हरित दिवाळी साजरी करण्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे आवाहन
भारत सरकार अधिसूचना क्रमांक जी.एस.आर. 682(ई), दि. 05/10/1999 अन्वये 125 डेसिबल (एआय) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणा-या फटाक्यांचे उत्पादन, विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बेरियम सॉल्ट, लिथीयम, अर्सेनिक, लीड, मर्क्युरी यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे. या घटकांमुळे विषारी वायू तयार होतात आणि हे वायू प्राणी व वनस्पती या दोघांना घातक आहेत.
त्याचप्रमाणे जनहित याचिका क्र. 152 / 2015 मध्ये मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाके विक्रेत्यांनी विस्फोटक व अधिनियम 1884 आणि त्या अंतर्गत केलेले विस्फोटक नियम 2008 मधील प्रतिबंध व नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
त्यानुसार फटाके विक्रेत्यांनी बंदी असलेले फटाके विक्री करावयाची नाही, तसेच परवानगी असलेले फटाके महानगरपालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेऊनच विक्री करावयाची आहे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व फटाके विक्री करणारे व्यावसायिक व फटाके वापर करणारे नागरिक यांना करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाचे ‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ त्याचप्रमाणे ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ आणि ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण अभियान’ यांची अंमलबजावणी केली जात असताना फटाकेमुक्त, प्लास्टिकमुक्त, कचरामुक्त, प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक हरित सण – उत्सव (ग्रीन फेस्टिवल) साजरे करणे अपेक्षित आहे.
या अभियानांतर्गत नागरिकांनी फटाक्यांचा वापर टाळावा, त्यासोबत प्लास्टिकचाही वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा. त्याचप्रमाणे सण - समारंभामध्ये टाकाऊ वस्तूंचा व पुनर्वापर करण्यायोग्य वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करावा आणि हा दिवाळी उत्सव पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त असा हरित दिवाळी म्हणून साजरा करावा असे आवाहन करीत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी हा दीपोत्सव सर्व नागरिकांना आनंदी व सुरक्षित जावो अशा शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.
Published on : 07-11-2023 08:34:59,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update