सुजाण नागरिक निर्माण करणाऱ्या संविधानाचे महत्त्व जाणूया - प्रा. अविनाश कोल्हे
सुजाण नागरिक निर्माण करण्यामुळे लोकशाहीचा पाया मजबूत होतो हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला विचार लक्षात घेऊन संविधान साक्षरता वाढविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले गेले पाहिजेत असे सांगत सुप्रसिद्ध साहित्यिक, संविधान अभ्यासक श्री. अविनाश कोल्हे यांनी नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने विविध विषयांवर व्याख्याने आयोजित करुन जो वैचारिक जागर करीत आहे तो प्रशंसनीय व इतरांनी अनुकरण करावा असा असल्याचे मत व्यक्त केले.
'ज्ञानस्मारक' म्हणून नावाजल्या जात असलेल्या ऐरोलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात नमुंमपा आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिनाचे औचित्य साधून 'विचारवेध' या व्याख्याने शृंखले अंतर्गत 'भारतीय संविधान : इतिहास, वारसा आणि वैशिष्ट्ये' या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी प्रा.अविनाश कोल्हे यांनी अतिशय सहज सोपी उदाहरणे देत संविधानाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व उलगडून दाखविले.
भारतीय नागरिकांना आपले स्वातंत्र्य आणि जगण्याचे अधिकार व हक्क तसेच नागरिकांची कर्तव्य याचे स्पष्ट आणि सखोल मार्गदर्शन करणारी आपली राज्यघटना ही समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय व्यवस्था अशी मूलतत्त्वे स्पष्ट करते असे त्यांनी विविध उदाहरणे देत सांगितले.
15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटना निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली आणि 21 फेब्रुवारी 1948 मध्ये घटनेचा अधिकृत पहिला मसुदा प्रकाशित करण्यात आला व जनतेला मसुद्यात सुधारणा सुचवण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी देण्यात आला. त्यानंतर ऑक्टोबर 1948 मध्ये दुसरा मसुदा आणि 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडण्यात आला अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यघटनेच्या अंतिम मसुद्याची तीन वाचने झाली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या संमतीचा ठराव मांडला आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी हा ठराव मंजूर होऊन घटना स्वीकृत करण्यात आली. घटना निर्मितीला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले अशी माहिती देत या स्वीकृत घटनेमध्ये 22 भाग 395 कलमे व 8 अनुसूचींचा समावेश होता असे त्यांनी सांगितले.
मसुदा समितीने जगातील 60 देशांच्या घटनांचा अभ्यास करून आपली राज्यघटना निर्मिती झालेली असल्याने ती सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगत घटना निर्मितीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सखोल अभ्यासपूर्ण योगदानाचा त्यांनी विशेष उल्लेख केला. इतर देशांच्या कायद्यांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर आपली घटना निर्मिती करताना त्यात या देशाच्या मातीचा, सर्वसमावेशक अशा सर्वधर्मसमभावी संस्कृतीचा गंध व रंग असला पाहिजे हे बाबासाहेबांनी जाणले होते, त्यामुळे आपली राज्यघटना वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे प्रा.अविनाश कोल्हे म्हणाले.
संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही तर ती राज्यघटना आहे, कारण त्यात देश कसा चालेल, यासोबत कशासाठी चालेल, हे देखील उधृत केलेले आहे. त्यामुळे आपल्या विद्यमान राज्यघटनेचा विचार करताना त्यापूर्वी आपल्या देशात कोणकोणते कायदे होते याचाही बारकाईने ऐतिहासिकदृष्ट्या अभ्यास केला पाहिजे असे सांगत प्रा. अविनाश कोल्हे यांनी 1773 मधील रेग्युलेटिंग अॅक्ट पासून 1949 मधील राज्यघटना निर्मितीआधी त्या त्या काळात अस्तित्वात असलेल्या 1833, 1892, 1909, 1919, 1935, 1947 अशा विविध टप्प्यांवरील कायद्यांची सविस्तर उदाहरणे देत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
140 कोटी नागरिकांचा विचार करून हा देश चालविणे ही सोपी गोष्ट नाही असे सांगत त्यांनी राज्यघटनेमध्ये विविध टप्प्यांवर झालेल्या बदलांचाही आढावा घेतला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शिक्षण विभागाचे उपायुक्त श्री. दत्तात्रय घनवट यांनी व्याख्याते अविनाश कोल्हे यांचे स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी श्री. महेंद्र कोंडे यांनी नेटके सूत्रसंचालन केलेल्या या व्याख्यानाप्रसंगी प्रा. अविनाश कोल्हे यांनी स्मारक बघितल्यानंतर कल्पकतेने बांधलेली व सांभाळलेली देखणी स्मारक वास्तू पाहून मन प्रसन्न झाले असा अभिप्राय व्यक्त करीत प्रत्येकाने हे स्मारक पाहण्यासाठी अवश्य यावे असे आवाहन केले.
Published on : 01-12-2023 13:06:49,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update