'माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत सीडबॉलचे वाटप व लोकसहभागातून स्वच्छता मोहीम संपन्न
शहर स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरण संरक्षण व संवर्धनाकडे विशेष लक्ष देणारी नवी मुंबई महानगरपालिका क वर्ग महानगरपालिकांमध्ये राज्यातील प्रथम क्रमांकाची पर्यावरणशील महानगरपालिका म्हणून नावाजली गेली आहे. या अनुषंगाने पर्यावरण जपणुक व संवर्धन कार्यात नेहमीच जनतेचा मोठ्या प्रमाणावर सहभाग करून घेण्यात येत असतो.
त्याच प्रकारचा एक अभिनव उपक्रम नवी मुंबई महानगरपालिका व माता अमृतानंदमयी मठ, नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत राबविण्यात आला असून त्यामध्ये 'बीज चेंडू अर्थात सीडबॉल' वितरणाच्या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी उपस्थितांना माझी वसुंधरा अभियानाची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी दिली व जनतेने यामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी सीडबॉल वितरणाप्रमाणेच ज्वेल ऑफ नवी मुंबई या पर्यटनस्थळी 300 हून अधिक एनएसएसच्या विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या सहभागातून परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी उपस्थित 400 हून अधिक विद्यार्थी व नागरिकांना सीडबॉलचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री.शशिकांत तांडेल, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. विनायक जुईकर, स्वच्छता अधिकारी श्री. सूर्यकांत म्हात्रे व श्री. राजेंद्र इंगळे, पर्यावरण तज्ज्ञ श्री. भगवान केशव्वात, माता अमृतानंदमयी मठाचे स्वामी अव्ययामृतानंद पुरी, ललितामाई तसेच तेरणा इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे, एसआयईएस महाविद्यालयाचे, एस के महाविद्यालयाचे एनएसएसचे विद्यार्थी आणि अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published on : 04-01-2024 12:46:34,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update