जागतिक कागदी पिशवी दिनानिमित्त विद्यार्थ्यांची विशेष कार्यशाळा

प्लास्टिकमुळे व त्यातही प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेता प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे टाळून त्याऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नियमितपणे जनजागृती करण्यात येत असते.
या अनुषंगाने आज जागतिक कागदी पिशवी दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सेक्टर 4, सानपाडा येथील विवेकानंद संकुल शाळेत विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून कागदी पिशव्या बनविणे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कागदी पिशव्या बनविणे कार्यशाळेत दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत कागदी पिशव्या बनविण्याची प्रक्रिया शिकून घेतली आणि प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करू अशी एकत्रितपणे शपथ घेतली.
यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक बंदीविषयी तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून त्याऐवजी कागदी व कापडी पिशव्यांचा पर्याय निवडावा याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या घरात व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्लास्टिकचे दुष्परिणाम पोहोचवून त्यांना कापडी अथवा कागदी पिशव्या वापरण्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
12 जुलै 1852 मध्ये अमेरिकेत फ्रान्सिस ओले यांनी पहिल्यांदा कागदी पिशवी बनविली. त्याचे स्मरण म्हणून 12 जुलै हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक कागदी पिशवी दिन म्हणून साजरा केला जातो. कागदी पिशव्यांचा वापर करणे ही समाजहिताची गोष्ट असून प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण व नैसर्गिक वातावरणाला निर्माण होणारा गंभीर धोका याविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या दिवशी जगभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.
नवी मुंबई महानगरपालिका याविषयी सजग असून महानगरपालिकेने समाज माध्यमांवरून जागतिक कागदी पिशवी दिनाचे महत्व प्रसारित करणारे संदेश प्रसारित केले आहेत तसेच विविध कार्यक्रमही हाती घेतले आहेत. विवेकानंद संकुल, सानपाडा येथे संपन्न झालेल्या कापडी पिशव्या बनविणे प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्दिष्टही हेच असून या माध्यमातून नव्या पिढीत विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाविषयी तसेच कापडी पिशव्यांच्या वापरामुळे होणारे लाभ याबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे.
Published on : 12-07-2023 15:05:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update