‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला दिघा - ऐरोली विभागात उत्स्फुर्त प्रतिसाद
17 डिसेंबरपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली असून सकाळी दिघा येथे संपन्न झालेल्या यात्रेच्या शुभारंभप्रसंगी 1 हजाराहून अधिक नागरिकांनी सहभागी होत उत्साही प्रतिसाद दिला. यावेळी महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी केलेल्या आवाहनास अनुसरुन दिघा विभाग कार्यालयाजवळील दुपारच्या दुस-या सत्रातही परिसरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती जाणून घेतली तसेच काही नागरिकांनी अर्ज भरले व योजनांचा लाभही घेतला.
17 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत दिघा विभाग कार्यालयाजवळ झालेल्या यात्रेच्या दुस-या सत्रात माजी आमदार श्री. संदीप नाईक यांनी उपस्थित राहून योजनांचा लाभ घेण्याचे व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत यात्रेची माहिती पोहचविण्याचे आवाहन केले. यावेळी सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांच्यासह उपस्थितांनी ‘आपला संकल्प विकसित भारत’ शपथ ग्रहण केली. याठिकाणी परिमंडळ 2 विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, सहा.आयुक्त जयंत जावडेकर, माजी नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या ठिकाणी 521 नागरिकांनी नोंद करुन यात्रेच्या उपक्रमात सहभाग घेतला.
अशाचप्रकारे 18 डिसेंबर रोजी, सकाळी 10 ते 1 या वेळेत यादवनगर, ऐरोली येथे अतिरिक्त आयुक्त् श्री. विजयकुमार म्हसाळ यांच्या उपस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेचे दुस-या दिवसाचे पहिले सत्र 1 हजार 180 नागरिकांच्या मोठया संख्येने उपस्थितीत उत्साहाने संपन्न झाले. ऐरोली विभागाचे विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त श्री. अशोक अहिरे आणि त्यांच्या सहका-यांनी केलेल्या नियोजनबध्द व्यवस्थेमुळे इतक्या मोठया प्रमाणात गर्दी जमूनही यात्रेचा कार्यक्रम अत्यंत व्यवस्थित रितीने पार पडला. यावेळी माजी नगरसेवक रामआशिष यादव व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणा-या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये एलईडी व्हॅनव्दारे पंतप्रधान महोदयांचा संदेश प्रसारित केला जात असून केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली जात आहे. याशिवाय तेथे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती देणारे व अर्ज नोंदणी करणारे स्टॉल लावण्यात आले असून नागरिक या स्टॉलला भेटी देऊन योजनांची माहिती जाणून घेत आहेत तसेच अर्जही दाखल करुन घेतले जात आहेत.
उदया दि. 29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 ते 1.00 या वेळेत ही यात्रा इच्छापूर्ती गणेश मंदिर, से.15, ऐरोली येथे तसेच दुपारच्या दुस-या सत्रात दुपारी 3.00 ते 6.00 या वेळेत ॲपल हॉस्पिटल जवळ, से.8 ए, ऐरोली येथे आयोजित केली जाणार असून यामध्ये नागरिकांना योजनांची माहिती व त्याचे लाभ उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे शनिवार 30 डिसेंबर रोजी, सकाळी 10.00 ते 1.00 या वेळेत, ऐरोली विभाग कार्यालय तसेच दुपारी 3.00 ते 6.00 या वेळेत नमुंमपा शाळा क्र.55, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, रबाळे येथे यात्रेचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तरी या स्थळांची नोंद घेऊन त्या परिसरातील नागरिकांनी केंद्र व राज्य शासनाच्या तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी व त्याचा लाभ घेण्यासाठी यात्रा स्थळांवर आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 05-01-2024 13:36:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update