* इकोफ्रेन्डली गणशोत्सव साजरा करताना नवी मुंबईत तब्बल 139 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती* *जलप्रदूषण टाळण्याचे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे आवाहन*



पर्यावरणपूरकतेची कास नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच धरलेली असून मोठया प्रमाणावर साजरा होणारा श्रीगणेशोत्सव पर्यावरणाची जपणूक करुन इकोफ्रेंडली स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने नवी मुंबईकर नागरिकांना यापूर्वीच करण्यात आले असून त्याला नागरिकांचा व गणेशोत्सव मंडळांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी श्रीगणेशोत्सवामध्ये मंडप उभारणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारण्याचा निर्णय जाहीर केला असून त्याचे सर्व गणेशोत्सव मंडळांनी स्वागत केले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सवामध्ये मंडप उभारण्याकरिता परवानगी मिळण्यासाठी मंडळांना अर्ज करण्यास 18 ऑगस्टपासून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयात विशेष कक्ष स्थापित करण्यात आला असून मंडळांना विहित कालावधीत परवानगी मिळावी याची खबरदारी घेतली जात आहे.
तलावातील जलप्रदूषण रोखण्यासाठी 14 मुख्य तलावातील जलाशयाच्या साधारणत: 30 टक्के भागात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत गॅबियन वॉल उभारण्यात आल्या असून या विशिष्ट क्षेत्रात नागरिकांनी श्रीमूर्ती विसर्जन करावे आणि जलप्रदूषण रोखावे या आवाहनासही सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या संकल्पनेचे राष्ट्रीय पातळीवर कौतुक करण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे इकोफ्रेन्डली गणेशोत्सव साजरा करण्याचे मंडळांना आवाहन करताना श्रीगणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळ विसर्जनस्थळे उपलब्ध व्हावीत याची खबरदारी घेत मोठया प्रमाणावर कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात येत आहे. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार शहर अभियंता श्री. संजय देसाई यांच्या नियंत्रणाखाली आठही विभागांमध्ये मध्यवर्ती ठिकाणी नागरिकांची मागणी व मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता कृत्रिम तलाव संख्येत गतवर्षाच्या तुलनेत पाचने वाढ करीत एकूण 139 कृत्रिम तलाव बनविण्यात येत आहेत.
या कृत्रिम तलावांच्या जागा परिमंडळ व अभियांत्रिकी विभागामार्फत निश्चित करण्यात आल्या असून त्याठिकाणी कृत्रिम तलाव उभारणीचे काम सुरु करण्यात आले आहे. यामध्ये बेलापूर विभागात 19, नेरुळ विभागात 24, वाशी विभागात 16. तुर्भे विभागात 17, कोपरखैरणे विभागात 15, घणसोली विभागात 21, ऐरोली विभागात 18 व दिघा विभागात 9 अशाप्रकारे एकूण 139 कृत्रिम विसर्जन तलाव उभारले जात आहेत. अशाप्रकारे पारंपारिक 22 व कृत्रिम 139 अशा 161 विसर्जन स्थळांवर भावपूर्ण वातावरणात श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 22 पारंपारिक विर्सजन स्थळे असून त्याठिकाणी होणारी भाविकांची गर्दी विभागली जावी व एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता मागील चार वर्षांपासून कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात येत आहे. या कृत्रिम तलावांना नागरिकांचा मिळणारा चांगला प्रतिसाद पाहता नागरिकांच्या सूचनेनुसार आवश्यकता लक्षात घेऊन कृत्रिम तलाव संख्येत प्रतिवर्षी वाढही करण्यात आलेली आहे. याही वर्षी मागील वर्षीच्या संख्येत पाचने वाढ करुन एकूण 139 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलेली आहे.
कृत्रिम तलावांमुळे नैसर्गिक जलस्तोतांतील जलप्रदूषणाला प्रतिबंध होऊन त्यांचे प्रदूषण कमी होत असते. नवी मुंबई हे स्वच्छ शहराप्रमाणेच पर्यावरणशील शहर म्हणून नावाजले जात असून या इतक्या मोठया संख्येने असलेल्या कृत्रिम तलावामुळे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने एक सकारात्मक यशस्वी पाऊल उचलले जात आहे. या संकल्पनेला उत्स्फुर्त प्रतिसाद देणाऱ्या नवी मुंबईकर नागरिकांचा याकामी महत्वाचा वाटा आहे.
मागील वर्षी कृत्रिम तलावामध्ये श्रीमूर्ती विसर्जनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. गतवर्षी एकूण 27808 इतक्या विसर्जित श्रीगणेश मूर्तींपैकी कृत्रिम तलावात 14090 इतक्या मोठ्या संख्येने श्रीमूर्ती विसर्जित करून नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या पर्यावरण विषयक जागरुकतेचा प्रत्यय दिला होता.
पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी श्रीमूर्ती शाडूची व पर्यावरणपूरक असेल याची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे श्रीमूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे अथवा नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी करावे. तसेच पीओपीची मूर्ती असल्यास त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे आणि पर्यावरणशील इकोफ्रेन्डली गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Published on : 11-09-2023 13:47:30,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update