कोपरखैरणे येथे दोन आकांक्षी शौचालयांतून टाकाऊपासून टिकाऊ संकल्पनेचा आकर्षक अविष्कार
स्वच्छता आणि सुशोभिकरणाकडे प्राधान्याने लक्ष देणारी नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच स्वच्छताविषयक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यामध्ये आघाडीवर राहिलेली आहे. अशाच प्रकारचे एक अभिनव शौचालय टाकाऊतून टिकाऊ या संकल्पने अंतर्गत कोपरखैरणे, सेक्टर 14 येथे उभारण्यात आले असून शासनाच्या निकषानुसार बनविण्यात आलेल्या या आकांक्षी शौचालयाचे (Aspirational Toilet) लोकार्पण महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील, कार्यकारी अभियंता श्री. विजय राऊत, श्री. सुधाकर मोरे तसेच सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. सुनिल काठोळे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
घनकचरा व्यवस्थापनात कच-याचा पुनर्वापर ही एक महत्वाची बाब असून कोपरखैरणे येथे आकांक्षी शौचालय उभारताना 426 चौ.मी. क्षेत्रफळाच्या पुनर्प्रक्रियाकृत प्लास्टिक शीटचा वापर करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 5.30 मेट्रिक टन एकल वापर प्लास्टिकचा (Single Use Plastic) वापर करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे शौचालयाची सजावट 11 हजार 700 हून अधिक प्लास्टिक बाटल्यांचा वापर करुन करण्यात आली असून त्यातही लक्षवेधी बाब म्हणजे या शौचालयातील विविध सांकेतिक चिन्हे 35 हजार 200 हून अधिक बाटल्यांच्या झाकणांचा कलात्मक वापर करुन निर्माण करण्यात आलेली आहेत.
शौचालय सजावटीसाठी संगणकाच्या 85 की - बोर्डचा उपयोग करण्यात आलेला आहे. तसेच शौचालयासमोर तयार करण्यात आलेल्या आकर्षक वाहन प्रतिरूपासाठी 284 किलो इतक्या वजनाच्या टाकाऊ लोखंडी वस्तूंचा वापर करण्यात आलेला आहे. शौचालयासमोर नयनरम्य कारंजे उभारण्यात आले असून या कारंज्यासाठी प्रक्रियाकृत सांडपाण्याचा वापर करण्यात येत आहे. अशा सर्वच बाबींमध्ये टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आलेला असून हे शौचालय थ्री आर संकल्पनेचे उत्त्म उदाहरण आहे.
75 चौ.मी. क्षेत्रफळाच्या शौचालय बांधकामात पुरुषांसाठी 4 शौचकुपे व 1 स्नानगृह आणि 3 मुता-यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच महिलांकरीता 3 शौचकुपे व 1 स्नानगृह आणि 1 बेबी टॉयलेट व्यवस्था करण्यात आलेली आहे. महिलांसाठीच्या शौचालय व्यवस्थेत बेबी केअर सुविधा तसेच सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन, इन्सिनिरेटर, हॅन्ड ड्रायर अशा सुविधा देण्यात आलेल्या आहेत. दिव्यांगासाठी स्वतंत्र शौचकुपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशी माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.
अशाच प्रकारचे आकांक्षी शौचालय सेक्टर 19 कोपरखैरणे येथे धारण तलावाजवळ उभारण्यात आलेले असून या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेने टाकाऊ पासून टिकाऊ रचनेचा नवा अविष्कार घडविलेला आहे.
Published on : 05-01-2024 08:43:44,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update