नवी मुंबईत 'निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस' उत्साहात साजरा






संयुक्त राष्ट्रसंघामार्फत 7 सप्टेंबर हा दिवस 'निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस' म्हणून जगभरात साजरा केला जात असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आठही विभाग कार्यालय क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबई शहर स्वच्छ हवा कृती आराखडा तयार केला असून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. याबाबतच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी 7 सप्टेंबर रोजीच्या आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले होते.
त्या अनुषंगाने शहर अभियंता श्री संजय देसाई यांच्या नियंत्रणाखाली, अतिरिक्त शहर अभियंता तथा या उपक्रमाचे नोडल अधिकारी श्री. शिरीष आरदवाड यांच्या नियोजनातून आठही विभाग कार्यालय क्षेत्रात तेथील सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ हवेच्या आंतरराष्ट्रीय दिवसानिमित्त स्वच्छता मोहिमा व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विभाग कार्यालयांप्रमाणेच पर्यावरण प्रयोगशाळा, अग्निशमन केंद्रे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळ अशा विविध ठिकाणी निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेच्या आंतरराष्ट्रीय दिवसानिमित्त वायु प्रदूषण टाळण्याची तसेच पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ ग्रहण करण्यात आली. यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकर्मी तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्था व पर्यावरणप्रेमी नागरिक यांनीही उत्साही सहभाग घेतला.
यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ठिकठिकाणी दर्शनी जागी जनजागृतीपर फलक लावण्यात आले असून त्यावर प्रवास करताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, वाहन खरेदी करताना व प्रवास करताना इलेक्ट्रिकल वा सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य द्यावे, आपल्या वाहनाची नियमितपणे पीयूसी तपासणी करावी, नवी मुंबई महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या युलू जन सायकल तसेच ई बाईक सहभाग प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा, बांधकामाचा राडारोडा इतरत्र न टाकता महानगरपालिकेच्या सी अँड डी वेस्ट प्रकल्पाला हस्तांतरित करावा, घर व हॉटेलमध्ये स्वच्छ इंधनाचा वापर करावा, जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी व त्यांची जोपासना करावी, नूतनीकरणयोग्य ऊर्जांचा वापर करावा असे विविध जनजागृतीपर संदेश प्रसारित करण्यात आले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ हवा कृती आराखड्यांतर्गत शहराची हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम व प्रकल्प राबवित असून सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी पर्यावरणशील दृष्टिकोन ठेवून या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 08-09-2023 08:02:34,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update