नवी मुंबईतील महिला बचतगट प्रतिनिधींची मोरबे धरणाच्या भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्रावर ‘जल दिवाळी’





केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने अमृत 2.0 अभियानांतर्गत प्राप्त निर्देशानुसार ‘जल दिवाळी’ साजरी करण्यात येत आहे. त्यानुसार नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या सहयोगाने ‘पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी (Women for Water, Water for Women) अभियान’ राबविले जात आहे.
याबाबत महाराष्ट्र शासनाचे नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्यामार्फत प्राप्त सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना पाण्याच्या गुणवत्ता चाचणी प्रक्रियेबद्दल माहिती मिळावी व पाण्याच्या पायाभूत सुविधांबाबत आपलेपणा निर्माण व्हावा या उद्देशाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘जल दिवाळी’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पाचे भोकरपाडा येथील जल शुध्दीकरण केंद्र याठिकाणी महानगरपालिका क्षेत्रातील 25 महिला बचतगटांच्या प्रतिनिधींना नेऊन तेथील कार्यप्रणालीची संपूर्ण माहिती करुन देण्यात आली.
मोरबे धरणात जमा झालेले पाणी जल शुध्दीकरण केंद्रात आल्यानंतर त्यावर होणारी शुध्दीकरण प्रक्रिया व त्यानंतर घरापर्यंत केले जाणारे जल वितरण याची सविस्तर माहिती या महिला प्रतिनिधींना देण्यात आली. आमच्या घरातील नळातून येणारे पाणी इतक्या प्रक्रियेतून जाते याचे अप्रुप या महिलांनी व्यक्त केले. या भेटीमुळे महिलांना जलशुध्दीकरण प्रक्रियेची व जलवितरणाची प्रत्यक्ष पाहणी व माहिती ग्रहण करण्याच्या माध्यमातून संवाद साधण्याची संधी निर्माण झाली आणि सर्वसमावेशकता आणि सहभाग याला चालना देण्याचा अभियानाचा उद्देश सफल झाला. या ‘जल दिवाळी’ कार्यक्रमांतर्गत सहभागी महिलांना स्टीलची पाणी बॉटल, ग्लास आणि कापडी पिशवी भेट देण्यात आली.
नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त श्री. मनोज रानडे यांनी या उपक्रमाचा शुभारंभ केला. महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर अभियंता श्री. संजय देसाई, समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील यांच्या नियंत्रणाखाली ‘जल दिवाळी’ उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. नागरिकांना गुणवत्तापूर्ण पाणी उपलब्धतेची खात्री करुन देणारे व पाणी गुणवत्तेच्या चाचणीबाबत महिलांना शिक्षीत करणारे ‘पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी (Women for Water, Water for Women)’ हे अभियान नवी मुंबईतील महिलांना जलविषयी आश्वस्त करणारे आहे.
Published on : 08-11-2023 14:15:59,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update