पीएम स्वनिधी से समृध्दी योजने अंतर्गत विशेष शिबिराला उत्तम प्रतिसाद



कोव्हीड काळात लॉकडाऊनमुळे फेरीवाले व पथविक्रेते यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेची सुरूवात करण्यात आली. कष्टकरी सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या उपजिविकेत मदतीचा हात देणाऱ्या या योजनेमध्ये नवी मुंबई महानगरपलिकेने लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यात व त्यांना लाभ मिळवून देण्यात चांगली कामगिरी केली आहे. याच योजनेचा पुढील भाग असलेली स्वनिधी से समृध्दी यामधील योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटीबध्द असून यादृष्टीने आयोजित विशेष शिबिराला मोठया संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद देणाऱ्या लाभार्थी घटकांचे अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ यांनी स्वागत केले.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जुईनगर येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सभागृहात केंद्र शासनाच्या पथविक्रेत्यांकरिता आत्मनिर्भर निधी अंतर्गत प्रधानमंत्री स्वनिधी से समृध्दी योजना एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ, केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार विभागाचे उप आयुक्त श्री. अनुप्रीत सिंग, ठाणे कामगार विभागाचे उपआयुक्त श्री. प्रदीप पवार व सहाय्यक आयुक्त श्री. दिनेश दाभाडे, महानगरपालिकेचे तुर्भे विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त श्री. भरत धांडे, समाजविकास अधिकारी श्री. सर्जेराव परांडे, बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या क्षेत्रीय व्यवस्थापक श्रीम. पुनम भराटे, शिधावाटप अधिकारी श्री.परदेशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार विभागाचे उपआयुक्त श्री. अनुप्रीत सिंग यांनी श्रमजीवी वर्गाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या स्वनिधी से समृध्दी मधील आठही योजनांचा लाभ मोठया संख्येने घेऊन या योजना यशस्वी कराव्यात असे आवाहन केले.
ठाणे कामगार विभागाचे उपआयुक्त श्री. प्रदीप पवार यांनी स्वनिधी से समृध्दी योजनांमधील पीएम श्रमयोगी मानधन योजना तसेच इमारत व इतर बांधकाम अंतर्गत नोंदणीकरण योजना या दोन योजनांची सविस्तर माहिती देत यातील आठ योजनांप्रमाणेच आणखी 26 कल्याणकारी योजना शासनामार्फत राबविल्या जात असल्याचे सांगितले व त्यांचाही लाभ घ्यावा असे आवाहन केले. कष्टकरी वर्गाची पुढची पिढी शिकून मोठी व्हावी व त्यांच्या कुटुंबाचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक स्तर उंचवावा हे या योजनांचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वनिधी से समृध्दी कार्यक्रम प्रभावी रितीने राबविण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता विशेष शिबिराचे आयोजन केले जात असल्याची माहिती या योजनेचे नियंत्रक श्री. तुषार पवार यांनी दिली.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सद्यस्थितीत 1971 फेरीवाल्यांचे सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण झालेले असून फेरीवाल्यांना व त्यांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना व रुपे कार्ड, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना, इमारत व इतर बांधकाम अंतर्गत नोंदणीकरण, एक राष्ट्र एक रेशन कार्ड, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना अशा विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. याकरिता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचा लाभार्थी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.
Published on : 08-09-2023 15:35:12,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update