शिक्षक दिनी गुणवंत विदयार्थी घडवणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील शिक्षकांचा सन्मान




शिक्षक दिन हा देशाचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शिष्यवृत्तीसह इतर स्पर्धा परीक्षा, विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्प स्पर्धा, शालांत बोर्ड परीक्षा यामध्ये गुणवंत विदयार्थी घडविणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ, सुप्रसिध्द साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे, शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. दत्तात्रय घनवट, भांडार विभागाच्या उपआयुक्त श्रीम. मंगला माळवे, क्रीडा विभागाच्या उपआयुक्त श्रीम. ललिता बाबर, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी श्रीम. अरुणा यादव व इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई हे समृध्द विचारांचे शहर असून दरवर्षी पटसंख्या वाढणारे महानगरपालिकेचे शिक्षण व्हिजन कौतुकास पात्र आहे व यामागे शिक्षकांचे फार मोठे योगदान असल्याचे मत व्यक्त करीत आमदार श्री. गणेश नाईक यांनी शिक्षण विभागाचा शाळानिहाय पॅटर्न तयार करण्याची सूचना केली.
याप्रसंगी बोलताना आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी सांगत शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त केला. कोणत्याही व्यक्तीच्या प्रगतीत त्याच्यावर संस्कार करणाऱ्या शिक्षकांचा मोठा वाटा असतो असेही त्यांनी सांगितले. दोन्ही आमदारांनी ठोक मानधनावरील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याच्या सूचना महापालिकेला केल्या.
नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील शिक्षण पध्दतीवर पालकांचा इतका विश्वास आहे की महानगरपालिका शाळांतील विदयार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी हजाराहून अधिक विदयार्थ्यांनी वाढते याचा आनंद वाटतो असे सांगितले. यावर्षी सीबीएससी बोर्डाची तिसरी शाळा सुरु झाली. तेथील प्रवेशासाठी वेगवेगळया स्तरातून इतक्या मोठ्या प्रमाणात फोन आले की नवी मुंबई शाळांतील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्व जाणवले असेही ते म्हणाले. कोव्हीड कालावधीमुळे मागील तीन वर्ष होऊ न शकलेला शिक्षक दिन समारंभ यावर्षी उत्साहात साजरा होत असल्याबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले तसेच दोन्ही आमदारांनी उल्लेख केलेल्या ठोक मानधनावरील शिक्षकांच्या मानधन वाढीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी सुप्रसिध्द साहित्यिक, वक्ते प्रा.प्रवीण दवणे यांनी ‘अध्यापनाचे दीपस्तंभ’ या विषयावर शिक्षकांशी सुसंवाद साधत त्यांचे प्रबोधन केले.
मान्यवरांच्या शुभहस्ते 10 वी शालांत परीक्षेत 100 टक्के निकाल लागलेल्या सन 2022 व 2023 या शैक्षणिक वर्षातील नमुंमपा माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे सन 2021, 2022, 2023 या वर्षातील पाचवी व आठवी इयत्तेतील शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये गुणवंत विदयार्थी घडविणाऱ्या शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. तसेच चेन्नई येथील युवा शास्त्रज्ञ प्रदर्शनात सहभागी विदयार्थी समुहाचे मार्गदर्शक शिक्षक त्याचप्रमाणे अगत्स्या फाऊन्डेशन, थिंग बिग सायन्स कार्निव्हल आणि बाल वैज्ञाानिक परिषद व जिल्हास्तर विज्ञान परिषद यामध्ये सहभागी विदयार्थी समुहाचे मार्गदर्शक शिक्षक यांनाही सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र समन्वयक, माध्यमिक शाळा समन्वयक, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तांत्रिक सहाय्य करणारे शिक्षक, सर्व शिक्षा अभियानातील विषयतज्ज्ञ, एमआयएस समन्वयक, आयई समन्वयक, रिसोर्च टिचर तसेच डॉक्टरेट पदवी धारण केलेले नमुंमपा शाळांतील चार शिक्षक अशा 328 शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
नमुंमपा शाळा क्रमांक 42, घणसोली गाव येथील विदयार्थी समुहाने ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. गुणवंत विदयार्थी घडविणाऱ्या शाळांना सन्मानचिन्ह तसेच त्या शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रशस्तीपत्र आणि ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले.
Published on : 06-09-2023 13:37:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update