नवी मुंबईच्या पार्कींग नियोजनासाठी आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांचे गतीमान कार्यवाहीचे निर्देश.
सध्या गाड्यांचे प्रमाण वाढल्याने सर्व शहरांसमोर गाड्यांच्या पार्कींगची बिकट समस्या उभी राहिलेली दिसून येते. नवी मुंबई शहरातही वाहने उभी करण्याची समस्या असून ती दूर करण्यासाठी नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर बारकाईने लक्ष देत आहेत. यादृष्टीने महानगरपालिकेचा संबंधित विभाग तसेच वाहतुक पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यासमवेत नियमित बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत सेक्टर 15, सीबीडी बेलापूर येथे 6900 चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर तसेच सेक्टर 30 ए, वाशी येथे हॉटेल तुंगा समोर 11300 चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर वाहनतळ विकसीत करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या दोन्ही वाहनतळांची जागा रेल्वे स्टेशनजवळ असून या परिसरात मल्टीनॅशनल कंपन्यांची कार्यालये, हॉटेल्स, व्यावसायिक दुकाने अशी वाहनांच्या दृष्टीने वर्दळ असून या वाहनतळांचा फायदा वाहनांच्या मालक, चालकांना तर होईलच शिवाय या भागातील वाहने उभी करण्याच्या नियोजनालाही लाभदायी ठरेल.
या वाहनतळाच्या जागा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी आढावा बैठक घेत तत्परतेने सर्वेक्षण करुन जलद कार्यवाही करण्याचे निर्देश अभियंत्रिकी व मालमत्ता विभागांना दिले.
हे दोन्ही वाहनतळ शासन व खाजगी संस्था भागिदारी (Public Private Partnership) तत्वावर विकसीत करण्याचे नियोजन असून याबाबतचे सादरीकरण आयुक्तांसमोर करण्यात आले. या अंतर्गत संस्थेमार्फत वाहतुकीची वर्दळ, वाहनतळाच्या जागेची रचना व उपलब्धता तसेच सध्या त्या परिसरात वाहने उभी करण्यासाठी वापरली जाणारी पध्दती अशा विविध बाबींचा बारकाईने अभ्यास केला जाणार आहे. सध्या कार्यालये व इतर व्यावसायिक गोष्टीने गजबजलेल्या या भागात मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्याच्या कडेला उभी केल्याचे दिसून येत असून त्यामुळे वापर करावयाच्या रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूकीला ब-याच ठिकाणी अडचण निर्माण होत आहे. यावर उपाययोजनेच्या दृष्टीने हे दोन्ही वाहनतळ उपयोगी ठरणार आहे.
या भागातील सध्याच्या वाहतुकीचा विचार करण्यासोबतच या ठिकाणी भविष्यात होणा-या विकासाचाही व त्यामुळे वाढणा-या वाहनांच्याही विचार करावा असे आयुक्तांनी सूचित केले.
सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध ठिकाणी वाहनतळासाठी निश्चित केलेले दर यांच्याही तौलनीक अभ्यास करावा व याबाबत आय.आय.टी कडूनही दर तपासून घ्यावेत असे निर्देश आयुक्तांनी दिले.
वाहनतळ कार्यान्वित करण्याचे नियोजन करताना विविध पर्यायांचा विचार करावा अशी सूचना आयुक्तांनी केली तसेच प्रत्येक टप्प्यावरील सर्वेक्षण काटेकोरपणे करावे असे सूचित केले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता श्री.संजय देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.सत्यावान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक श्री.जितेंद्र इंगळे, मालमत्ता विभागाचे उपायुक्त डॉ.राहुल गेठे, सहाय्यक संचालक नगररचना श्री.सोमनाथ केकाण, कार्यकारी अभियंता श्री.अरविंद शिंदे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Published on : 04-01-2024 12:33:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update