उद्यानांचे शहर अशी ओळख असणाऱ्या नवी मुंबईतील उद्यान सुधारणेकरिता आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचा ॲक्शन प्लॅन


स्वच्छ आणि सुंदर शहराप्रमाणेच 'उद्यानांचे शहर (Garden City)' ही नवी मुंबईची एक वेगळी ओळख असून 109 चौ. किमी महापालिका क्षेत्रात 225 हून अधिक उद्याने व सुशोभित जागा नवी मुंबईत आहेत. नवी मुंबईतील अनेक उद्याने विशिष्ट संकल्पना घेऊन ‘थीम पार्क’ म्हणून महानगरपालिकेने विकसित केली असून त्यामध्ये बेंचेस, कारंजे, खेळणी अशा आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे केवळ नवी मुंबईकर नागरिकांचीच नाही तर नवी मुंबईला भेट देणाऱ्या इतर शहरातील नागरिकांचीही पसंती या उद्यानांना मिळत आहे.
विरंगुळ्याची आकर्षक ठिकाणे म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवी मुंबईतील उद्यानांची वैशिष्ट्यपूर्णता टिकून रहावी याकरिता नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर अत्यंत दक्ष आहेत. या उद्यानांची स्थिती उत्तम राहावी यादृष्टीने उद्यान विभाग आणि अभियांत्रिकी विभाग यांची संयुक्त बैठक घेत आयुक्तांनी दोन्ही विभागांनी परस्पर समन्वयाने उद्याने अधिक उत्तम होण्यासाठी सर्वतोपरी कार्यवाही करावी असे निर्देश दिले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन नार्वेकर, उद्यान विभागाचे उपायुक्त श्री. दिलीप नेरकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
पावसाळी कालावधीत उद्यानांची विशेष दक्षता घेण्याची गरज विशद करीत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी देखभाल - दुरुस्तीची कार्यवाही अधिक काटेकोर करावी व संबंधित कंत्राटदारांना सतर्क राहण्याचे निर्देश द्यावेत अशा सूचना दिल्या.
अशाच प्रकारे खेळणी दुरुस्तीसाठी प्रत्येक विभागाकरता वेगळे वार्षिक कंत्राट करून खेळणे नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते त्वरित दुरुस्त करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी असे निर्देश दिले. तसेच उद्यानांमधील ओपन जीमच्या दुरुस्तीबाबतही दक्षता घेण्याचे आयुक्तांनी सूचित केले. उद्यानांमधील टॉय ट्रेन कार्यान्वित करणेबाबतही आयुक्तांनी सूचना दिल्या.
मँगो गार्डन, रॉक गार्डन अशा काही उद्यानांमध्ये रेस्टॉरंट सुरू असून या रेस्टॉरंटची वेळ ही उद्यानांच्या वेळेइतकीच मर्यादित असावी अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमधील आवश्यक स्थापत्य, पाणीपुरवठा व विद्युत विषयक कामे विहित वेळेत तत्परतेने होण्याच्या दृष्टीने अभियांत्रिकी विभागाने अधिक बारकाईने लक्ष द्यावे व ही कामे जलद होण्याकरिता उद्यानांच्या देखभाल - दुरुस्ती कामांवर लक्ष ठेवण्यासाठी 2 कनिष्ठ अभियंता स्वतंत्रपणे याच कामासाठी नेमावेत असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
प्रत्येक शहराची काही वैशिष्ट्ये असतात. त्या वैशिष्ट्यांमुळेच शहराच्या नावलौकिकात भर पडत असते. नवी मुंबईतील सर्वच उद्याने ही नागरिकांची आकर्षण केंद्रे असून हा नावलौकिक टिकवून ठेवण्यासाठी व तो वाढविण्यासाठी उद्यान विभागाने दक्षतेने कार्यरत राहणे गरजेचे आहे याची जाणीव करून देत त्यादृष्टीने सतर्क राहण्याचे निर्देश आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी उद्यान आणि अभियांत्रिकी विभागास दिले.
Published on : 11-07-2023 16:09:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update