*सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील रस्ते दुरूस्ती कामांना गतीमानता*



17 जुलैपासून 29 जुलैपर्यंत संततधार पाऊस कोसळत या कालावधीत 874.90 मि.मि. इतक्या मोठया प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली. या कालावधीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर नवी मुंबईतील परिस्थितीवर संपूर्ण लक्ष ठेवून होते. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन मदत यंत्रणा दक्षतेने कार्यरत होती. आयुक्तांनी स्वत: भर पावसात नवी मुंबई महापालिका क्षेत्राचा पाहणी दौराही केला.
आता पावसाची तीव्रता काहीशी कमी होऊन उघडीप मिळाल्यानंतर रस्ते दुरुस्तीची कामे जलद हाती घेऊन सध्याचा श्रावणी सणांची तसेच आगामी गणेशोत्सवाचा कालावधी लक्षात घेत या रस्ते दुरूस्ती कामांना गती दयावी असे निर्देश आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांचेमार्फत अभियांत्रिकी विभागास देण्यात आले होते. त्यानुसार दिघा ते बेलापूर या सर्वच विभागांतील रस्ते दुरुस्तीची कामे जलद गतीने हाती घेण्यात आली असून सर्व विभागातील कार्यकारी अभियंता हे आपापल्या विभाग कार्यालय क्षेत्रातील कामांवर तसेच शहर अभियंता श्री. संजय देसाई सर्वच रस्ते दुरुस्ती कामांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. शहर अभियंता नियमित पाहणी दौ-यांव्दारे या कामांवर काटेकोर लक्ष देत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीचे वार्षिक स्वरुपात देखभाल - दुरुस्ती कंत्राट करण्यात आले असून रस्ते दुरुस्तीची कामे वर्षभर नियमितपणे सुरू असतात. त्यामुळे इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते खराब होण्याचे प्रमाण काहीसे कमी आहे व दुरूस्त करण्याचा कालावधीही जलद आहे. विभागनिहाय 8 तसेच एमआयडीसी क्षेत्राकरिता 2 असे 10 कंत्राटदार रस्ते दुरुस्तीची कामे करीत असून या कंत्राटदारांमार्फत नियमितपणे रस्ते दुरूस्ती केली जात आहे. आपल्याला नेमून दिलेल्या क्षेत्रातील रस्त्यांची नियमित पाहणी करणे व आवश्यक त्या ठिकाणी त्वरित दुरुस्ती करणे हे या कंत्राटदारांचे काम असून 48 तासात दुरुस्ती कार्यवाही न झाल्यास या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते.
मागील आठवडयापासून पावसाने काहीशी उघडीप घेतल्याने आयुक्तांच्या निर्देशानुसार रस्ते दुरुस्ती वेगाने करण्याकडे अभियांत्रिकी विभागामार्फत गतीमान कार्यवाही सुरु असून आकाराने लहान खड्डे भरण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर करण्यात येत आहे. विशेषत्वाने उड्डाणपूल तसेच अवजड वाहनांची रहदारी असणारे रस्ते या ठिकाणी मास्टिक अस्फाल्टचा उपयोग केला जात आहे. त्याचप्रमाणे खड्डा मोठा असल्यास तो समतल करून सुस्थितीत आणण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी आवश्यकता लक्षात घेऊन अस्फाल्टींगव्दारे रस्त्याच्या काही भागांचे डांबरीकरणही केले जात आहे.
तशीही नियमितपणे रस्ते पाहणी करण्यात येऊन आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात येते. याशिवाय महानगरपालिकेच्या नागरिक तक्रार निवारण प्रणालीवर (Public Grievance System) तसेच विविध माध्यमांव्दारे प्राप्त होणा-या रस्त्यांबाबतच्या तक्रारींवर त्वरित दुरुस्ती कार्यवाही करण्यात येत आहे. रस्त्यांच्या तक्रारीबाबत नवी मुंबई महानगरपालिकेने 8424948888 हा व्हॉट्स ॲप क्रमांक नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन दिलेला असून आपत्ती निवारण कक्षाचे टोल फ्री क्रमांक 1800222309 / 10 यावर तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या तक्रार निवारण प्रणालीवर (Public Grievance System) रस्त्यांविषयीच्या तक्रारी व सूचना नागरिक दाखल करु शकतात.
पावसाळी कालावधीकरिता अभियांत्रिकी विभागाने विभागनिहाय रस्ता दुरुस्ती विशेष पथके तयार केली असून ही पथके आपापल्या विभाग क्षेत्रात फिरती राहून रस्ते दुरुस्तीची कामे करीत आहेत.
नवी मुंबई शहर हे समुद्रसपाटीच्या खालील पातळीवर वसलेले असून भरतीच्या कालावधीत अतिवृष्टी झाल्यास शहरातील काही सखल भागात पाणी साचून राहते. हे पाणी उपसण्यासाठी व जलद पाणी निचरा होण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने पुरेशा प्रमाणात पाणी उपसा पंपासह इतर आवश्यक व्यवस्था केली जात आहे. तथापि शहरातील काही सखल भागात पाणी साचून राहत असल्याने त्याठिकाणी असलेल्या रस्त्यांच्या पृष्ठभागाची काही प्रमाणात हानी होते. तथापि यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची पूर्णपणे काळजी घेत रस्ते सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. रोजेश नार्वेकर यांनी दिले असून श्रावणातील सण- उत्सव व आगामी गणेशोत्सव कालावधी लक्षात घेऊन अभियांत्रिकी विभाग रस्ते दुरुस्तीची कार्यवाही अधिक काळजीपूर्वक करीत आहे.
Published on : 08-08-2023 12:16:54,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update