आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नमुंमपा आपत्ती नियंत्रण यंत्रणा सतर्कतेने कृतीशील आजही इर्शाळवाडीकडे आणखी 50 सफाईकर्मींचे मदतकार्य पथक 5 स्वच्छता निरीक्षक व जीवनपयोगी साहित्यासह रवाना



काल 21 जुलै रोजी संध्याकाळपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्ती निवारण यंत्रणा दक्षतेने कृतीशील झाली. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी रात्रीपासूनच विभागनिहाय स्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली.
महापालिका मुख्यालयातील मध्यवर्ती आपत्ती निवारण केंद्रात प्राप्त होणाऱ्या तक्रारी तसेच विभाग कार्यालय पातळीवर तेथील आपत्ती निवारण कक्षाला प्राप्त होणाऱ्या तक्रारी आणि त्यावर करण्यात आलेली कार्यवाही यांचा आयुक्तांमार्फत सतत आढावा घेतला जात होता. याशिवाय आयुक्तांना सोशल मीडियावरून प्राप्त होणारे संदेश व छायाचित्रे याबाबतही आयुक्त संबंधितांकडून तेथील प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेत होते व त्या ठिकाणी तत्पर कार्यवाही करण्याचे निर्देश देत काम झाल्यानंतरच्या स्थितीची छायाचित्रे मागवून शहनिशा करीत होते.
त्याचप्रमाणे कालच आयुक्तांनी इर्शाळवाडी भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील 15 संभाव्य दरडग्रस्त क्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्याविषयी त्यांनी शहर अभियंता श्री संजय देसाई, संबंधित कार्यकारी अभियंता तसेच विभाग अधिकारी यांचेकडून स्थलनिहाय प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच क्षेत्रात खड्डे भरण्याची कार्यवाही सुरू होती. शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसह बेलापूर ते दिघा या संपूर्ण क्षेत्राचा पाहणी दौरा करीत क्षेत्रनिहाय आढावा घेतला.
त्याचप्रमाणे कालच्यासारखे आजही सकाळी 6 वाजता 50 स्वच्छताकर्मींचे पथक 5 स्वच्छता निरीक्षकांसह इर्शाळवाडीकडे मदतकार्यासाठी रवाना झाले. त्याचप्रमाणे 500 ब्लँकेट्स, 400 चादरी, 2000 चिवडा पाकीटे, बिस्किट पुडे, पाणी बाॅटल्स व अन्नधान्याची पाकीटेही आपद्ग्रस्तांसाठी पाठवण्यात आली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी दिली.
दि. 21 जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजल्यापासून आज 22 जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 116.66 मि.मि. पावसाची नोंद झालेली आहे. त्याचप्रमाणे आज 22 जुलै रोजीही मध्यरात्रीपासून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पावसाचा दुपारी काहीसा वेग मंदावला तरी हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन सर्व यंत्रणेने सतर्क रहावे असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
आज 22 जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नमुंमपा क्षेत्रात 23.98 मि.मि. पावसाची नोंद झालेली आहे. यामध्ये बेलापूर विभागात 35.80 मि.मि., नेरूळ विभागात 17.20 मि.मि., वाशी विभागात 14.50 मि.मि., कोपरखैरणे विभागात 19.89 मि.मि., ऐरोली विभागात 29.89 मि.मि. व दिघा विभागात 26.80 मि.मि. अशाप्रकारे संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात सरासरी 23.98 मि.मि. इतक्या पावसाची नोंद झालेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेला सतर्क करतानाच स्वतः महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर संपूर्ण कार्यवाहीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्या अनुषंगाने महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा दक्ष असून नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण जाणवल्यास त्यांनी महापालिका मुख्यालयातील मध्यवर्ती नियंत्रण केंद्राशी 1800222309/1800222310 या टोल फ्री क्रमांकावर अथवा 022 - 27567060/61 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आहे.
Published on : 23-07-2023 08:48:04,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update