिक तंत्रसाधनांचा वापर करून आयओटी, रोबोटिक्स व थ्रीडी आर्ट या 3 आधुनिक तंत्र संकल्पनांवर आधारित प्रायोगिक शिक्षणावर भर दिला जाणार आहे. याव्दारे डाटा सायन्स आणि मशिन लर्निंग याव्दारे उदयोन्मुख व्यक्तींना ज्ञानसंपन्न करून त्यांच्या वेगळ्या संकल्पनांचे मूर्त स्वरुपात रुपांतरण करण्यासाठी सुसज्ज साधने उपलब्ध होणार आहेत.
या प्रोटोटाईपच्या अंमलबजावणीला डॉ.डि.वाय.पाटील इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर्स हे कौशल्य प्रदान करणार असून या केंद्राव्दारे उदयोन्मुख उद्यमींच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना अविष्कृत करण्यासाठी व त्यांना उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी जोडण्यासाठी आणि त्यांच्या वैचारिक जाणीवा जागृत करण्यापासून बाजारपेठेशी संबंधित उपायांपर्यंत त्यांची मदत केली जाणार आहे. या नाविन्यपूर्णतेचे फायदे नवी मुंबईतील कानाकोप-यात पोहचतील याची खात्री करून घेऊन संपूर्ण नवी मुंबई शहरात यशस्वी व अभिनव प्रकल्पांची अंमलबजावणी सोयीची करण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिका महत्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी दिली.
याची प्रभावी अंमलबजावणी करताना त्यामध्ये शालेय शिक्षक, उद्योगतज्ज्ञ तसेच युवा उद्योजकांचा समावेश करण्याचे नियोजन आहे. हा मार्गदर्शकांचा समुह तयार करण्यासाठी स्वतंत्र क्षमता निर्मिती आणि प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई शहरातील नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ग्रोक लर्निंग प्रा. लि. तसेच डॉ. डि.वाय.पाटील इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर्स यांच्या सहयोगाने ‘मिशन इनोव्हेशन प्रोग्राम’ सुरु झाला असून याबाबतचे विशेष प्रशिक्षण घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली, डॉ. डि. वाय. पाटील विद्यापीठ सभागृहात संपन्न झाले. यामध्ये अभ्यासू व्यक्ती, संस्था, शाळा, महाविद्यालय यांचे शिक्षक, स्टार्टअप्स यांच्याकरिता विशेष प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये सहभागींना तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. तसेच सहभागींच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली. याव्दारे आजच्या माहिती तंत्रज्ञान युगाला साजेशी युवापिढी घडविली जाणार असून यामधून नवी मुंबई शहरासाठी शाश्वत विकासाचे काम होणार आहे.
Published on : 03-07-2023 13:22:26,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update