नागरिकांना सुयोग्य पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिकेचे विभागनिहाय वेळापत्रक नियोजन
नवी मुंबईकर नागरिकांना पुरेशा प्रमाणात समाधानकारक पाणीपुरवठा व्हावा याकरिता पाणी पुरवठयाचे सुयोग्य नियोजन करण्यात येत असून विभागनिहाय 6 ते 7 तास पाणीपुरवठा करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे व त्याची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. हे नियोजन प्रत्येक विभागातील जलकुंभ भरण्याच्या वेळांचे करण्यात आलेले आहे. नागरिकांना वितरित केले जाणारे पाणी सकाळी आणि संध्याकाळी पूर्वीप्रमाणेच केले जाणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पूर्वी सकाळी आणि संध्याकाळी संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रातील विविध विभागातील जलकुंभ एकाच वेळी भरले जात असल्याने पाण्याचा दाबाची समस्या जाणवत होती. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने जलवितरण प्रणालीचा बारकाईने अभ्यास करून जलकुंभ भरण्याचे विभागनिहाय वेळापत्रक तयार केले. त्याची माहिती महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यासमोर आढावा बैठकीत सादर करण्यात आली. या नवीन नियोजनानुसार सध्या पाणीपुरवठा प्रणाली राबविण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे.
स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे जलसमृध्द शहर ही नवी मुंबईची ओळख असून यावर्षी 24 सप्टेंबर रोजी मोरबे धरण पूर्णपणे भरले आहे. आज 19 ऑक्टोबर रोजी मोरबे धरणातील जलसाठा 184.38 द.ल.घ.मी. म्हणजेच 96 टक्के इतका आहे.
मोरबे धरणातून प्रतिदिन 450 द.ल.लि इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. मोरबे धरणातील पाण्यावर भोकरपाडा येथील जलशुध्दीकरण केंद्रामध्ये शुध्दीकरण प्रक्रिया करण्यात येत असून त्याचीही क्षमता 450 द.ल.लि. इतकी आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोरबे धरणातून दररोज 450 द.ल.लि. आणि एम.आय.डी.सीच्या बारवी धरणातून 80 द.ल.लि. इतक्या प्रमाणात दैनंदिन पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तथापि सध्या एम.आय.डी.सी कडून नवी मुंबई महानगरपालिकेस आवश्यक असलेल्या दैनंदिन 80 द.ल.लि. पाणी पुरवठ्याऐवजी प्रत्यक्षात 60 ते 65 द.ल.लि. इतकाच पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
त्यामुळे एम.आय.डी.सी कडून उपलब्ध् होणारे पाणी शिळ येथील जलकुंभात घेऊन ज्या दिघा, ऐरोली व घणसोली विभागातील काही क्षेत्रात वितरित केले जाते. तसेच एम.आय.डी.सी भागातील नेरुळ येथील शिवाजीनगर, बोनसरी, इंदिरा नगर, गणपतीपाडा, महापेगाव, पावणेगाव त्याचप्रमाणे घणसोली विभागातील रबाळे, कातकरीपाडा, भीमनगर, आंबेडकरनगर, वाल्मिकीनगर तसेच ऐरोली विभागातील चिंचपाडा, यादवनगर, गवतेवाडी आणि संपूर्ण दिघा विभाग क्षेत्र याठिकाणी 33 थेट नळजोडणींव्दारे वितरीत केले जाते. त्या भागातील नागरिकांच्या अपु-या पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत.
एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या झोपडपट्टी व गावठाण भागात एमआयडीसीमार्फत पाणी पुरवठा करण्यात येत असल्यामुळे सदर भागात पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी साठवण क्षमता वाढविण्याकरिता तुर्भे स्टोअर, हनुमान नगर, इंदिरानगर, गणपतीपाडा, कातकरीपाडा (भीमनगर) येथे नवीन जलकुंभ बांधण्याचे काम नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत हाती घेण्यात आले आहे.
परंतु सद्यस्थितीतीत सदर भागात एमआयडीसीकडून रात्रीच्या सुमारास अवेळी व अपु-या प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याबाबत तेथील नागरिकांच्या मोठया प्रमाणात तक्रारी येतात.
त्याचप्रमाणे घणसोली व ऐरोली भागात शिळ एम.बी.आर. येथे एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने सदर भागाची तूट भरुन काढण्यासाठी मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीतून या भागासाठी अतिरिक्त पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
ही परिस्थिती पाहता एमआयडीसीकडून होणा-या अपु-या पाणी पुरवठयात वाढ करण्यासाठी व या समस्येचे निवारण करण्याकरिता एम.आय.डी.सी कडून होणा-या अपु-या पाणी पुरवठयात वाढ करण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे सातत्याने विचारणा व पाठपुरावा सुरु असून महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर वरिष्ठ पातळीवरुन ही समस्या मार्गी लागण्यासाठी सतत पाठपुरावा करीत आहेत.
सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणातून महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना दररोज पूर्ण क्षमतेने 450 द.ल.लि. पाणी पुरवठा करण्यात येत असून दररोज प्रतिमाणसी 135 लीटर या राष्ट्रीय मानकाच्या तुलनेत अधिक प्रमाणात प्रतिमाणसी 220 लीटर इतका जास्त पाणीपुरवठा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा गरजेच्या गोष्टीसाठी सुयोग्य वापर करण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिका विविध माध्यमांतून सातत्याने आवाहन करीत आहे.
त्या अनुषंगाने उपलब्ध पाणी पुरवठयाचे योग्य रितीने नियोजन होण्याच्या दृष्टीने व नागरिकांना अधिक सुविधाजनक पध्दतीने पाणी पुरवठा व्हावा अशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे. पूर्वी विभागांमध्ये असलेल्या जलकुंभात सकाळी व सायंकाळी दोन वेळा जलपुरवठा करून तेथून नागरिकांना सकाळी व संध्याकाळी दोनवेळा पाणीपुरवठा केला जात होता. मात्र या प्रक्रियेत संपूर्ण शहरात सर्वत्र एकाच वेळी जलकुंभात पाणी साठवणुकीसाठी जल पुरवठा करण्यात येत असल्याने पाण्याचा दाब, भौगोलिक अंतर अशा विविध कारणांमुळे अनियमित व अपु-या पाणी पुरवठयाच्या तक्रारी प्राप्त होत होत्या.
त्या अनुषंगाने नवी मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीचा व जलवितरण व्यवस्थेचा शहर अभियंता श्री. संजय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा विभागाने विभागनिहाय बारकाईने अभ्यास केला व नागरिकांना सकाळी आणि संध्याकाळी पाणीपुरवठा करण्यासाठी जलकुंभ भरण्याच्या वेळांचे नवीन नियोजन केले.
त्यानुसार बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे भागात पहाटे 4.30 ते सकाळी 11.30 वा., घणसोली विभागात सायंकाळी 8.30 ते रात्री 2.00 वा. तसेच ऐरोली व दिघा विभागात दुपारी 2.00 ते पहाटे 4.00 वा. या वेळेत विभागनिहाय जलकुंभ भरले जाणार असल्याने एकाच वेळी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थापनावर येणारा ताण विभागला जाणार आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना पूर्वीच्याच प्रचलित वेळी पूर्वीसारखाच सकाळी व संध्याकाळी पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र या नवीन नियोजनामुळे नागरिकांना पुरेशा दाबाने समाधानकारक पाणीपुरवठा उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्याची ही नवीन प्रणाली राबविण्यास प्रायोगिक तत्वावर सुरूवात करण्यात आलेली आहे.
याशिवाय महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्येची झपाटयाने होणारी वाढ लक्षात घेता सन 2055 सालातील लोकसंख्येचा विचार करुन अतिरिक्त जलस्त्रोतांचा शोध घेण्यासाठी व योग्य पर्यांयांची निवड करण्याकडे महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी विशेष गांभीर्याने लक्ष दिले असून त्याकरीता तज्ज्ञ समितीचे गठन करण्यात आले आहे.
Published on : 20-10-2023 12:55:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update