विष्णुदास भावे नाट्यगृहातील ग्रंथालय निर्मिती कामाची पाहणी करत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मौलिक सूचना


‘सुशिक्षितांचे शहर’ ही आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबईची वेगळी ओळख असून वाचनाने मनुष्याचा सर्वांगीण विकास होतो हे लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेने वाचन संस्कृती विकसित होण्याकरिता सातत्याने विविध उपक्रम राबविले आहेत.
यामध्ये अधिक भर घालत वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहासारख्या कलात्मक ठिकाणी अद्ययावत ग्रंथालय निर्माण केले जात आहे. हे काम अखेरच्या टप्यात असताना महापालिका आयुक्त् श्री. राजेश नार्वेकर यांनी संबधित अधिका-यासह या कामाची पाहणी करत हे ग्रंथालय आकर्षक व वाचकांचे समाधान करेल अशा ग्रंथसंपदेने संमृध्द होण्याच्या दृष्टीने मौलिक सूचना केल्या.
संद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेची 20 ग्रंथालये शहरात ठिकठिकाणी कार्यान्वित असून त्यामधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील ग्रंथालय विशेष नावाजले जात आहे. याशिवाय ‘झोपडपट्टी तेथे ग्रंथालय’ या संकल्पनेंतर्गत 10 झोपडपट्टी विभागात नव्याने ग्रंथालय निर्मिती करण्यात येत असून त्यापैकी 3 ग्रंथालये कार्यान्वित झालेली आहेत. त्याचप्रमाणे बहुभाषिक असलेल्या नवी मुंबई शहरातील प्रत्येक वाचकाला आपापल्या भाषेतील उत्तम साहित्याचा आस्वाद घेता यावा यादृष्टीने सानपाडा येथे अत्याधुनिक ‘सेंट्रल लायब्ररी’ उभारली जात आहे.
याच धर्तीवर वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहासारख्या शहराचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी उत्तम ग्रंथसंपदेने नटलेले ग्रंथालय असावे ही संकल्पना पुढे आली व तेथील मुख्य प्रवेशव्दारातून आत आल्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या मोकळया पॅसेजमध्ये ग्रंथालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले. त्यास अनुसरुन द फर्म या नामांकित वास्तुविशारदांनी जगभरातील वेगळ्या स्वरूपाच्या ग्रंथालय रचनेचा अभ्यास करुन व नाटयगृहासारख्या सांस्कृतिक केंद्र असलेल्या ठिकाणी ग्रंथालय निर्मिती होणार आहे ही बाब लक्षात घेऊन आकर्षक व बहुउपयोगी ग्रंथालय निर्मितीचा आराखडा तयार केला. त्यानुसार मे महिन्याच्या अखेरीस कामाची सुरुवात करण्यात आली.
177 चौ.मी. च्या क्षेत्रफळामध्ये हे नाट्यगृहातील ग्रंथालय उभारण्यात आले असून येथे पुस्तके ठेवण्यासाठी आकर्षक शेल्फ, लक्षवेधी रंगसंगती व प्रकाशयोजना यामुळे ग्रंथवाचनाला पोषक वातावरण निर्मिती करण्यावर भर देण्यात आला आहे. साधारणत: 3500 हून अधिक पुस्तके सामावून घेईल असे हे ग्रंथालय असून त्याठिकाणी बसून वाचण्यासाठी टेबल आणि खुर्च्यांचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच वाचनासाठी पोषक अशी प्रकाशयोजना करण्यात आलेली आहे. त्यासोबतच सध्याच्या आधुनिक युगातील ऑडिओ व्हिज्युअल वाचनाला विशेषत्वाने युवा वर्गाकडून दिली जाणारी पसंती लक्षात घेत 8 संगणकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
गंथालय निर्मितीच्या नियोजनानुसार अंतिम टप्प्यात असलेल्या कामांचा बाबनिहाय बारकाईने आढावा घेताना आयुक्तांनी या ग्रंथालयात ठेवण्यात येणा-या पुस्तकांमध्ये मराठीसह इतरही भाषांमधील वाचनीय साहित्यकृतींचा समावेश असावा अशी सूचना करीत याठिकाणी पुस्तक खरेदीचाही पर्यांय उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी असे सूचित केले.
याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता श्री. संजय देसाई, समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, लेट्स रीड फाऊंडेशन या वाचन चळवळीचे प्रणेते श्री. प्रफुल्ल वानखेडे, कार्यकारी अभियंता श्री. अजय संखे व श्री. सुनिल लाड आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
विष्णुदास भावे नाटयगृहामध्ये नाटके पाहण्यासाठी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नेहमीच कला रसिकांची मोठया संख्येने उपस्थिती असते. त्यामुळे नाटयगृहासारख्या ठिकाणी जेथे रसिक नियमितपणे मोठया संख्येने येत असतात तेथे पुस्तकांनी समृध्द असे ग्रंथालय उपलब्ध करुन दिल्यास वाचन संस्कृतीच्या विकासाला नवी चालना मिळेल या भूमिकेतून हे ग्रंथालय उभारले जात असून यामुळे नवी मुंबईच्या नावलौकिकात लक्षणीय भर पडेल असा विश्वास आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.
Published on : 26-10-2023 11:21:28,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update