नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क व अनामत रक्कम माफ
यावर्षी दिनांक 19 ते 28 सप्टेंबर 2023 या कालावधीत सार्वजनिक श्री गणेशोत्सव साजरा केला जात असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विशेष बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांकरता आकारले जाणारे मंडप शुल्क आणि अनामत रक्कम माफ करण्यात येत असल्याचे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी जाहीर केले आहे.
पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार हा निर्णय जाहीर करण्यात आला असून अशाच प्रकारची मागणी बेलापूर विधानसभा सदस्य आ. श्रीम. मंदाताई म्हात्रे, विविध लोकप्रतिनिधी व गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांच्याकडूनही करण्यात आली होती. त्यास अनुसरून आयुक्तांनी शुल्क माफीचा निर्णय जाहीर केला आहे.
मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक 173 / 2010 संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने मंडप उभारण्याची परवानगी देण्याची 'ई सेवा संगणक प्रणाली' सुरू केली असून 19 ऑगस्ट पासून मंडळी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सर्व गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक परवान प्राप्त करून घ्यावयाची असून त्याकरता कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, तथापि परवानगी घेणे आवश्यक आहे याची नोंद घेण्यात यावी.
19 ऑगस्ट पासून या ऑनलाइन परवानगी प्रक्रियेला सुरुवात झाली असून गणेशोत्सवाच्या दहा दिवस अगोदर पर्यंतच ऑनलाईन परवानगी प्रणाली सुरू राहील याची मंडळांनी नोंद घ्यावयाची आहे. मंडप उभारणी परवानगीकरिता अर्ज महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे www.rtsnmmconline.com या वेबसाईटवर ऑनलाइन सादर करावयाचे आहेत. या सुविधेचा लाभ घेऊन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी अतिशय उत्साहात पर्यावरणाचे भान ठेवून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 26-08-2023 16:42:34,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update