सुप्रसिद्ध गायिका श्रीम.अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते नवी मुंबईतील कर्णबधिर विदयार्थ्यांना श्रवणयंत्राद्वारे आवाजाची भेट

समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या तसेच खाजगी सर्वसामान्य मुलांसमवेत शिक्षण घेणाऱ्या विविध प्रकारचे दिव्यांगत्व असणाऱ्या विशेष विदयार्थ्यांकरिता नमुंमपा शिक्षण विभाग दक्षेतेने कार्यरत आहे.
ही विशेष मुले शैक्षणिक विकासाच्या प्रवाहात कुठेही मागे पडू नयेत, याकरिता सतर्कता राखली जात आहे. या विशेष विदयार्थ्यांना ब्रेलकाठी, व्हीलचेअर, श्रवणयंत्रे अशा प्रकारची आवश्यक साधने त्यांच्या दिव्यांगत्वानुसार उपलब्ध करून देण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत.
असाच एक विशेष प्रयत्न सुप्रसिद्ध गायिका श्रीम. अनुराधा पौडवाल यांच्या विशेष पुढाकारातून करण्यात आला व नमुंमपा क्षेत्रातील श्रवणदोष असणाऱ्या शासकीय यू डायस ॲपवर नोंदीत 64 कर्णबधिर विदयार्थ्यांना श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले.
सेवाभावी वृत्तीने लोकोपयोगी समाजकार्य करणाऱ्या श्रीम. अनुराधा पौडवाल यांच्या सुर्योदय फाऊंडेशन या सेवाभावी काम करणा-या संस्थेच्या वतीने आरसीई फाऊंडेशन या शासकीय संस्थेला करण्यात आलेल्या विनंतीनुसार त्यांच्या सीएसआर निधीतून अलिम्को या संस्थेच्या माध्यमातून ही श्रवणयंत्रे उपलब्ध करून देण्यात आली.
अशाप्रकारे एक हजाराहून अधिक श्रवणयंत्रे विविध शहरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून नवी मुंबईतील यू – डायस ॲपवर नोंदीत 64 कर्णबधिर विदयार्थ्यांना ही श्रवणयंत्रे श्रीम. अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते सेक्टर 15, वाशी येथील नमुंमपा शाळा क्र. 28 येथे वितरित करण्यात आली. यावेळी नमुंमपा शिक्षणाधिकारी श्रीम.अरुणा यादव यांनी त्यांचे महानगरपालिकेच्या वतीने स्वागत केले.
श्रवणयंत्र मिळाल्यानंतर विदयार्थ्यांना ऐकायला येऊ लागल्याने त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद अत्यंत मोलाचा असल्याची भावना श्रीम.अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केली.
ही श्रवणयंत्रे वितरीत करण्यापूर्वी प्रत्येक विदयार्थ्यांची श्रवणचाचणी घेण्यात आली होती. तसेच त्यांच्या श्रवण क्षमतेची तपासणी करून व कानाचे माप घेऊन प्रत्येक कर्णबधिर विदयार्थ्यांला त्याच्यासाठी सुयोग्य श्रवणयंत्रे तयार करून उपलब्ध करून देण्यात आली.
याप्रसंगी सुप्रसिद्ध गायिका श्रीम. अनुराधा पौडवाल, नमुंमपा शिक्षण अधिकारी श्रीम. अरुणा यादव, समावेशित शिक्षण समन्वयक श्रीम. अनिता मोजाड, शाळेच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.जगदिश टोले व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. बाळू खटके, ईटीसी केंद्र अधिक्षक श्रीमती उज्वला पाटील आणि इतर शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘गिफ्टींग साउंड’ या अभिनव नावाने संपन्न झालेल्या या उपक्रमात कर्णबधिर विदयार्थ्यांना विनामूल्य श्रवणयंत्र उपलब्ध होऊन त्यांच्यासाठी जणू आवाजाची बंद खिडकी खुली झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस आनंद अवर्णनीय होता.
Published on : 23-07-2023 08:42:26,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update