जागतिक एड्स दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन
नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम 24 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, 3 सार्वजनिक रुग्णालये व 2 माता बाल रुग्णालयांमार्फत राबविण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात वाशी, ऐरोली व नेरुळ ही 3 सार्वजनिक रुग्णालये तसेच माता बाल रुग्णालय तुर्भे व कोपरखैरणे येथे सन 2002 पासून आयसीटीसी केंद्र कार्यान्वित असून सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे ॲन्टी – रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी केंद्र) सन 2009 पासून कार्यान्वित आहे. याठिकाणी नमुंमपा कार्यक्षेत्रातील तसेच नमुंमपा क्षेत्राबाहेरील उपचारार्थ येणाऱ्या रुग्णांची एचआयव्ही तपासणी, त्यांचे समुपदेशन आणि मोफत औषधोपचारांची नियमित सेवा दिली जाते.
दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जगभरात जागतिक एड्स दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी 1 डिसेंबर 2023 रोजी संपन्न झालेल्या जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य ‘समाजाच्या पुढाकाराने करू एच आय व्ही / एड्सचा समूळ नाश (Let Communities Leads)’ हे होते. त्यानुसार राष्ट्रीय एड्स कार्यक्रमांतर्गत एड्सचा समूळ नाश करण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवण्यात आले असून त्यासाठी समाजाचा पुढाकार अपेक्षित आहे.
त्या अनुषंगाने 1 डिसेंबर 2023 रोजी नमुंमपा क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात आले व जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. यामध्ये महापालिका आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या वतीने निबंध व चित्रकला स्पर्धा, रॅली, महाविद्यालयांमध्ये जनजागृती, पथनाटय तसेच आहारतज्ज्ञ यांच्यामार्फत रुग्णांना आहाराबाबत मार्गदर्शन, रुग्णांना फळ वाटप व समुपदेशन अशा विविध कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले.
जागतिक एड्स दिनानिमित्त HIV–TB समन्वय अंतर्गत एनटीईपी मध्ये उत्कृष्ट काम केल्याबदृल नवी मुंबई महानगरपालिकेस व्दितीय क्रमांक प्राप्त झाला असून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. या व्यतिरिक्त सार्वजनिक रुग्णालय, वाशी आयसीटीसी यांना प्रथम क्रमांक व सार्वजनिक रुग्णालय नेरुळ आयसीटीसी यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला असून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
जागतिक एड्स दिनानिमित्त नागरिकांनी आपली एचआयव्ही स्थिती जाणून घ्यावी तसेच एचआयव्हीचा कलंक आणि भेदभाव याविरुद्ध ठामपणे उभे राहून एचआयव्ही बाधित समुहाला पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यासोबतच याबाबतच्या आधिक माहितीसाठी 1097 या क्रमांकावर संपर्क साधावा असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.
Published on : 06-12-2023 15:07:19,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update