श्रीगणेशोत्सव सुव्यवस्थित संपन्न होण्याकरिता नमुंमपा आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांचे सर्व यंत्रणाना दक्षतेचे निर्देश

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील श्रीगणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका व पोलीस यंत्रणा यांच्यासह सर्व प्राधिकरणे सज्ज झाली असून परस्पर समन्वय राखून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिले.
‘श्रीगणेशोत्सव 2023’ च्या पार्श्वभूमीवर नमुंमपा आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनविषयक बैठक महापालिका मुख्यालयात संपन्न झाली. यावेळी आयुक्तांनी प्रत्येक बाबीचा बारकाईने आढावा घेत तत्पर कार्यवाहीचे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार तसेच परिमंडळ 1 चे पोलीस उपआयुक्त श्री. विवेक पानसरे व वाहतुक पोलीस विभागाचे उपआयुक्त श्री. तिरूपती काकडे तसेच संबंधित विभागप्रमुख, सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकारी उपस्थित होते.
यामध्ये मंडपासाठी ऑनलाईन परवानगी अर्ज दाखल करणा-या मंडळांचा आढावा घेताना अर्ज भरणा मुदतीच्या अखेरच्या दिवसापर्यंत दाखल झालेल्या 205 अर्जांपैकी 138 मंडळांना आत्तापर्यंत परवानगी देण्यात आलेली असून 26 अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत. तसेच 41 अर्ज प्रलंबित असल्याची माहिती घेतल्यानंतर आयुक्तांनी प्रलंबित अर्जांची परवानगी प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे कोणतेही मंडळ परवानगी मिळाली नाही म्हणून उत्सव साजरा करू शकले नाही असे होऊ नये याची खातरजमा करून घ्यावी असेही आयुक्तांनी विभाग अधिकारी यांस निर्देश दिले.
शासन व नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यापूर्वीच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले असून त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात किती नागरिकांनी व मंडळांनी शाडूच्या मुर्तींची स्थापना केली याचीही आकडेवारी संकलीत करण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
याच अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 139 इतक्या मोठ्या संख्येने कृत्रिम तलावांची आठही विभागात निर्मिती करण्यात येत असून तेथील सुविधांकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. त्याचप्रमाणे नैसर्गिक 22 विसर्जन स्थळे तसेच 139 कृत्रिम विसर्जन स्थळे यांची स्थळनिहाय माहिती संबंधित पोलीस ठाण्यास द्यावी व पोलीस विभागाशी समन्वय राखावा असेही आयुक्तांनी सूचित केले.
सर्व विभाग अधिका-यांनी आपापल्या क्षेत्रातील विसर्जन स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करावी व तेथे आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
श्रीमूर्तींचे आगमन व विसर्जन मार्ग यांची बारकाईने पाहणी करावी. त्या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करावी, यामध्ये विशेषत्वाने अंतर्गत रस्त्यांप्रमाणेच वाहतुक पोलीस विभागाच्या सूचनेनुसार ठाणे बेलापूर मार्ग व सायन पनवेल मार्गावरही त्वरित दुरूस्ती करावी असे आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले. आवश्यक वृक्षछाटणी आणि रस्त्यांवरील दिवाबत्ती व्यवस्थेकडेही अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले.
सार्वजनिक मंडळांच्या आकाराने मोठ्या श्रीमूर्ती विसर्जित होतात तसेच विसर्जनासाठी येणा-या श्रीमूर्तींची संख्या जास्त असते अशा विसर्जनाच्या ठिकाणी तराफ्यांच्या संख्येत वाढ करण्याचेही आयुक्तांनी सूचित केले.
स्वच्छता ही आपली ओळख असून श्रीगणेशोत्सव काळात विसर्जन स्थळांप्रमाणेच शहरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. या कालावधीत फुले, पत्री, दुर्वा असे हरित निर्माल्य मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असल्याचे लक्षात घेत त्याच्या संकलनाची, वाहतुकीची व विल्हेवाटीची स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. विशेषत्वाने अनंतचतुर्दशीच्या अखेरच्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रीमूर्ती विसर्जनाचे मोठे प्रमाण लक्षात घेऊन त्याविषयीची खबरदारी घेऊन पूर्वतयारी करावी असेही आयुक्तांनी सतर्क केले.
मुख्य विसर्जन स्थळांवर रूग्णवाहिकेसह वैद्यकीय पथकांची नियुक्ती तसेच इतर विसर्जन स्थळांवर नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रांमार्फत वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्याचे आदेश देतानाच आयुक्तांनी त्याठिकाणी पुरेशी विदुयतव्यवस्था, पर्यायी जनरेटर व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचेही निर्देशित केले. श्रीगणेशोत्सव मंडपाच्या बाहेरील परिसराचे निर्जंतुकीकरण फवारणी करण्याच्या सूचना देतानाच आयुक्तांनी अग्निशमन दलासही सतर्क राहण्याचे निर्देश दिले.
‘श्रीगणेशोत्सव 2023’ च्या सुनियोजित आयोजनासाठी नवी मुंबई महानगरपालिका व नवी मुंबई पोलीस दक्ष असून भाविक भक्तजनांनीही श्रीगणेशोत्सव इकोफ्रेंडली पध्दतीने, सर्व नियमांचे पालन करून निर्विघ्नपणे संपन्न व्हावा याकरिता सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन करीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सर्व नागरिकांना श्रीगणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
Published on : 12-09-2023 16:01:27,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update