'मेरी माटी मेरा देश' अभियानांतर्गत रबाळे येथील नमुंमपा राजर्षि छत्रपती शाहू महाराज विद्यालयात शहीद वीरांच्या स्मरणार्थ शिलाफलकाची उभारणी


केंद्र सरकारच्या वतीने 9 ऑगस्ट पासून सुरु झालेल्या ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान अंतर्गत स्थानिक शहीद वीरांच्या स्मरणार्थ देशातील प्रत्येक गाव-शहरात शिलाफलक लावला जात असून या माध्यमातून शहीद वीरांच्या स्मृती जतन करून त्या कायम नजरेसमोर ठेवत नवी प्रेरणा देत राहतील अशाप्रकारे उभारणी करण्यात आलेली आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शालेय प्रांगणात शिलाफलक उभारावयाचे असून याव्दारे शाळेतील विदयार्थ्यांमध्ये शहीदांच्या शौर्याची चर्चा होऊन त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण होईल व वीरांविषयीचा अभिमान वृध्दींगत होईल.
त्यास अनुसरून ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, रबाळे येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजर्षि छत्रपती शाहू महाराज विदयाल्याच्या पटांगणात शहीद वीरांचा नामोल्लेख असणारा शिलाफलक बसविण्यात आला आहे. आज येथील विशेष कार्यक्रमाप्रसंगी शिलाफलकाभोवती मातीचे दिवे प्रज्वलीत करीत शहीद वीरांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. दत्तात्रय घनवट, क्रीडा अधिकारी श्रीम. अभिलाषा म्हात्रे, मुख्याध्यापक श्री.अमोल खरसंबळे व श्रीम. रंजना वंनशा आणि इतर शिक्षक व विद्यार्थी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी ध्वजारोहण करण्यात येऊन राष्ट्रगीत व राज्यगीताव्दारे अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे देशभक्तीपर गीतगायनानंतर भारतमाता की जय घोषणा देण्यात आल्या. विदयार्थी व शिक्षकांनी माती, मातीचे दिवे, मातीत रुजलेली वृक्षरोपे हतात घेऊन पंचप्रण शपथ घेतली. हे उजळणारे दिवे शिलाफलकासमोर ठेवून शहीद वीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी उपस्थित वीरपत्नी श्रीम. रत्ना गोपाळ सैंदाणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. आपल्या भारत देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या हूतात्म्यांना वंदन करणे हे भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य असल्याचे मत व्यक्त करीत शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. दत्तात्रय घनवट यांनी शहीदांच्या बलिदानाचे शिलाफलकाच्या रुपाने कायम स्मरण राहील असे सांगितले.
या शिलाफलकावर 1971 च्या भारत पाकिस्तान युध्दात शहीद झालेले इंडियन नेव्हीतील पेट्टी ऑफिसर मॅकेनिकल इंजिनियर राम सिंग, चिफ पेट्टी ऑफिसर एस के वर्मा, पेट्टी ऑफिसर एन एस कठैत, लिडींग सिमेन आर एस सिंग, इंडियन आर्मीतील दफादार भोपाल सिंग, 1987 मध्ये श्रीलंकेतील ओपी पवन येथे संरक्षण कार्यात शहीद झालेले सीपॉय नंदू तायडे, 2007 मध्ये जम्मु काश्मिर येथे संरक्षण कार्यात शहीद झालेले इंडियन आर्मीतील लेफ्टनंट कोलोनल मनोजकुमार पिल्लई, 2001 मध्ये जम्मू काश्मिर येथे संरक्षण कार्य करताना शहीद झालेले इंडियन आर्मीतील नायक लक्ष्मण बाबू शेळके त्याचप्रमाणे 2006 मध्ये ऐरोली येथील बँक दरोडयात कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करताना वीरमरण प्राप्त झालेले पोलीस उप निरीक्षक बाबासाहेब ज्ञानदेव आढाव, पोलीस हवालदार भिकू मारुती कराडे व गोपाळ वसंत सैंदाणे या 11 शहीद वीरांचा आदरपूर्वक नामोल्लेख करण्यात आलेला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 9 ऑगस्टपासून ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाच्या अनुषंगाने विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत असून महानगरपालिकेच्या रबाळे येथील राजर्षि छत्रपती शाहू महाराज विदयालय प्रांगणात उभारण्यात आलेला शहीद वीरांच्या स्मृती जतन करणारा शिलाफलक नवी मुंबईकर नागरिकांना नेहमी प्रेरणा देत राहील.
Published on : 14-08-2023 14:13:26,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update