नवी मुंबई महानगरपालिकामार्फत तृतीयपंथीयांकरिता कोपरीत विशेष शौचालय

नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छतेच्या अनुषंगाने नेहमीच अभिनव संकल्पना राबविणारे शहर म्हणून ओळखले जाते. अशाच प्रकारचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून कोपरी येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तृतीयपंथीय नागरिकांसाठी स्वतंत्र विशेष शौचालय निर्मिती करण्यात आली असून ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत नुकतेच या विशेष शौचालायचे लोकार्पण अनिता वाडेकर, मीरा पुजारी, कल्पना पुजारी, बर्लिन, अदा झा या तृतीयपंथीयांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात 313 सार्वजनिक 297 सामुदायिक शौचालय उभारण्यात आलेली आहेत. सर्व शौचालयांच्या जागा गुगल मॅपवर दिसतात त्यामुळे नागरिकांना व विशेषत्वाने शहरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच पर्यटकांना प्रसाधनगृहांची सुविधा आपण आहोत त्या जागेपासून किती अंतरावर आहे हे क्षणार्धात समजते आणि त्यांना सुविधाजनक होते.
तृतीयपंथीय नागरिक हा देखील समाजाचा एक महत्वाचा घटक आहे हे नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच लक्षात घेतले असून स्वच्छता कार्यात व विविध सामाजिक उपक्रमात तृतीयपंथीयांचा सहभाग करून घेतलेला आहे. या कामात ‘लेट्स सेलिब्रेट फिटनेस’ या संस्थेचा समवयक म्हणून फार मोठ्या प्रमाणावर उपयोग झालेला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तुर्भे विभागातील कोपरी भागामध्ये तृतीयपंथीयांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असून त्या ठिकाणी तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालय असावे अशी मागणी केली जात होती.
या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी अभियांत्रिकी विभागास निर्देश दिले व कोपरी विभागामध्ये तृतीयापंथासाठी विशेष स्वतंत्र शौचालायची उभारणी करण्यात आली.
नैसर्गिक विधीकरिता तृतीयपंथीयांना पुरुषांसाठीच्या शौचालयाचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे तृतीयपंथीय नागरिक ज्या भागत मोठ्या संख्येने एकत्र राहतात अशा ठिकाणी त्यांच्याकरिता स्वतंत्र शौचालय व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. साधारणतः 9 लक्ष इतकी रक्कम खर्च करून हे 8 बैठकी शौचालय उभारण्यात आले असून त्याबद्दल तृतीयपंथीय नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
समाजातील सर्व घटकांना समान न्याय देत आवश्यक सेवासुविधा पुरविण्यावर नवी मुंबई महानगरपालिका भर देत असून तृतीयपंथाची अडचण लक्षात घेऊन त्यांच्याकरिता स्वतंत्र विशेष शौचालय बांधण्याचे आणखी एक उल्लेखनीय पाऊल नवी मुंबई महानगरपालिकेने उचललेले आहे.
Published on : 04-10-2023 15:41:15,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update