दिवाळी कालावधीत स्वच्छता, पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष देण्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे निर्देश
शाळांना दिवाळीच्या सुट्टया सुरु होत असून मुलांना सुट्टीच्या कालावधीत उदयानांमध्ये खेळण्याचा आनंद घेता यावा यादृष्टीने उदयान विभागामार्फत सुरु असलेली उदयानांमधील खेळणी दुरुस्तीची कामे जलद पूर्ण करावीत व मुलांचा सुट्टीचा आनंद व्दिगुणीत करावा असे निर्देश देत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईचे आकर्षण केंद्र असलेल्या वंडर्स पार्क मधील एका राइडचे सुरु असलेले कामही त्वरीत पूर्ण करुन घ्यावे अशा स्पष्ट सूचना दिल्या. त्यातही महत्वाचे म्हणजे बच्चे कंपनीचे विशेष आकर्षण असलेल्या टॉय ट्रेन सुरु करणेबाबत गतीमान कार्यवाही करावी असे आयुक्तांनी निर्देशित केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुरु असलेल्या व प्रस्तावित कामांचा सविस्तर आढावा विभागप्रमुखांच्या बैठकीत आयुक्तांनी घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतींची यादी तयार करण्यात यावी व त्या इमारती ज्या कारणासाठी बांधलेल्या आहेत तशा प्रकारचा वापर सुरु करण्याच्या दृष्टीने जलद कार्यवाही करावी असे निर्देश देतानाच आयुक्तांनी पुढील विभागप्रमुख बैठकीत त्याचा अहवाल सादर करावा असे निर्देश दिले.
त्यासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत बांधकाम सुरु असलेल्या इमारतींची सदयस्थिती, इमारत कधीपर्यंत बांधून पूर्ण होणार याची माहितीही उपलब्ध करुन देऊन ती इमारत ज्या प्रयोजनासाठी बांधली जात आहे अशा संबंधित विभागाने बांधकाम पूर्ण झाल्यावर ती लगेच लोकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आत्ताच नियोजनाच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही सुरु करावी असे निर्देश संबंधित विभागांना दिले.
कोपरखैरणे येथे से.14 व से.16 या ठिकाणी सुरु असलेले नागरी आरोग्य केंद्र इमारतीचे काम आगामी 15 ते 20 दिवसात पूर्ण होत असून त्याठिकाणी नागरी आरोग्य केंद्र प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक वैदयकिय मनुष्यबळ व औषध साठा आणि वैदयकिय उपकरणे उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने तत्पर कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
ऐरोली विभागात यादवनगर येथील शाळा इमारत बांधकाम पूर्ण झाले असून दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा नवीन इमारतीत भरेल यादृष्टीने कार्यवाही करण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे घणसोली येथील शाळा इमारत बांधून तयार असून त्याठिकाणीही दिवाळीनंतर शाळा सुरु करणेबाबत पाहणी करावी आणि कार्यवाही करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. इतर शाळांमधील सुरु असलेली किरकोळ दुरुस्तीची कामे शाळांच्या दिवाळीच्या सुट्टीत पूर्ण होतील याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
लिडार सर्वेक्षण, ईआरपी प्रणाली, सीसीटीव्ही यंत्रणा याविषयी संबंधितांची दिवाळीपूर्वी स्वतंत्र बैठक घेऊन या कामांना गती देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. त्याचप्रमाणे पार्कींग धोरण या अत्यंत महत्वाच्या विषयावर वाहतुक पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग यांची संयुक्त बैठक आयोजित करावी असेही निर्देश देण्यात आले.
केंद्र सरकारमार्फत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ हे अभियान उत्साहात राबविले जात असून यामध्ये लोकसहभागावर भर देण्यात यावा. त्याचप्रमाणे दिवाळीच्या काळात प्लास्टिक पिशव्या टाळून कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात यावे आणि विभाग कार्यालय पातळीवर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्यात याव्यात असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना समाधानकारक पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन केले असून त्या कार्यवाहीकडे लक्ष द्यावे तसेच दिवाळीच्या कालावधीत पुरेशा प्रमाणात योग्य दाबाने पाणीपुरवठा राहील याची काटेकोर दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एमआयडीसी मार्फत होणारा पाणीपुरवठाही योग्य प्रकारे होईल अशा प्रकारे एमआयडीसी प्राधिकरणालाही सूचित करण्यात यावे आणि नागरिकांना पाण्याबाबत त्रास होणार नाही याची काटेकोरक काळजी घ्यावी या बाबीकडे काळजीपूर्वक लक्ष दयावे असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
या सोबतच विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन त्यावर आवश्यक सूचना देत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी या बैठकीत दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल घेऊन विभागप्रमुखांच्या पुढील बैठकीत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.
Published on : 06-11-2023 12:57:25,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update