नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राजेश नार्वेकर यांनी मंजूर केला सन 2023-24 चा सुधारित व सन 2024-25 चा मूळ जनसुविधाप्रधान लोककल्याणकारी अर्थसंकल्प
नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2023-24 चा सुधारित आणि सन 2024 - 25 चा मूळ अर्थसंकल्पीय अंदाज महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. राजेश नार्वेकर यांनी मंजूर केला. मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ तसेच इतर विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत अंदाजपत्रकाची प्रत महापालिका आयुक्तांकडे सादरकेली.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार जमा व खर्चाचे अंदाज आरंभीची शिल्लक रु. 1547.60 कोटी व जमा रू. 3238.58 कोटी अशी मिळून एकत्रित जमा रु. 4786.18 कोटी आणि रु. 3408.50 कोटी खर्चाचे सन 2023-24 चे सुधारित अंदाज,
तसेच रू. 1377.68 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह जमा रु.4950 कोटी व रु.4947.30 कोटी खर्चाचे आणि रु.2.70 कोटी शिलकेचे नवी मुंबईमहानगरपालिकेचे सन 2024-25 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज मंजूर करण्यात आले.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे अंदाजपत्रक परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश कडुसकर व उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. तुषार दौंडकर यांनी आयुक्तांकडे सादर केले व मंजूर करण्यात आले.
तसेच नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाचे अंदाजपत्रक वृक्ष प्राधिकरण सचिव तथा उद्यान विभागाचे उपआयुक्त श्री.दिलीप नेरकर यांनी आयुक्तांकडे सादर केले व तेही मंजूर करण्यात आले.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महापालिका आयुक्त तथा प्रशासकश्री. राजेश नार्वेकर यांच्या निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे :-
* आरोग्य, शिक्षणास प्राधान्यक्रम देतानाच स्वच्छता, पर्यावरण, वाहतुक सुविधा, लोककल्याणकारी योजनांवर भर.
* कोणतीही करवाढ न करता नागरिकांच्या हिताला प्राधान्य.
* नागरी सुविधा पूर्ततेसाठी आवश्यक खर्चाकरिता उत्पन्नवाढीच्या विविध उपाययोजनांवर भर.
* सुरू असलेले प्रकल्प कामाचा दर्जा राखून जलद पूर्ण करण्याचे नियोजन.
* शहर विकासाला गती देत जनसुविधांना प्राधान्य देणारा लोककल्याणकारी अर्थसंकल्प.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे अर्थसंकल्पीय अंदाजाबाबत निवेदन
देशातील अग्रमानांकित ‘स्वच्छ व सुंदर शहर’ अशी ओळख असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2023-24 चे सुधारित आणि सन 2024-25 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमानुसार, शहर विकासाच्या नवीन संकल्पना मांडत सादर करताना विशेष आनंद होत आहे.
दर्जेदार सेवासुविधांची उपलब्धता आणि इतर शहरांशी सहज जोडणारी दळणवळण व्यवस्था यामुळे ‘उत्तम निवासयोग्य शहर’ ही नवी मुंबईची ओळख दृढ झालेली आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबईने नेहमीच आपले मानांकन उंचावत ठेवले आहे. याही वर्षी 2023 च्या स्वच्छ सर्वेक्षणात ‘देशातील द्वितीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे मानांकन’ नवी मुंबई महानगरपालिकेने संपादन केले आहे.
त्यासोबतच कचरामुक्त शहराच्या ‘गार्बेज फ्री’ कॅटेगरीमध्ये नवी मुंबईने देशात सर्वोच्च ‘सेव्हन स्टार मानांकन’ प्राप्त केले असून असे मानांकन प्राप्त करणारे नवी मुंबई हे देशातील केवळ दोन शहरांमधील एक व राज्यातील एकमेव शहर आहे. ओडीएफ कॅटेगरीमध्येही नवी मुंबईने आपले सर्वोच्च ‘वॉटर प्लस मानांकन’ कायम राखले आहे.
याशिवाय केंद्र सरकारच्या ‘इंडियन स्वच्छता लीग’ अंतर्गत ‘स्वच्छ नवी मुंबई मिशन’चे ब्रँड ॲम्बेसेडर तथा जगप्रसिध्द संगीतकार, गायक पद्मश्री शंकर महादेवन यांच्या नेतृत्वाखाली ‘नवी मुंबई इको क्नाईट्स’ या नवी मुंबईच्या संघाने स्वच्छता लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे.
या लीग अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 3 अभिनव उपक्रमांची विक्रमी नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ मध्ये झालेली आहे.
यामध्ये - 1 लाख 14 हजाराहून अधिक नागरिकांनी शहरातील आठ विभागांत एकाच वेळी एकत्र येत ‘स्वच्छता शपथ’ घेतली, तसेच ‘खारफुटी स्वच्छता मोहीम’ राबविली.
26 हजारहून अधिक नागरिकांनी वंडर्स पार्क, नेरुळ येथे ‘एका दिवसात स्वच्छतेची डिजीटल शपथ ग्रहण’ केली.
त्याचप्रमाणे ‘स्वच्छ चित्रकला स्पर्धा’ यामध्ये 2 लक्ष 83 हजार 144 विद्यार्थ्यांनी सहभागी होत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.
याशिवाय, महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस ‘क’ वर्ग महानगरपालिकांमध्ये ‘राज्यातील प्रथम क्रमांकाचे पर्यावरणशील शहर’ म्हणून गौरविण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा’ यामध्येही नवी मुंबई ‘क’ वर्ग महानगरपालिकांमध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.
त्यासोबतच प्रतिथयश प्रसारमाध्यमांच्या वतीने स्वच्छता व सुशोभिकरण क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल आणि पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचा गौरव करण्यात आलेला आहे.
यात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ‘फिच’ या आर्थिक मूल्यमापन करणा-या राष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने नवी मुंबई महानगरपालकेस सर्वोच्च ‘डबल ए प्लस (AA+)’ मानांकन सातत्याने आठव्या वर्षी मिळालेले असून ही नवी मुंबईच्या आर्थिक सक्षमतेवर उमटलेली नाममुद्रा आहे.
कोणतेही पुरस्कार हे आपण केलेल्या कामाचे मूल्यमापन करुन मिळत असल्याने हे एक प्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्तम कामगिरीवर शिक्कामोर्तबच आहे.
या सर्व पुरस्कार, सन्मान, यशाचे खरी मानकरी आहेत ते महानगरपालिकेच्या प्रत्येक उपक्रमात उत्साहाने सहभागी होणारे येथील आबालवृध्द नवी मुंबईकर नागरिक, लोकप्रतिनिधी, स्वच्छता मित्र, सफाई मित्र, विविध स्वयंसेवी संस्था – मंडळे, प्रसारमाध्यमे तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारीवृंद. अशा सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नातून व एकात्म सहभागातून नवी मुंबईची सर्वच क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरु आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच यावर्षीही अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारची करवाढ करण्यात आलेली नाही. मात्र त्याचा जराही परिणाम शहरातील विकासकामांवर होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. त्या दृष्टीने महापालिका महसूलात वाढ होण्यासाठी नवीन साधनस्त्रोतांचा शोध घेऊन त्याची फलनिष्पत्ती करण्यावर भर राहणार आहे.
नागरी सुविधा कामांची पूर्तता करतानाही नागरिकांच्या दृष्टीने त्यांची आवश्यकता लक्षात घेत प्राधान्यक्रम ठरवून सुविधापूर्तीवर भर असणार आहे. यातून महसूलाचा सुयोग्य वापर करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
नागरिकांना अपेक्षित समाधानकारक कार्यवाही हेच प्रमुख लक्ष्य ठेवून हे अर्थसंकल्पीय अंदाज सादर करताना नागरिकांची महानगरपालिकेशी संबंधित असलेली विविध प्रकारची कामे अधिक सुलभतेने व्हावीत यादृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यावर भर असणार आहे. तसेच कार्यालयीन कामकाजातही ई-गव्हर्नन्स् प्रणालीचा प्रभावी वापर केला जाणार आहे. त्याद्वारे नागरिकांची महानगरपालिकेशी संबंधित कामे अधिक सुलभरितीने, गतीमानतेने व पारदर्शकपणे होतील व यामधून ‘लोकाभिमुख प्रशासन’ अशी नवी मुंबई महानगरपालिकेची प्रतिमा अधिक उंचावेल असा विश्वास हा अर्थसंकल्पीय अंदाज सादर करताना व्यक्त करतो.
******
जमा / उत्पन्नवाढ याबाबत सन 2023 - 24 मधील फलश्रुती
सन 2023-24 या वर्षामध्ये रु.3165.57 कोटी एवढे जमेचे अंदाज करण्यात आले होते. सुधारीत अंदाजानुसार रु.3009.76 कोटी एवढी जमा होणे अपेक्षित आहे. मालमत्ता कराचे रु.801.00 कोटी हे उद्दिष्ट नवीन मालमत्ता कराचे निर्धारण व लिडार प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे साध्य करता येऊ शकेल.
नवी मुंबई शहराची विकास योजना शासन स्तरावर मंजूरी प्रक्रियेत असल्याने या आर्थिक वर्षात जमेचे उद्दिष्ट पूर्ण होण्यात काही प्रमाणात तूट दिसत असली तरी आगामी वर्षात हा फरक भरुन निघेल व जमेत भरीव वाढ दिसून येईल.
शहर विकास / सुधारणा यामधील सन 2023 - 24 मधील फलश्रुती
सन 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये विकास कामाकरिता भरीव तरतूद करण्यात आली होती. त्यामधून पूर्ण झालेल्या तसेच प्रगतीपथावर असणा-या कामांची विभागनिहाय फलश्रुती आपल्यासमोर सादर करीत आहे.
- अभियांत्रिकी विभाग :-
शहरातील पायाभूत सोयीसुविधा अभियांत्रिकी विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत असतात. त्या अनुषंगाने या विभागांतर्गत केलेल्या कामांचा आढावा प्रारंभी घेत आहे.
v स्थापत्य कामे.
Ø बहुउद्देशीय इमारती :- नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांच्या सुविधेकरिता वाशी, सेक्टर-14 येथे नवीन बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले असून त्याठिकाणी अंतर्गत सजावट करून ती नागरिकांकरिता लवकरच वापरात आणण्यात येत आहे.
ऐरोली गांव व चिंचपाडा येथील जुन्या समाजमंदिराच्या जागेवर बहुउद्देशीय इमारत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून सन 2025 मध्ये हे काम पूर्ण करुन सदर इमारत वापरात येईल.
Ø नाट्यगृह :- नमुंमपामार्फत ऐरोली येथे नाट्यगृह उभारण्याच्या कामामध्ये 50% पेक्षा अधिक प्रगती झालेली आहे. या वर्षाअखेरपर्यंत सदर नाट्यगृहाचे लोकार्पण करण्याचे प्रस्तावित आहे.
Ø वाशी बसस्थानक :- महानगरपालिकेमार्फत परिवहन बस स्थानकांपैकी वाशी येथील सेक्टर-9 ए व सेक्टर-12 या बस स्थानकांचा विकास करण्यात येत असून, सेक्टर-9 ए येथे वाणिज्य संकुल व सेक्टर-12 येथे बस स्थानक, वाणिज्य संकुल व जलतरण तलाव बांधण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. सदरच्या इमारतीचे जून 2024 अखेरपर्यंत लोकार्पण करण्यात येणार असून, त्यामुळे नमुंमपा परिवहन उपक्रमास अंदाजित रक्कम रु.60.00 कोटी इतके वार्षिक उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे नमुंमपाचा आर्थिक भार कमी होणार आहे.
Ø औद्योगिक क्षेत्रातील रस्ते :- नवी मुंबई टीटिसी औद्योगिक क्षेत्रामध्ये एकूण 136 कि.मी. रस्ते असून, त्यामध्ये महानगरपालिकेमार्फत 86 कि.मी. रस्ते यापूर्वीच तयार केले होते. सद्यस्थितीत महानगरपालिका व MIDC मार्फत 30 कि.मी. रस्त्यांचे कामे हाती घेण्यात आले असून, त्यामधील 15 कि.मी. रस्ते हे MIDC व 15 कि.मी. रस्ते हे महानगरपालिकेमार्फत पूर्ण करण्यात आले आहेत. या माध्यमातून नवी मुंबईतील उद्योगांची पर्यायाने राज्याची अर्थव्यवस्था सक्षम होण्यास हातभार लागणार असून याचा लाभ उद्योजकांच्या व्यवसायवाढीसाठी तसेच रोजगार वृध्दीसाठी होणार आहे.
Ø ऐरोली-काटई या उन्नत मार्ग :- MMRDA मार्फत ऐरोली-काटई या उन्नत मार्गाचे काम सुरु असून या उन्नत मार्गावरुन ठाणे-बेलापूर रस्त्यावर ऐरोली येथे ये-जा करणेसाठी रॅम्प बनविणेकरिता महानगरपालिकेने तांत्रिक अहवाल व नकाशे MMRDA कडे सादर केले आहेत. त्यास मंजूरी प्राप्त झाली असून MMRDA मार्फत सदर कामाच्या निविदा मागविण्यात आलेल्या आहेत.
Ø तुर्भे रेल्वे स्टेशनजवळ पूल उभारण्याचे काम प्रगतीपथावरआहे.
Ø जुईनगर येथे कारशेडजवळ पूल बांधण्याची निविदा काढण्यात आलेली आहे.
Ø सायन्स पार्क :- नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नेरुळ येथे जागतिक दर्जाचे सायन्स पार्क उभारण्यात येत असून सदर काम सन 2025 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. या उपक्रमाचा फायदा शहरातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना होणार असून या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायन्स पार्कमुळे नवी मुंबईत जागतिक स्तरावरील पर्यटकांना आकर्षित करेल, अशी वास्तू उभी राहणार आहे.
Ø पार्किंग :- नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सीबीडी बेलापूर सेक्टर 15 येथे 396 चारचाकी व 131 दुचाकींकरिता वाहनतळ तयार करण्यात आला असून त्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येत आहे.
v पाणी पुरवठा कामे :-
Ø गावठाणामधील नळ जोडणी :- महानगरपालिका क्षेत्रातील गावठाणांमध्ये बांधलेल्या सर्व सदनिकांमध्ये पाणी देयके देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असून नमुंमपा क्षेत्रात आत्तापर्यंत 5000 नवीन नळ जोडणी दिल्यामुळे पाणी देयकांच्या उत्पन्नामध्ये रु.5.41 कोटी इतकी वाढ झालेली आहे व NRW देखील 3 ते 3.5% कमी झालेला आहे.
Ø झापडपट्टीमधील पाणी पुरवठा :- झोपडपट्टी भागात सन 2011 पर्यंतच्या संरक्षित झोपड्यांना ‘मागेल त्याला नळजोडणी’ देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असून यामुळे 1364 वैयक्तिक नळजोडणींच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दि. 01/01/2011 नंतर अस्तित्वात आलेल्या निवासी झोपडपट्टयांतील पाच झोपडयांच्या समुहास जलमापकासह साधारणत: 25510 सामायिक जलजोडणी उभा नळखांब (Standpost) देण्यात आलेल्या आहेत.
Ø मोरबे धरण :- मोरबे धरण प्रकल्पाच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी 15 व्या वित्त आयोग अंतर्गत 150 द.ल.लि. क्षमतेचे नवीन फिल्टर हाऊस बांधणे, त्याचप्रमाणे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने 2.5 द.ल.लि. क्षमतेचा नवीन MBR बांधणेचे काम सन 2023 – 24 या वर्षात 50% पर्यंत पूर्ण होईल व उर्वरित काम पुढील आर्थिक वर्षात पूर्ण करण्यात येईल.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मोरबे धरण ते कळंबोलीपर्यंत टाकण्यात आलेल्या जलवाहिनीचे बळकटीकरण करण्याचे काम निविदा प्रक्रियेत आहे.
v मलनि:स्सारण कामे :-
अमृत-1 :-
Ø नागरी भागातील सांडपाणी पुनर्चक्रीकरण व पुनर्वापर या शासन धोरणानुसार, अमृत-1 अंतर्गत नमुंमपामार्फत राबविण्यात येणारा प्रकल्प राज्य शासनाचा पथदर्शी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण मा. मुख्यमंत्री महोदय यांचे हस्ते दि.30 मे 2023 रोजी करण्यात आलेले आहे.
Ø पनर्प्रक्रियायुक्त पाण्याचा एमआयडीसीला पुरवठा :- या अंतर्गत कोपरखैरणे व ऐरोली मलनि:स्सारण केंद्र येथे प्रक्रियाकृत सांडपाण्याचा पुनर्वापर होण्यासाठी Tertiary Treatment Plant कार्यान्वित झाला आहे. या ठिकाणी प्रती दिन 20.00 द.ल.लि. असे एकूण 40 द.ल.लि. प्रक्रियाकृत पाणी उपलब्ध होते. या प्लान्टमधील 7.00 द.ल.लि. प्रक्रियाकृत पाणी सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील उद्योगांना पुरविण्यात येते.
Ø पुनर्प्रक्रियाकृत पाणी वापर :- यापूर्वी उद्यानासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यात येत होता. महानगरपालिकेने नेरुळ से-50, कोपरखैरणे व ऐरोली, सेक्टर 14 येथील STP मध्ये बांधण्यात आलेल्या TTP प्लान्टमधून मिळणारे प्रक्रियायुक्त 12 द.ल.लि. पाणी उद्यानांमध्ये, ठाणे-बेलापूर रस्ता, पामबीच रस्ता, रस्ता दुभाजक, शौचालये, गृहनिर्माण संस्थामधील उद्याने याठिकाणी वापरण्यास सुरुवात झालेली आहे. उर्वरित पाणी वापराकरिता काही भागांमध्ये जलवाहिनी टाकण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. या पुनर्प्रक्रियाकृत पाणी वापरामुळे पिण्याच्या पाण्यामध्ये बचत झालेली आहे.
v विद्युत कामे :-
Ø दिवाबत्ती सुधारणा :- नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत शहरातील जुने गंजलेले पोल बदलणे, जुन्या फिटींग बदलून नव्या एल.ई.डी. फिटींग लावणे व एम.आय.डी.सी. क्षेत्रात नव्याने एल.ई.डी. फिटींग लावणे इत्यादी कामे पूर्ण करण्यात आली असून, त्यामुळे साधारणत: 1 कोटी युनिटची वीज बचत झालेली आहे. पर्यायाने बीज बिलामध्ये वार्षिक रु.10 कोटी इतकी बचत होत आहे.
v माहिती तंत्रज्ञान / संगणक :-
Ø लिडार सर्वेक्षण :- शहरातील सर्व मालमत्तांचे योग्य सर्वेक्षण झाल्यामुळे मनपाच्या सर्व मालमत्तांची माहिती संकलीत झाली आहे. याद्वारे रोड लेन्स, ओपन स्पेस, उघडे नाले, गटारे, मैदाने यांचीही माहिती उपलब्ध झाली असून ERP प्रणालीच्या Work Module मध्ये याचा समावेश करण्यात येत आहे व याचा उपयोग महापालिकेस भविष्यात कामे करण्यासाठी होणार आहे.
Ø सीसीटिव्ही यंत्रणा उभारणे :- नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व महत्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही बसविण्याचे काम हाती घेतले असून ते साधारणत: 95% पूर्ण झालेले आहे. या प्रणालीचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार असून याचा उपयोग शहर सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर होणार आहे. याद्वारे नवी मुंबई पोलीस विभागासही विविध बाबींवर नियंत्रण ठेवण्यास हातभार लागणार असून याद्वारे नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध होणार आहे.
v पर्यावरण / क्षेपणभूमी :-
Ø रस्त्यावर पाणी फवारणी :- 15 व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त अनुदानातून Dust Mitigation करिता दोन Multipurpose sprayer and Dust suppression Vehicle खरेदी करण्यात आल्या आहेत. या वाहनांव्दारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 03 महिन्यांमध्ये साधारणत: 14 हजार कि.मी. रस्त्यांवर पाणी फवारणी करुन धूळ प्रदूषण कमी करणे शक्य झाले आहे.
Ø शहरात 5 नवीन हवा गुणवत्ता मापन केंद्रे उभारण्यात आलेली आहेत.
Ø शहरातील बांधकाम सुरु असलेल्या इमारतींवर धूळ प्रतिरोधक म्हणून ग्रीन नेट लावणे नमुंमपाने बंधनकारक केले आहे.
Ø फ्लिपर मशीनचा वापर :- नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील रस्ते व पदपथ साफसफाई करण्याकरिता 400 फ्लिपर मशीनचा प्रतिदिन साधारणत: 400 रनिंग कि.मी. वापर करुन धूळ (Dust) हटविण्यात येते आहे.
Ø प्रदूषणात वाढ करणा-यांवर दंडात्मक कारवाई :- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विकासक, कंत्राटदार व अन्य प्रदूषण करण्यास जबाबदार असणा-या व्यक्ती, संस्था, प्राधिकरणे यांना रु.22.00 लक्ष रक्कमेपेक्षा अधिक रक्कमेच्या दंडाच्या नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत.
Ø स्मशानभूमीचे विद्युत / CNG / PNG रुपांतर :- पारंपारिक स्मशानभूमीचे PNG मध्ये रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त झाली असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या कृती आराखड्यात याचा समावेश करण्यात आला आहे.
स्मशानभूमीमध्ये पारंपारिक लाकडांच्या ऐवजी PNG चा वापर केल्यास PM 10 आणि PM 25 यासारख्या हानीकारक प्रदूषकांचे उत्सर्जन रोखून वायू प्रदूषणात लक्षणीय घट होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने 15 व्या वित्त आयोग कार्यक्रमांतर्गत नेरुळ - सारसोळे सेक्टर 2 आणि तुर्भे सेक्टर 19 येथील पारंपारिक स्मशानभूमींचे Piped Natural Gas (PNG) मध्ये रूपांतर करण्यात आले आहे. हा बदल प्रभावी असल्याचे निदर्शनास आले असून पारंपारिक विद्युतदाहिनी स्मशानभूमीच्या तुलनेत PNG स्मशानभूमीचा देखभाल - दुरुस्तीचा खर्च कमी आहे.
- घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान :-
v घनकचरा व्यवस्थापन :-
Ø कचरा वर्गीकरण :- नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मोठया गृहनिर्माण संस्था, हॉटेल, वाणिज्य संकुले, शैक्षणिक संस्था, औद्योगिक क्षेत्र इत्यादींमध्ये सुरुवातीपासूनच कचरा वर्गीकरणाचे काम चांगल्या प्रकारे सुरु असून सन 2023 मध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणात तिस-या प्रकारच्या घरगुती घातक कच-याच्या (Hazardous waste) वर्गीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी काळया रंगाच्या कचरा कुंडयांचा पुरवठा करणेत आला असून या कच-याचीही शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे.
Ø RFID – Radio Frequency Identification Device:- दैनंदिन कचरा संकलन करताना वापरण्यात येणा-या वाहनांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवण्याकरिता RFID प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात येत असून त्याकरिता स्वतंत्र वॉर रुम कार्यान्वित आहे. यामुळे शहरातील प्रत्येक कचराकुंडीतील कचरा संकलीत केला जात आहे अथवा नाही याची माहिती त्वरित उपलब्ध होत असल्याने कोणत्याही मार्गावरील कचराकुंडीमधील कचरा उचलणे राहून जाऊ शकत नाही. यामुळे नागरिकांकडून प्राप्त होणा-या कचरा संकलन तक्रारींचे प्रमाण अत्यल्प आहे.
v स्वच्छ सर्वेक्षण-2023 अंतर्गत प्राप्त बहुमान :-
Ø स्वच्छ सर्वेक्षण – 2023 मानांकन :- स्वच्छ सर्वेक्षण- 2023 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने देशात स्वच्छ शहरांमध्ये द्वितीय (तांत्रिकदृष्टया तृतीय) क्रमांकाचे मानांकन प्राप्त केले असून महाराष्ट्र राज्यात नेहमीप्रमाणेच आपले पहिले स्थान कायम राखले आहे.
Ø ‘सेव्हन स्टार’ मानांकन :- कचरामुक्त (Garbage Free City) शहराचे सर्वोच्च ‘सेव्हन स्टार’ मानांकन नवी मुंबई शहराने प्राप्त केले असून हे मानांकन प्राप्त करणा-या देशातील केवळ दोन शहरांमधील नवी मुंबई हे एक शहर असून राज्यातील एकमेव शहर आहे. मागील वर्षी नवी मुंबईला फाईव्ह स्टार मानांकन प्राप्त झाले असून यावर्षी ‘सेव्हन स्टार’ मानांकन प्राप्त झालेले आहे.
Ø ‘वॉटरप्लस’ मानांकन :- हागणदारीमुक्त शहरांच्या ओडीएफ कॅटेगिरीत नवी मुंबई शहराने ‘वॉटरप्लस’ हे सर्वोच्च मानांकन कायम राखले आहे.
Ø ‘माझी वसुंधरा’अभियान :- सन 2023 मध्ये ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत राज्यात ‘क’ वर्ग महानगरपालिकांमध्ये नवी मुंबईने पर्यावरणशील शहराचे प्रथम मानांकन प्राप्त केले आहे.
Ø पुरस्कार :- स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई महानगरपालिकेने सुरुवातीपासूनच उल्लेखनीय कामगिरी केली असून सन 2020-21 पासून महाराष्ट्रात पहिला क्रमांक तर राष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक संपादन केला आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेस पुरस्कारापोटी आत्तापर्यंत रु.56.00 कोटी एवढी रक्कम जाहीर झालेली असून आणखी काही पारितोषिक रक्कम जाहीर होणे बाकी आहे.
स्वच्छ सर्वेक्षणाप्रमाणेच माझी वसुंधरा अभियानातही नवी मुंबईने उल्लेखनीय यश संपादन केले असून रु.24.00 कोटी इतकी रक्कम पारितोषिकापोटी महानगरपालिकेस प्राप्त झालेली आहे.
या पारितोषिक रक्कमांचा विनियोग नागरी सुविधा पुरविण्यासाठी केला जात असून यामधून नवी मुंबईच्या स्वच्छता, सुशोभिकरण व पर्यावरणात लक्षणीय काम करण्यात येत आहे.
v स्वच्छ सर्वेक्षण-2023 अंतर्गत राबविलेले उल्लेखनीय उपक्रम :-
Ø इंडियन स्वच्छता लीग:- सन 2023 मध्ये आयोजित ‘इंडियन स्वच्छता लीग’ या देशपातळीवरील स्पर्धेमध्ये ‘Engagement of Youth in India Vs Garbage’ या मोहिमेअंतर्गत सहभाग घेऊन इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये तीन विक्रम नोंदविण्यात आले.
Ø स्वच्छता शपथ :- पहिल्या विक्रमी उपक्रमात 1 लाख 14 हजारहून अधिक नागरिक व विद्यार्थ्यांनी आठ विभागात एकाच वेळी एकत्र येऊन स्वच्छता शपथ घेतली व त्यासोबतच खारफुटी स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली.
Ø डिजिटल स्वच्छता शपथ :- 26 हजारहून अधिक नागरिकांनी एकाच दिवशी डिजिटल स्वच्छता शपथ घेतली. याही उपक्रमाची विक्रमी नोंद झालेली आहे.
Ø चित्रकला स्पर्धा :- स्वच्छ चित्रकला स्पर्धेत एकाच वेळी तब्बल 2 लाख 83 हजार 144 विद्यार्थ्यांनी विक्रमी सहभाग घेतला. याही विक्रमाची नोंद बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड मध्ये झालेली आहे. नवी मुंबई शहराचे भविष्य असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन स्वच्छ नवी मुंबईच्या भविष्याचे चित्र रेखाटले.
Ø स्वच्छता ही सेवा :- या उपक्रमांतर्गत नवी मुंबई शहरात 267 हून अधिक ठिकाणी नागरिकांमार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ज्यामध्ये 1.28 लाखाहून अधिक नवी मुंबईकरांनी ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमात रस्त्यावर उतरून केले एकाच वेळी एक तास श्रमदान केले.
Ø RRR अंतर्गत रिसायकल मार्ट व रिसायकल बाजार:- घरातील रद्दी, जुने कपडे, रिकाम्या टुथपेस्ट, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, जुनी भांडी, प्लास्टीक, चामडयाच्या वस्तू यांच्या बदल्यात नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी पॉईंट्स देण्याचा व नवीन वस्तूंच्या खरेदीवर त्या पॉईंट्सच्या प्रमाणात सवलत देणारा अभिनव उपक्रम डी मार्ट मधील 'रिसायकल मार्ट' व अपना बाजार मधील 'रिसायकल बाजार' संकल्पनेनुसार राबविण्यात येत असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Ø RRR ON Wheels:- थ्री आर ऑन व्हील्स् हा IT based सोशल प्लॅटफॉर्म ॲप तयार करण्यात आला असून यामध्ये ज्या नागरिकांना त्यांच्याकडील रद्दी, जुन्या वस्तू विकावयाच्या आहेत अशा नागरिकांनी ॲपवर नांव नोंदणी करावी व ॲपवर रजिस्टर असलेल्या वेंडर्सनी योग्य भाव दिल्यानंतर त्यांना सदर वस्तू विकून मोबदला प्राप्त करुन घ्यावयाचा आहे. या संकल्पनेअंतर्गत स्क्रॅपनेट सोबत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाला नागरिकांची पसंती मिळत आहे.
Ø स्क्रॅप नेट :- या उपक्रमांतर्गत वर्षभरात साधारणत: 870 घरांमार्फत प्रतिसाद लाभला असून मागील 9 महिन्यांमध्ये 14 टनापेक्षा जास्त कचरा रिसायकल झाल्यामुळे तो क्षेपणभूमीपर्यंत न पोहोचता त्याची आधीच विल्हेवाट लावणे शक्य झाले आहे.
Ø आकांक्षी शौचालय (Aspirational Toilet):- केंद्र सरकारच्या निकषांनुसार कोपरखैरणे येथे दोन आकांक्षी शौचालये उभारण्यात आलेली असून यामध्ये ‘टाकाऊतून टिकाऊ’ या संकल्पनेचा प्रभावी व कलात्मक वापर करण्यात आलेला आहे. या उभारणीत पुनर्प्रक्रियाकृत प्लास्टिक शीट, एकल वापर प्लास्टिक यांचा उपयोग करण्यात आला असून, विशेष लक्षणीय बाब म्हणजे शौचालय सजावटीत 11 हजार 700 हून अधिक प्लास्टिक बाटल्यांचा वापर तसेच तेथील 35 हजार 200 हून अधिक बाटल्यांच्या झाकणांचा कलात्मक वापर करुन विविध सांकेतिक चिन्हे निर्मिती आणि सजावटीसाठी 85 कॉम्प्युटर कि-बोर्डचा वापर करण्यात आलेला आहे. या शौचालयासमोर तयार करण्यात आलेल्या रिसायकलर वाहनासाठी 248 किलो लोखंडी टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. शौचालयासमोरील कारंज्यासाठी प्रक्रियायुक्त सांडपाण्याचा वापर करण्यात आला आहे.
Ø क्लॉथ बॅग वेन्डिंग मशीनः प्रायोगिक तत्वावर दोन मार्केटमध्ये क्लॉथ बॅग वेन्डिंग मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तेथील प्लास्टिक पिशव्यांच्या वापर कमी होण्यास मदत झालेली आहे.
Ø स्वच्छंद काव्य संगीत संध्या :- या अभिनव उपक्रमाची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून नामांकित कवी व संगीतकारांनी एकत्र येत स्वच्छतेचा जागर केला. या कार्यक्रमाचे विशेष प्रक्षेपण दूरदर्शन सह्याद्रीवरुन करण्यात आले.
Ø स्वच्छ बाल महोत्सव :- लहान वयातच मुलांमध्ये स्वच्छतेविषयक जागरुकता निर्माण व्हावी याकरिता स्वच्छ बाल महोत्सवाचे आयोजन करुन ‘माझे शहर माझा सहभाग’ व ‘थ्री आर ( Reduce, Reuse, Recycle)’ या विषयावर निसर्गोद्यानामध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत 9 हजार 500 हून अधिक मुलांनी सहभागी होत स्पर्धा यशस्वी केली.
- आरोग्य सुविधा :-
शहरातील आरोग्य सुविधांचे अधिक सक्षमीकरण करुन नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करीत आलेली आहे. त्या अनुषंगाने खालील कामे करण्यात आलेली आहेत.
v रुग्णालये / नागरी आरोग्य केंद्रे बांधणे:-
नागरिकांना अद्ययावत वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत रुग्णालये / नागरी आरोग्य केंद्रे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यातील,
Ø कोपरखैरणे, सेक्टर 14 येथे नागरी आरोग्य केंद्र बांधण्याचे काम पूर्ण झालेले आहे. हे नागरी आरोग्य केंद्र नागरिकांच्या सेवेकरिता लवकरच उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Ø दिघा विभागात ओएस 1 भूखंडावर, ए एम -5 भूखंडावर तळमजला + 5 मजली 50 खाटांचे माता बाल रुग्णालय बांधकाम सुरु आहे. सन 2024-25 मध्ये सदर इमारत बांधून पूर्ण होईल.
Ø नेरुळ विभागात शिरवणे येथे तळमजला + 2 मजली नागरी आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येईल.
Ø नेरुळ सेक्टर 24 येथे पशुवैद्यकीय दवाखाना बांधण्याचे काम पूर्ण करण्यात आलेले असून त्याचा वापर लवकरच सुरु करण्यात येईल.
Ø P.A.C.S (पॅक्स):- पॅक्स अर्थात Picture Archiving and Communcation System (P.A.C.S.) द्वारे परंपरागत विकिरण (Radiology) पध्दतीला नवा आयाम लाभला असून विविध उपकरणांमधून प्राप्त चित्रफितीची गुणवत्ता कायम राखत डिजीटल माध्यमात संकलन व आवश्यक ठिकाणी प्रसारण व अमर्याद काळासाठी त्याचे जतन करणे या यंत्रणेमुळे शक्य होत आहे.
- मालमत्ता(ESTATE):-
Ø जन सायकल सहभाग प्रणाली (Public Bicycle Sharing System) :- जन सायकल सहभाग प्रणालीद्वारे (Public Bicycle Sharing System) सायकल व ई-बाईक उभ्या करण्याकरिता YULU BIKES PVT. LTD. यांना बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे / सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली नोडमध्ये 92 ठिकाणी जागा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या असून या प्रणालीस नागरिकांचा वाढता प्रतिसाद आहे.
या प्रणालीचा उपयोग यावर्षी 1,18,234 नागरिकांनी 3,84,680 राईड्सद्वारे एकूण 11,52,230 कि.मी. अंतरासाठी केला आहे. या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेस 11 कोटीहून अधिक कार्बन क्रेडीट प्राप्त झालेले आहे.
Ø सिडको, एम.आय.डी.सी., शासनाकडून हस्तांतरित मालमत्ता :- नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या स्वत:च्या जागा नसल्यामुळे महानगरपालिकेस सिडको, एम.आय.डी.सी. व शासन यांचेकडून सार्वजनिक प्रयोजनाचे भूखंड हस्तांतरित करुन घ्यावे लागतात. आजमितीस सिडकोकडून विविध नागरी सुविधांचे 577 भूखंड हस्तांतरित झालेले असून विद्यमान आर्थिक वर्षात सिडकोकडून 02 आणि एम.आय.डी.सी. कडून 12 असे एकूण 14 भूखंड हस्तांतरित झालेले आहेत. त्याचा वापर विविध प्रयोजनाकरिता होणार आहे.
- क्रीडा व सांस्कृतिक विकास :-
Ø शालेय क्रीडा स्पर्धा :- शासकीय जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा 2023-24 मध्ये शासनमान्य 49 क्रीडा प्रकारांतील स्पर्धांचे यशस्वीरित्या सुयोग्य नियोजन करण्यात आले. यामध्ये नवी मुंबई क्षेत्रातील 250 हून अधिक शाळा आणि 40,000 हून अधिक खेळाडूंचा उत्साही सहभाग लाभला.
Ø रायफल शुटींग प्रशिक्षण :- महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनाही ऑलिम्पिक स्तरावर खेळल्या जाणा-या रायफल शुटींग खेळाचे तंत्रशुध्द प्रशिक्षण मिळावे यादृष्टीने अनुभवी संस्थेसोबत करारनामा करण्यात येऊन फादर ॲग्नेल ट्रस्ट यांच्याकडील शुटींग रेंजवर विशेष प्रशिक्षण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये प्राथमिक निवड चाचणीव्दारे 7 मुले व 6 मुली यांना अंतिम प्रशिक्षणाची सोय करण्यात आली. यामधून दोन मुलींची राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली आहे .
Ø क्रिकेट प्रशिक्षण :- महानगरपालिका शाळांतील 18 विद्यार्थ्यांना डॉ.डि. वाय. पाटील स्टेडियम येथील तेंडुलकर ग्लोबल अॅकेडमीमध्ये क्रिकेट खेळाचे मोफत प्रशिक्षण देण्याची कार्यवाही क्रीडा विभागाकडून करण्यात येत आहे.
Ø शासकीय जिल्हास्तर शालेय तायक्वांदो स्पर्धा :- महानगरपालिका शाळांमध्ये क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण देण्यात येत असून यामध्ये शाळा क्र.36, कोपरखैरणे येथील खेळाडूंनी जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होत 11 सुवर्ण, 16 रौप्य आणि 13 कांस्य पदके पटकावून सर्वसाधारण विजेतेपदसुध्दा पटकाविलेले आहेत.
Ø ठाणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा :- नवी मुंबई महानगरपालिका कबड्डी प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होऊन कुमार गटात प्रथम क्रमांक आणि खुल्या गटात तृतीय क्रमांक मिळविलेला आहे. यामध्ये ठाणे जिल्हा संघात कुमार गटातील 03 खेळाडूंची निवड झालेली असून ते राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
Ø वॉल क्लायबिंग सुविधा :- नेरुळ से-21 येथे आद्यगुरु शंकराचार्य उद्यानामध्ये साहसी खेळ प्रकारातील वॉल क्लायबिंग ही सुविधा प्रशिक्षकांसह उपलब्ध करुन देण्यात आल्याने या खेळामध्ये रुची असलेल्या शहरातील खेळाडूंची उत्तम सोय झालेली आहे.
Ø बॉक्सींग खेळाचे विशेष प्रशिक्षण :- महानगरपालिका शाळांमधील शिक्षकांसाठी ठाणे जिल्हा बॉक्सींग असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित बॉक्सींग खेळाच्या विशेष प्रशिक्षण शिबीरात 30 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.
- समाज विकास:-
Ø ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्र:- ज्येष्ठ नागरिकांना काही दिवसांकरिता राहता यावे यादृष्टीने त्यांची सर्व प्रकारची काळजी घेणा-या तळमजला + चार मजल्याच्या ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्राचे बांधकाम बेलापूर विभागातील भू. क्र. 13, सेक्टर 38, नेरुळ येथे पूर्ण करण्यात आलेले असून त्याचा वापर लवकरच सुरु करण्यात येत आहे.
Ø व्यावसायिक प्रशिक्षण:- नमुंमपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांकरिता विविध 41 प्रकारचे प्रशिक्षण देण्याकरिता निविदा प्रक्रिया राबवून संस्थेची नेमणूक करण्यात आलेली आहे. यामध्ये संस्थेमार्फत वस्ती पातळीवर 18,500 लाभार्थ्यांना विविध घटकांतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थींपैकी 469 लाभार्थ्यांना रोजगार प्राप्त झालेला असून 5636 लाभार्थ्यांनी स्वयंरोजगार सुरु केलेला आहे. यामुळे काही लाभार्थ्यांमध्ये कौशल्य सुधारणा (Skill Upgradation) झालेली आहे. या प्रशिक्षणाचा लाभ खुल्या घटकातून 7858, महिला घटकातून 8732 तर मागासवर्गीय घटकातून 1910 एवढ्या लाभार्थ्यांनी घेतलेला आहे. आगामी वर्षातही ही योजना सुरु ठेवण्याचे नियोजन आहे.
Ø विद्यार्थी शिष्यवृत्ती:- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळेत जाणा-या इ. पहिली ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध सहा घटकांतर्गत सन 2021-22 व सन 2022-23 या आर्थिक वर्षातील शिष्यवृत्ती वितरण करण्याकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारुन दोन्ही वर्षांकरिता प्राप्त झालेल्या अर्जांची पात्रता निश्चित करुन 58,518 लाभार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले आहे.
Ø विविध योजनांतर्गत अर्थसहाय्य :- समाजविकास विभागामार्फत 50 एवढ्या मोठ्या संख्येने राबविण्यात येणा-या योजनांतर्गत 77,370 एवढ्या लाभार्थ्यांना 66.75 कोटी एवढे अनुदान अर्थसहाय्य करण्यात आलेले आहे.
Ø ग्रंथालय सुविधा :- नमुंमपा क्षेत्रात एकूण 37 ग्रंथालये असून 11814 सभासद आहेत. या ग्रंथालयांमध्ये विविध साहित्य प्रकारातील 1,03,342 पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामुळे विविध वाचकांना व विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे.
Ø सेन्ट्रल लायब्ररी :- नमुंमपामार्फत वाचनसंस्कृती वृद्धींगत करण्यासाठी सेक्टर-11, सानपाडा येथे सेन्ट्रल लायब्ररी उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या ग्रंथालयात बहुभाषी साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या कामासाठी रक्कम रु.33.31 कोटी खर्च अपेक्षित असून सन 2024-25 मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
Ø बेलापूर विभागातील दिवाळे येथे ग्रंथालय उभारणे, घणसोली येथे वाचनालय व ग्रंथालय उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
Ø विष्णुदास भावे नाट्यगृह येथील ग्रंथालय :- वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे ग्रंथालय संकल्पना साकारण्यात आली असून कला संस्कृती व साहित्य यांचा संगम या माध्यमातून होणार आहे. यामुळे नाट्यप्रेमी व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलेले रसिक यांना अक्षर साहित्याचा लाभ होणार आहे. हे ग्रंथालय लवकरच नागरिकांसाठी खुले करण्यात येत आहे.
Ø महिलांसाठी सुविधा :- नमुंमपा संचालित 67 शाळा व 24 ग्रंथालये अशा एकूण 91 ठिकाणी सॅनेटरी नॅपकीन व्हेंडींग मशीन पुरविण्यात आलेल्या आहेत.
Ø आदिवासींसाठी विविध योजनांतर्गत अर्थसहाय्य :- आदिवासी बांधवांसाठी 09 योजनांतर्गत 122 लाभार्थ्यांना 50.00 लक्ष अनुदान अर्थसहाय्य करण्यात आलेले आहे.
Ø तृतीयपंथीयांसाठी शौचालय निर्मिती:- नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छताविषयक उपक्रमांमध्ये तृतीयपंथी नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. या अनुषंगाने शौचालय निर्मितीमध्ये केलेली विशेष गोष्ट म्हणजे तुर्भे विभागातील कोपरी भागात तृतीयपंथीयांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याने त्या ठिकाणी तृतीयपंथीयांसाठी 10 सीट्सचे स्वतंत्र शौचालय उभारण्यात आलेले आहे.
Ø भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक :- सेक्टर 15, ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची महती ‘ज्ञानस्मारक’ म्हणून जगभरात होत असून 2 वर्षात 2.5 लाखाहून अधिक मान्यवरांनी, अभ्यासकांनी व नागरिकांनी या ठिकाणी भेट देत प्रशंसा केलेली आहे. येथील समृध्द ग्रंथालयात यावर्षी आणखी 2 हजार अभ्यासपूर्ण ग्रंथांची भर घालण्यात आलेली असून येथे नियमितपणे आयोजित केल्या जाणा-या ‘विचारवेध’ व्याख्यानमालेला उत्तम प्रतिसाद लाभतो आहे.
- अग्निशमन विभाग :-
अग्निशमन विभागाचे सबलीकरण करणे :-
Ø वॉटर ब्राऊझर वाहन :- उंच इमारतींमधील आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाकरिता 60 मीटर उंचीचे वॉटर ब्राऊझर वाहन अग्निशमन विभागाकडे उपलब्ध झाले असून हे वाहन मार्च 2024 पूर्वी वापरात येईल. याद्वारे 70 मीटर उंचीच्या इमारतीची आग विझविणे शक्य होणार आहे.
Ø ब्रॅन्टो वाहनाचे Remounting :- अग्निशमन विभागातील ब्रॅन्टो वाहनास 15 वर्षे पूर्ण होत असल्याने नवीन वाहन खरेदी न करता या वाहनावरील एरियल लॅडर प्लॅटफॉर्म नवीन चेसिसवर Remounting करण्यात येत असल्याने वाहन सक्षमतेने कार्यान्वित होईल व महानगरपालिकेची साधारणत: 25.00 कोटी रक्कमेची बचत होणार आहे.
- शिक्षण सुविधा :-
दर्जेदार शैक्षणिक सोयीसुविधा देण्यासोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणारी महानगरपालिका ही नवी मुंबईची ओळख असून ‘शिक्षण व्हिजन’ अंतर्गत विविध उल्लेखनीय कामे करण्यात आलेली आहेत.
Ø बांधकाम पूर्ण झालेल्या शाळा :- बेलापूर सेक्टर 30, नेरुळ येथील भू. क्र. 8 ए येथे तळमजला + 1 मजल्याची शाळा, यादवनगर येथे झोपडपट्टी भागात तळमजला + 3 मजल्याची 28 खोल्यांची शाळा, कुकशेत येथे माध्यमिक शाळा तसेच घणसोली, सेक्टर 15 येथील शाळा अशा एकूण 04 शाळा इमारतींचे बांधकाम पूर्ण झालेले असून पुढील शैक्षणिक वर्षात त्या ठिकाणी शाळा सुरु करण्याचे नियोजन आहे.
Ø बांधकाम प्रगतीपथावर असलेल्या शाळा :- बेलापूर विभागातील सेक्टर 50, नेरुळ येथील भू .क्र. 13 वर नागरी वसाहतीमध्ये शिक्षण विभागाच्या मागणीनुसार तळमजला + 2 मजल्याची शाळा इमारत, कोपरखैरणे विभागातील श्रमिकनगर येथील भू. क्र. ओएस 2/2 ए व 2/3 ए तसेच कोपरखैरणे गांव शाळा क्र. 36 च्या दुस-या वाढीव मजल्याचे बांधकाम काम सुरु करण्यात आलेले आहे. सन 2024-25 मध्ये सदरच्या 03 इमारती बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहे.
Ø मध्यान्ह भोजन पुरवठा:- शैक्षणिक वर्ष 2023-24 या कालावधीत बालवाडी, CBSE शाळा व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक पोषणासाठी मध्यान्ह भोजन पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा 7081 बालवाडी विद्यार्थी, 2303 CBSE विद्यार्थी, 6274 माध्यमिक विद्यार्थी असे एकूण 15658 विद्यार्थी लाभ घेत असून याकरिता रू. 14.15 कोटी इतकी रक्कम खर्च होणार आहे.
Ø लाभाचे थेट हस्तांतरण:- शैक्षणिक वर्षे 2023-24 मध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कल्याणकारी विविध योजनांच्या अंतर्गत वस्तू स्वरूपात मिळणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी (उदा. वह्या, ऑल सिजन बूट/ मोजे, पी.टी.बूट/मोजे, दप्तर, रेनकोट इ.) देय रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बॅक खात्यात DBT योजने अंतर्गत जमा करण्यात आलेली आहे. याचे एकूण लाभार्थी 47355 इतके असून रू 26.20 कोटी खर्च अपेक्षित आहे.
Ø हसत-खेळत शिक्षण :- शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यासावरील ताण कमी होण्यासाठी ‘हसत खेळत शिक्षण’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. ‘शिक्षण करूया सोपे’ उपक्रमांतर्गत हा प्रस्ताव शालेय अभ्यासक्रम, पाठ्यक्रम यांना पूरक असून कोव्हिड 19 प्रभावीत काळात ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग झालेला आहे.
Ø विद्यार्थी सहल:- प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळावे, भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळाव्यात याकरिता शैक्षणिक सहलींचे नियोजन करण्यात आले आहे.
Ø भारतीय अंतराळ संशोधन संस्था सहल :- नमुंमपा शिक्षण विभागांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षा तसेच राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून विज्ञानाची आवड निर्माण करणे व त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या हेतूने विद्यार्थ्यांच्या मनात असलेले चांद्रयान मोहीमेचे कुतूहल लक्षात घेऊन भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO), बेंगळुरू येथे त्यांच्या सहलीचे नियोजन करण्यात आलेले आहे.
- अतिक्रमण विभाग :-
शहर सुंदर व स्वच्छ राहण्यासाठी अतिक्रमण करणा-यांवर सातत्याने कार्यवाही करण्यात येत आहे.
Ø अतिक्रमण निर्मुलन कार्यवाही :- नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत या आर्थिक वर्षात जानेवारीपर्यंत महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 53 अन्वये 215 नोटीसा बजावण्यात आल्या असून 48 बांधकामे हटविण्यात आली आहेत. तसेच अधिनियम 54 अन्वये 303 नोटीसा बजावण्यात आल्या असून 157 बांधकामे हटविण्यात आली आहेत. अनधिकृतपणे सामासिक जागेचा वापर करणाऱ्या 2383 दुकानांवर, अनधिकृतपणे उभारलेल्या 1730 झोपड्यांवर, 108143 फेरीवाल्यांवर, बेवारसपणे उभे असलेल्या 2001 वाहनांवर, 21032 अनाधिकृतपणे उभारलेल्या होर्डिंग/बॅनरवर कारवाई करण्यात आली आहे. या आर्थिक वर्षात 2 कोटी 29 लाखाहून अधिक दंडात्मक शुल्क वसूल करण्यात आले आहे.
Ø मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये भूखंड क. 149, से.16 ए, नेरूळ येथील त्रिमुर्ती कॉम्प्लेक्स व कृष्णा कॉम्प्लेक्स या दोन्ही इमारती दि. 30 व 31 जानेवारी 2024 रोजी पूर्णपणे रिक्त करण्यात आल्या असून येथील नळ जोडणी, वीज जोडणी, मलनि:स्सारण वाहिनी व गॅस जोडणी खंडीत करण्यात आली आहे. या इमारतीच्या संरक्षक भिंतीला पत्र्याने आच्छादित करण्यात आलेले आहे.
- प्रशासकीय सुधारणा :-
Ø पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना :- नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांची बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेली पदोन्नती व आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत प्रकरणे मोठ्या प्रमाणात मार्गी लावण्यात आलेली आहेत. अद्यापपर्यंत 20 संर्वगातील 121 अधिकारी/कर्मचाऱ्यांना पदोन्नती व 54 संवर्गात 678 अधिकारी/कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे.
Ø कर्मचारी / अधिकारी यांना सोयीसुविधा :- नवी मुंबई महानगरपालिका व IDBI Bank यांच्यामध्ये सामंजस्य करार होऊन स्थायी / अस्थायी व प्रतिनियुक्तीवरील अधिकारी, कर्मचारी यांना लाभ देण्यात येत आहेत.
1) आरोग्य विमा :- रु.2,00,000/- कॅशलेस Group Insurance.
2) वैयक्तिक अपघात विमा (मृत्यू झाल्यास) :-
Ø वैयक्तिक अपघात विमा रुपये 100 लाखापर्यंत ऑन डयुटी/ऑफ डयुटी करिता लागू असेल. (अधिकतम कव्हरेज GAI च्या दहा पट किंवा रुपये 100 लक्ष यापैकी जे कमी असेल ते)
Ø मृत कर्मचा-यांच्या मुलांना शिक्षणासाठी रुपये 5 लक्षपर्यंत अर्थसहाय्य.
(10% Of PAI Subject to maximum Rs.5 Lakhs)
3) अपंगत्व :-
Ø कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास अपंगत्वाच्या प्रमाणानुसार अधिकतम रुपये 100 लक्ष पर्यंत विमा कव्हरेज. (अधिकतम कव्हरेज GAI च्या दहा पट किंवा 100 लक्ष यापैकी जे कमी असेल ते)
Ø कायमस्वरुपी अंशीक अपंगत्व आल्यास अपंगत्वाच्या प्रमाणानुसार अधिकतम रुपये 50 लक्ष पर्यंत विमा कव्हरेज. (अधिकतम कव्हरेज GAI च्या दहा पट किंवा 50 लक्ष यापैकी जे कमी असेल ते).
4) Air Accident (Death Cover) :-
Ø रुपये 100 लाखापर्यंत विमान अपघात विमा (Death Cover Only)
Ø वैयक्तिक अपघात विमा अतिरिक्त कव्हरेज डेबीट कार्डवर रु.5 लक्ष.
****************************************************
सन 2024 – 25 करिता जमा संकल्प
सन 2024-2025 या आर्थिक वर्षात महसूली जमा रु.3304.69 कोटी एवढी अंदाजित धरली आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता संबंधित विभाग सर्वतोपरी प्रयत्न करतील. नवीन आर्थिक वर्षात कोणतीही करदर वाढ सूचविण्यात आलेली नाही. तथापि, विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्याकरिता उत्पन्न वाढ होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने काही उपाययोजना करण्यात येत आहेत.
v उत्पन्न वाढीकरिता उपाययोजना :-
Ø या अर्थसंकल्पामध्ये उत्पन्न वाढीवर विशेष भर देण्यात येत आहे. त्याकरिता स्थानिक संस्था करामध्ये प्रलंबित असलेले मूल्यनिर्धारण तसेच मालमत्ता करामध्ये प्रलंबित असणा-या वसूली यांचा निपटारा होण्याकरिता तज्ञ संस्थेची मदत घेऊन कालबध्द कार्यक्रम आखत अशा प्रकरणांचा निपटारा करण्यात येईल.
Ø तसेच TTP मध्ये पुनर्प्रक्रिया केलेले पाणी विक्री करणे, एम.आय.डी.सी., सिडको व इतर शासकीय कार्यालये तसेच शासनाकडून येणे असणा-या रक्कमा प्राप्त करुन घेण्यावर भर दिला जाईल.
Ø महानगरपालिकेच्या विनावापर / पडून असलेल्या सर्व मालमत्तांचा आढावा घेऊन त्या उपयोगात आणण्यात येतील व त्यामधूनही महसूलवाढ होईल.
Ø अशा उत्पन्नवाढीच्या सर्व बाबींवर काम करण्यासाठी विशेष कार्य बलाची (Special Task Force) नियुक्ती करण्यात येईल.
सन 2024 – 25 करिता विकास कामांवरील खर्चाचे अंदाज
नवी मुंबई महानगरपालिकेस विविध करांच्या रुपाने प्राप्त होणाऱ्या महसूलातून शहराच्या सोयीसुविधांमध्ये भर घालून नागरिकांना राहण्यासाठी अधिक सोयीसुविधायुक्त उत्तम शहर उपलब्ध करुन देणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने उपलब्ध निधीचा प्राधान्यक्रम ठरवून विकास कामांसाठी विनियोग करण्यात येईल. भांडवली खर्चाकरिता आगामी आर्थिक वर्षामध्ये रु.2191.67 कोटी एवढा निधी ठेवण्यात आलेला आहे.
- अभियांत्रिकी विभाग :-
v स्थापत्य कामे.
Ø प्रशासकीय / निवासी इमारती बांधकाम :- कोपरखैरणे विभागातील सेक्टर 11, भूखंड क्र. 14 येथे अधिकारी व कर्मचारी निवासस्थान (Officer and Staff Quarters) बांधण्याचे काम हाती घेण्याचे नियोजन असून त्याकरिता रु.80 कोटी खर्च येणार आहे. त्यादृष्टीने लेखाशिर्षांतर्गत भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. यापूर्वी नमुंमपा सर्वसाधारण सभेने विकास आराखड्यामध्ये बदल केल्यामुळे निवासस्थानाचे काम हाती घेण्यात आले नव्हते. परंतु सध्या त्या ठिकाणी नमुंमपाच्या अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान व समाजमंदिर बांधण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. दिघा व तुर्भे विभाग कार्यालयाचे बांधकाम करणे प्रस्तावित आहे.
Ø परिवहन बस स्थानके विकास :- वाशी येथील बस स्थानकांच्या धर्तीवर कोपरखैरणे व बेलापूर या दोन बस स्थानकांचा विकास करणे प्रस्तावित असून, महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमच्या कलम 37 प्रमाणे आवश्यक त्या बदलास राज्य शासनाची मंजूरी प्राप्त झालेली आहे. या दोन्ही कामांची आर्थिक व्यवहार्यता तपासण्यात येत आहे. मालमत्तांच्या वापरातून उत्पन्नाचा खात्रीशीर मार्ग उपलब्ध करुन देणे व परिवहन व्यवस्थेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणेकरिता सदरहू दोन्ही बसस्थानकांचा विकास करण्यात येईल.
Ø घणसोली ऐरोली खाडीपूल व रस्ता :- मागील 15 वर्ष प्रलंबित घणसोली रस्ता व खाडी पूल बांधणेबाबत महानगरपालिकेने नियोजन केले असून 1.95 कि.मी. ऐवजी 3.47 कि.मी. चा रस्ता व खाडी पूल बांधून हा रस्ता काटई - ऐरोली रस्त्याला जोडण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पर्यावरण विभागाच्या आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आलेल्या आहेत. या प्रकल्पाचा खर्च रु.372 कोटी ऐवजी रु.540 कोटी अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या बांधकाम खर्चापैकी 50 टक्के खर्च म्हणजे रु.270 कोटी रक्कम सिडको देणार आहे. प्रकल्पाच्या कामाची निविदा काढण्यात आली असून, एप्रिल 2024 अखेरपर्यंत कामास सुरुवात करण्यात येईल. या रस्त्यामुळे व खाडी पुलामुळे घणसोलीकडून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरकडे व मुलुंडमार्गे मुंबईकडे जाणे-येणे सोयीचे होईल.
Ø वाशी, सेक्टर 17 पामबीच मार्गावर सायन पनवेल महामार्गावर 290 मी. लांब व 6.50 मी रुंदीचा उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरु असून त्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे व इंधनाचीही बचत होणार आहे.
Ø ऐरोली विभागातील मध्यवर्ती नाल्यावरील बसडेपो, सेक्टर 3, श्रीराम स्कुल, सेक्टर 19 लगतच्या एकूण 4 कल्व्हर्टची पुनर्बांधणी, दुरुस्ती व सुधारणा प्रस्तावित आहे.
Ø महापे उड्डाण आर्म :- महापे उड्डाणपुलावरुन ठाणे बेलापूर रस्त्यावर जाण्यासाठी आर्म बांधण्याच्या कामास प्रशासकीय मंजूरी प्राप्त झाली असून त्या कामाच्या निविदा मागविण्यात येत आहेत.
Ø बेलापूर विभागातील आम्रमार्ग ते से.11, 15, दिवाळेगांव मार्गे सायन –पनवेल महामार्गाला जोडणेसाठी पूल आणि नेरुळ फेज -1 सेक्टर 21 ते सेक्टर-28 जोडण्याकरिता पूलाच्या कामाचा Feasibility Report तयार केला असून त्याकरिता रक्कम रु.220 कोटी खर्च अपेक्षित आहे. तसेच त्यापैकी 50% खर्चाची सिडकोकडे मागणी करण्यात आलेली आहे.
Ø तुर्भे पूलाला फायझर कंपनीकडील रस्त्याला जोडण्यासाठी मार्ग बांधण्याकरिता यासंबंधी तांत्रिक व वित्तीय अहवाल (Feasibility Study) तयार करण्यात आला असून त्यामध्ये सल्फर कंपनीची 9 मीटर जागा संपादित करावी लागत असल्याने त्यामध्ये बदल करुन ठाणे बेलापूर रस्त्यावरुन सायन पनवेल ब्रिजवर आर्म उभारणे प्रस्तावित आहे. त्यामुळे वाहतुक सुरळीत होईल. त्यासाठी रक्कम रु. 126 कोटी खर्च अपेक्षित असून MMRDA कडे निधीची मागणी करण्यात येत आहे.
Ø कोपरखैरणे व घणसोली या नोडमधील अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी मोकळे राहण्यासाठी ठाणे बेलापूर रस्त्यावरुन महापे पूलापासून ते घणसोली येथील पामबीचपर्यंत पूल बांधणे (दुसरे आर्म) आवश्यक असल्याने त्याकरिता 4 हजार चौ.मी. भूखंडाची मागणी MIDC कडे करण्यात आलेली आहे.
Ø पार्किंग :- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता आणखी वाहनतळांची आवश्यकता असल्याने सिडकोकडून वाशी, सेक्टर 30 व सेक्टर 15, बेलापूर येथील भूखंड हस्तांतरित झाले आहेत. वाशी व बेलापूर येथील वाहनतळांची आवश्यकता पाहता महानगरपालिकेने भांडवली रक्कम न गुंतवता सदरचे दोन्ही भूखंड PPP तत्वावर वाणिज्य इमारत व वाहनतळ अशा स्वरुपात बहुमजली इमारत उभारणीचे नियोजन आहे. त्यासाठी feasibility तपासणेकरिता वित्तीय सल्लागाराची नेमणूक व सदरचा अहवाल तपासण्यासाठी PPP एक्सपर्ट यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. याबाबत सिडकोकडून ना हरकत प्राप्त झाल्यास वाणिज्य इमारत व वाहनतळ उभारण्यात येईल.
Ø गवळीदेव पर्यटन स्थळ :- घणसोली येथे गवळीदेव पर्यटन स्थळ शासन निधीतून महानगरपालिकेमार्फत विकसित करण्यात येत असून या कामाचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत.
Ø छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा: - ऐरोली मध्ये सेक्टर 10 ए येथील भूखंड क्रमांक 20 ए वर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझ धातूचा भव्य पुतळा उभारण्यात येत असून कामाच्या निविदा मंजूरी प्रक्रियेत आहेत व यासाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेण्याची कार्यवाही सुरु आहे.
v पाणी पुरवठा कामे.
Ø नवीन जलस्त्रोत :- नवी मुंबईतील लोकसंख्या वाढीचा दर विचारात घेऊन भविष्यात सन 2055 पर्यंत या शहराला सध्याच्या पाणी पुरवठा परिमाणापेक्षा दैनंदिन सुमारे 500 द. ल. लि. अधिक म्हणजे एकूण सुमारे 950 द. ल. लि. दैनंदिन पाण्याची आवश्यकता आहे. याकरिता वाढीव शाश्वत जलस्त्रोत असणे आवश्यक आहे. त्यानुसार महानगरपालिकेने तज्ञ समितीची नेमणूक केलेली असून, नवी मुंबई शहरासाठी पिण्याच्या पाणी पुरवठयाकरिता भिरा जलविद्युत प्रकल्पातून विद्युत निर्मितीनंतर विसर्ग केलेले पाणी घेणे, पावसाळा कालावधीत पाताळगंगा नदीतील पाणी उचलणे, भिरा धरणातून कुंडलिका नदीचे टेलरेस पाणी मिळविणे अशा जलस्त्रोतांबाबतच्या विविध पर्यायांचा विचार करण्यात येत आहे. याविषयी शासनाकडे पत्रव्यवहार सुरु आहे.
Ø 15 व्या वित्त आयोगांतर्गत प्रकल्पांबाबत :- 15 व्या केंद्रीय वित्त आयोगामार्फत Improvement in Distrubution system for coverage या घटकांतील एकूण 276.83 कोटीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्राची सुधारणा करणे, भोकरपाडा ते पारसिक हिल पर्यंतच्या मुख्य जलवाहिनीचे बळकटीकरण करणे, तसेच बेलापूर, नेरुळ वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा विभागात नवीन जलकुंभ बांधणे, जलवितरण व्यवस्थेची सुधारणा करणे, पंपींग मशीनरी बदलणे. इत्यादी कामांचा समावेश आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठयातील वितरण व्यवस्थेत सुधारणा होणार आहे.
v मलनि:स्सारण कामे.
Ø अमृत-1 अंतर्गत प्रकल्प :- अमृत-1 अंतर्गत कोपरखैरणे व ऐरोली मलनि:स्सारण केंद्र येथे प्रक्रियाकृत सांडपाण्याचा पुनर्वापर होण्यासाठी Tertiary Treatment Plant कार्यान्वित झाले. नजिकच्या काळात सदर प्रक्रियाकृत पाण्याच्या जास्तीत जास्त वापर औद्योगिक क्षेत्रात होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असून, त्यायोगे पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे. तसेच महानगरपालिकेस प्रक्रियाकृत पाणी विक्रीपासून पुढील वित्तीय वर्षात रक्कम रु.15.00 कोटी उत्पन्न अपेक्षित आहे.
Ø अमृत 2.0 अंतर्गत प्रकल्प :- केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेचे एकूण 29 प्रकल्प प्रस्तावित असून त्यापैकी 11 प्रकल्पांना मंजूरी प्राप्त झालेली आहे. त्यामधील 4 प्रकल्प हे पाणी पुरवठा विभागाशी संबंधित असून या कामांची प्रकल्प रक्कम रु. 332.60 कोटी इतकी आहे. केंद्र शासन व राज्य शासन यांचेकडून सदर कामांकरिता 70% अनुदान प्राप्त होणार आहे. त्यामध्ये बेलापूर विभागाकरिता 24 X 7 पाणी पुरवठा यंत्रणा राबविणे व इतर अनुषांगिक कामे करणे, कोपरखैरणे से-19 येथील धारण तलावाचे पुनरुज्जीवन करणे, ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील होल्डींग पाँन्ड यांचे पुनरुज्जीवन व सुशोभिकरण करणे, नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठयाकरिता स्वयंचलित यंत्रणा (SCADA AUTOMATION) राबविणे इत्यादी कामांचा समावेश आहे.
v विद्युत कामे.
Ø पथसंकेत :- नमुंमपा क्षेत्रातील विविध ठिकाणी असलेले पथसंकेत उभारण्याची कामे PPP तत्वावर करण्याबाबत निविदा प्रस्तावित असून त्याव्दारे 50 ठिकाणी नवीन पथसंकेत बसविण्यात येणार आहेत. तेथे एलईडी जाहिरातीव्दारे वार्षिक रु.4 कोटी इतके उत्पन्न अपेक्षित असून भांडवली व महसूली खर्चात बचत होणार आहे. तसेच याचा लाभ वाहतूक विभाग व नागरिकांना होणार आहे.
Ø सौरऊर्जा व जलविद्युत प्रकल्प :- मोरबे धऱणावर 100 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा व 1.5 मेगावॅट जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले असून MERC च्या नवीन नियमांनुसार प्रस्तावास फेरमान्यता घेण्यात आलेली आहे. सदर काम निविदा प्रक्रियेमध्ये आहे. सदर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नमुंमपाच्या वीज बिलात अंदाजे रु.50 कोटींची बचत होणार आहे.
Ø माझी वसुंधरा अभियानांतर्गत नमुंमपा इमारती, शाळांवर Ongrid Solar System बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
v पर्यावरण / क्षेपणभूमी.
हवेतील प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहेत.
Ø सक्शन मशीनद्वारे साफसफाई :- सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची 2646 सफाई कामगारांमार्फत पारंपारिक पध्दतीने दैनंदिन साफसफाई करण्यात येते. त्यामुळे हवेतील धुलीकणांच्या प्रमाणात वाढ होते. Suction Machine ने साफसफाई करताना हवेत पसरणा-या धुलीकणांस Suction व्दारे अटकाव करणे शक्य आहे. त्यामुळे सदर ठिकाणांची यांत्रिकी पध्दतीने योग्यप्रकारे सफाई करण्याकरिता नव्याने 07 नवीन (02 डिझेल, 04 सीएनजी व 01 इलेक्ट्रीकल) Mechanical sweeping machines खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आलेले आहेत. ही मशीन सन 2024-25 या वर्षात कार्यान्वित होतील व त्याद्वारे वर्षामध्ये साधारणत: 1,02,000 कि.मी. रस्त्याची साफसफाई करणे शक्य होणार आहे.
Ø नमुंमपा क्षेत्रातील अरुंद रस्ते, फुटपाथ, पार्किंग एरिया, बस स्टॅण्ड, उद्याने इ. ठिकाणी Mechanized Sweeping Machine आकाराने मोठ्या असल्याने त्यांचा वापर करणे शक्य होत नाही. त्यामुळे सदर ठिकाणांची यांत्रिकी पध्दतीने योग्य प्रकारे सफाई करण्याकरिता बारा Battery Operated Hundred Liter Hopper Capacity Sweeping Machine खरेदी करण्यात येणार आहेत.
Ø Fog Cannon Mist Machine व्दारे फवारणी :- हवेतील धुलीकण प्रदूषण कमी करण्याकरिता Fog Cannon Mist Machine व्दारे हवेतील धुलीकण जमिनीवर बसतील अशाप्रकारे हवेत पाण्याची फवारणी करुन प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील Air Quality Improvement करिता तीन Fog Cannon Mist Machine खरेदी करण्यात येणार असून याद्वारे मुख्य रस्ते धुण्याचे काम करण्यात येणार आहे.
Ø गर्दीच्या चौकामध्ये 8 ठिकाणी Air Purifier व 08 ठिकाणी Static Fogging Dust Suppression System बसविणे प्रस्तावित असून त्यामुळे धूळीचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
Ø इलेक्ट्रिकल बसेस :- 50 इलेक्ट्रिकल बसेस खरेदी करणेचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत तसेच नागरिकांच्या सोयीसाठी विविध 24 ठिकाणी विद्युत वाहनांकरिता चार्जींग स्टेशन उभारण्यात येत आहेत.
Ø घनकचरा व्यवस्थापनांतर्गत रस्ते साफसफाईकरिता विद्युत यांत्रिकी सफाई मशीन घेण्यात येत आहेत. यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
- घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान:-
v घनकचरा व्यवस्थापन :-
Ø कचरा वाहतुकीचे आधुनिकीकरण :- नव्याने काढण्यात येणा-या कचरा वाहतुकीच्या निविदेमध्ये सद्यस्थितीत असलेल्या वाहना व्यतिरिक्त नवीन 100 वाहनांची वाढ नियोजित असून त्यामधील 40 वाहने बॅटरी ऑपरेटेड असणार आहेत. नव्याने काढण्यात येणा-या निविदेमध्ये Control Command Centre ची स्थापना करण्यात येणार असून त्याद्वारे प्राप्त होणा-या तक्रारींचा निपटारा तात्काळ करणे शक्य होणार आहे.
Ø घनकचरा प्रक्रिया प्रकल्प :- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दररोज साधारणत: 750 मे.टन नागरी घनकचरा क्षेपणभूमीवर येत असतो. त्यामधील सुक्या कच-यावर प्रक्रिया करण्याकरिता 400 मे.टन क्षमतेचा व ओल्या कच-यावर प्रक्रिया करण्याकरिता 350 मे.टन क्षमतेचा असा एकूण 750 मे.टन क्षमतेचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहे. शहराची विद्यमान लोकसंख्या 18 लाखापेक्षा जास्त असून त्याकरिता पुढील 25 वर्षांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेची कोणत्याही प्रकारची भांडवली गुंतवणूक न करता केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमामार्फत 1130 TPD क्षमतेच्या बायोमिथनायजेशनसहित (CBG) अत्याधुनिक तंत्रज्ञानाने घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्याचे नियोजन आहे.
v ‘स्वच्छ सर्वेक्षण-2024’ अंतर्गत स्वच्छता विषयक आगामी उपक्रम :-
Ø सर्क्युलर इकोनॉमी देशव्यापी परिषदः नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत देशव्यापी सर्क्युलर इकोनॉमी परिषद आयोजित करण्याचे नियोजन आहे. ज्यामध्ये देशातील नावाजलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, केंद्रीय मंत्रालयीन अधिकारी, उद्योजक तसेच वैज्ञानिक यांना आमंत्रित करण्यात येणार असून ही परिषद स्वच्छ सर्वेक्षण 2024 मधील संकल्पनेला अनुसरुन असणार आहे.
Ø स्वच्छता पार्क 2.0:- कोपरखैरणे येथील स्वच्छता पार्कचा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कायापालट करण्याचे नियोजन करण्यात येत असून त्यामध्ये सद्यस्थितीत असलेल्या पोस्टर्स आणि बॅनर्स ऐवजी होलोग्राम तंत्रज्ञान व इतर अत्याधुनिक बाबींचा वापर करुन सदर पार्क अधिक सुसज्ज बनविला जाणार आहे.
Ø मिशन इनोव्हेशन (स्वच्छ संग्राम):- पारंपारिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी आणि नाविन्यपूर्णता (Innovation) आणण्यासाठी ‘मिशन इनोव्हेशन’ या उपक्रमास सुरुवात करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील सेंटर फॉर इन्नोव्हेशन ॲन्ड इन्क्युबेशन येथे प्रशिक्षण पुरविण्याचे योजिले आहे. याद्वारे प्रशिक्षित विद्यार्थी दैनंदिन जीवनातील अडचणींवर तांत्रिक उपाय देण्यास सक्षम होतील. विद्यार्थ्यांनी पुरविलेल्या संकल्पना, प्रोटोटाईप यांचे प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित करुन यातील सर्वोत्तम नाविन्यपूर्ण संकल्पना नवी मुंबई शहर स्तरावर अंमलात आणल्या जातील.
Ø स्वच्छश्री पुरस्कार:- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता विषयक कामांमध्ये व उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्ती / संस्था यांना ‘स्वच्छश्री’ पुरस्कार प्रदान करुन त्यांच्या कार्यास गौरविण्याचा व या माध्यमातून इतरांमध्ये स्वच्छता कार्याविषयी प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Ø रिसायकल ॲन्ड डाइन:- कच-याचा पुनर्वापर आणि घनकचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन देताना नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वंचित नागरिकांना अन्न उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामध्ये वंचित नागरिकांनी सुका कचरा गोळा करुन रिसायकल सेंटर्समध्ये द्यावा व त्या बदल्यात त्यांना सामाजिक संस्थांकडून त्या प्रमाणात मूल्य असणारे खाद्यपदार्थाचे कुपन उपलब्ध करुन देणे अशी संकल्पना आहे.
- उद्याने :-
Ø उद्यानांची सर्वसमावेशक देखभाल / दुरुस्ती :- उद्याने ही नागरिकांना विरंगुळा उपलब्ध करुन देणारी हक्काची ठिकाणे असल्याने त्यांची गुणवत्ता चांगली राखण्याकरिता 197 उद्याने, 252 रस्ता दुभाजक, ट्रीबेल्ट व मोकळया जागा यांच्या स्थापत्यविषयक व विदयुत विषयक बाबीं तसेच उदयानांची सुरक्षा यासह सर्वसमावेशक वार्षिक संवर्धन व संरक्षण करण्याकरिता एकत्रित कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे शहर स्वच्छ व सुंदर दिसेल तसेच नागरिकांचा उद्यान वापर अधिक आनंददायी होईल.
Ø वृक्ष लागवड :- मोरबे धरण क्षेत्रातील वडविहीर, बोरगांव व कोयना वसाहत परिसर तसेच सी.बी.डी., नेरुळ, वाशी, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या ठिकाणी विविध भारतीय प्रजातींचे नारळ, बकुळ, निम, काजू, कदंब, ताम्हण, सुपारी इ. अशी एकूण 42,800 वृक्ष लागवड करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत.
Ø उद्यानांचे नुतनीकरण :- नेरुळ विभागातील से. 18 येथील शांताराम भोपी उदयान, से. 11 मधील स्टेप गार्डन, से. 3 येथील चाचा नेहरु उदयान, से.11 येथील सरदार वल्लभभाई पटेल उद्यान, जुईनगर से.24, भू.क्र.1 येथील सार्वजनिक उद्यान, से.19 येथील स्व.आर.आर.पाटील उद्यान, तुर्भे विभागातील संत शिरोमणी तुकाराम महाराज उदयान, से. 7 सानपाडा उदयान, कोपरखैरणे से. 22 येथील उदयान, ऐरोली से. 10 मधील यशवंतराव चव्हाण उदयान इ. चे नुतनीकरण करणे, तसेच वाशी सेक्टर-10 स्वामी नारायण मंदिर ते जुहूगाव स्मशानभूमी असा ट्री बेल्ट विकसित करणे इ. कामे सन 2024-25 मध्ये आवश्यकतेनुसार हाती घेण्यात येणार आहेत.
Ø उद्यानांमध्ये खेळणी व इतर साहित्य बसविणे :- महानगरपालिकेच्या उदयानांमध्ये खेळणी व बेंचेस बसविणे व ओपन जीम साहित्य बसविणेकरिता तसेच सद्यस्थितीत असलेली खेळणी व ओपन जीम साहित्य नादुरुस्त झाल्यास त्याचे दुरुस्तीसाठी वार्षिक दरकराराद्वारे पॅनल तयार करण्यात आले आहे. त्या अंतर्गत सर्व उदयानांचे सर्वेक्षण करुन प्राधान्यानुसार उदयानांतील खेळणी व ओपन जीम साहित्य दुरुस्त करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
Ø माझी वसुंधरा अभियान :- माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध उपक्रमांतून वातावरणीय बदल व पर्यावरणाच्या समस्यांबद्दल नागरिकांना जागरुक करुन पर्यावरणाच्या सुधारणेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या अभियानाच्या 1.0, 2.0 व 3.0 अंतर्गत प्राप्त पारितोषिक रकमेतून उद्यान विभागामार्फत 25 कामे हाती घेण्यात आली असून यामध्ये शहरातील उदयानांचे सुशोभिकरण व नुतनीकरण हाती घेण्यात आले आहे.
Ø CSR निधीमधून सुशोभिकरण :- एम.आय.डी.सी. क्षेत्रातील 16 कंपन्यांना 25 ठिकाणचे रस्ता दुभाजक व चौक CSR निधीमधून सुशोभिकरण करण्याकरिता देण्यात येत आहेत.
- आरोग्य सुविधा :-
आरोग्य व्यवस्था सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने नागरिकांना अद्ययावत वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यासाठी नमुंमपामार्फत -
Ø रुग्णालये / नागरी आरोग्य केंद्रे बांधणे:- कोपरखैरणे विभागातील सेक्टर 22 येथील माता बाल रुग्णालय इमारतीच्या वाढीव मजल्याचे बांधकाम करणे प्रस्तावित आहे.
कोपरखैरणे सेक्टर 16 व महापे येथे PR 1 भूखंडावर नागरी आरोग्य केंद्र बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून ते नागरिकांच्या सेवेकरिता लवकरच उपलब्ध होईल.
घणसोली, सेक्टर 7, भूखंड क्रमांक 06 येथे नागरी आरोग्य केंद्र बांधण्याकरिता शासनाकडून मुलभूत सोयी सुविधांतर्गत निधी प्राप्त होणार आहे.
Ø MRI:- रुग्णांना अधिक प्रभावी तपासणीकरिता तसेच अत्यवस्थ रुग्णांच्या अचूक व योग्य निदानाकरिता MRI सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे.सद्यस्थितीत ही सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना खाजगी सेंटरमध्ये जाऊन MRI सुविधा उपलब्ध करुन घ्यावी लागते. ही सेवा काहीशी महागडी असल्याने रुग्ण त्या चाचणीस दिरंगाई करतात. त्यामुळे योग्य व अचूक निदानाकरिता नमुंमपाच्या रुग्णालयात MRI सुविधा बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित असून निविदा प्रक्रिया कार्यालयीन प्रणालीमध्ये आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षात सदर प्रणाली कार्यान्वित होईल.
Ø Modular OT:- नवी मुंबई महानगरपालिकेचे सार्वजनिक रुग्णालय, वाशी, नेरूळ, ऐरोली व माता बाल रुग्णालय, बेलापूर येथे उपचारार्थ येणाऱ्या रुग्णांना अद्ययावत उपचार सुविधा मिळावी याकरिता 12 Modular OT उभारणी करण्यात येत आहेत. या Modular OT मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तापमान व आर्द्रता नियंत्रित करण्याची व्यवस्था असते. यामध्ये बॅक्टेरिया व व्हायरस निरसीत होऊन शस्त्रक्रियेवेळी रुग्णांना संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होते तसेच विशेष अद्ययावत तंत्रज्ञान व उपकरणांमुळे शस्त्रक्रियेमध्ये अचूकता येते.
Ø नवीन प्रस्तावित N.I.C. / ई-हॉस्पिटल Module :- ई-हॉस्पिटल यंत्रणा कागद विरहीत (Paperless) असून यामध्ये QR Code द्वारे ‘आयुष्यमान भारत हॉस्पिटल क्रमांक’ (AABHA) प्रत्येक रुग्णासंदर्भात निर्माण केला जातो. त्याद्वारे रुग्णाच्या माहितीचे संकलन व जतन होते आणि भविष्यात त्या माहितीचा पुनर्वापर करण्यास मदत होते, याद्वारे रुग्णांच्या गर्दीचे नियोजन करण्यास मदत होते. तसेच रुग्णांची वैयक्तिक माहिती व आजार विषयक माहिती या आधारे त्यावर उपचार करण्यास किंवा इतर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यास फार उपयोग होतो. यातून रुग्ण व डॉक्टर इत्यादींचा वेळ वाचतो.
नमुंमपाच्या वाशी, ऐरोली आणि नेरुळ येथील महत्वाच्या रुग्णालयांमध्ये Module-II व बेलापूर, तुर्भे स्थित माता बाल रुग्णालये आणि मनपा हद्दीतील 24 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे येथे Module-I राबविण्याचे प्रस्तावित आहे.
Ø मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा:- नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयांमध्ये मायक्रोबायोलॉजी विभाग नसल्याने याबाबतच्या तपासण्या बाहेरून करून घेतल्या जातात. नवी मुंबई महानगरपालिकेची पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्था कार्यान्वित करण्याचे काम कार्यालयीन प्रणालीमध्ये असून त्यादृष्टीने रुग्णांना गुणात्मक व तात्काळ सेवा देण्याच्या अनुषंगाने मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा सार्वजनिक रुग्णालय, नेरूळ येथे सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
Ø पदव्युत्तर वैद्यकीय संस्था (Post Graduate Medical Institute):-
पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेच्या अनुषंगाने आवश्यक वैद्यकीय अधिकारी व इतर मनुष्यबळ तसेच वैद्यकीय उपकरणांसह विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सद्यस्थितीत Maharashtra University of Health Sciences, Nashik, (MUHS) यांचेकडून तपासणी (Inspection) झालेली आहे. तसेच National Medical Commission (NMC) न्यू दिल्ली यांचेकडून तपासणी (Inspection) बाबतची प्रक्रिया कार्यप्रणालीत आहे. ही तपासणी (Inspection) झाल्यानंतर सन 2024-25 मध्ये PG-Institute कार्यान्वित होईल.
सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यास PG-Institute च्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष सन 2024-25 पासून 05 वैद्यकिय शाखेकरीता अंदाजे 22 इतके विद्यार्थी पदव्युत्तर पदवी प्राप्त करुन घेऊ शकतील. त्यामुळे सदर संस्थेत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तज्ञ डॉक्टरांचा लाभ नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयीन सेवेसाठी होऊ शकेल.
Ø Mammography सुविधा :- नवी मुंबई महानगरपालिका सार्व. रुग्णालय, वाशी येथे Mammography सुविधा कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे. Mammography मुळे स्त्रियांमधील स्तनाचा कर्करोग प्राथमिक टप्प्यावर निदान होऊन तातडीने योग्य उपचार करणे शक्य होते व त्यामुळे मृत्यू होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते. त्या अनुषंगाने नमुंमपा रुग्णालयामध्ये बाहय यंत्रणेद्वारे (Out sourcing) / CSR मार्फत Mammography सुविधा सन 2024-25 पासून कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे.
Ø कॅथलॅब व ICU सुविधा :- नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयामध्ये हृदयविकाराचे रुग्ण उपचारार्थ येतात. अशा रुग्णांना कॅथलॅब सुविधा उपलब्ध नसल्याने इतरत्र संदर्भित करावे लागते. त्यामुळे हृदयविकार असलेल्या रुग्णांना तातडीने उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता सार्वजनिक रुग्णालय, ऐरोली येथे बाह्ययंत्रणेद्वारे कॅथलॅब व आयसीयू विभाग कार्यान्वित करणे प्रस्तावित आहे. सदर कॅथलॅब व आयसीयू सुरु केल्यास हृदयविकार असलेल्या रुग्णांची Angiopraphy करुन पुढील उपचार सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होईल.
- मालमत्ता(ESTATE):-
Ø दिव्यांग स्टॉल :-
दिव्यांग सन्मान योजनेअंतर्गत 330 पात्र लाभार्थ्यांना दिव्यांग स्टॉल वाटप करण्याची कार्यवाही सुरू आहे त्यापैकी 203 दिव्यांग लाभार्थ्यांना स्टॉलचा ताबा देण्यात आलेला आहे व उर्वरीत 127 दिव्यांग लाभार्थ्यांना स्टॉलचा ताबा देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.
Ø पार्किंग मोबाईल ॲप विकसित करणे :- वाहनतळाच्या जागा विकसीत करण्यात भर देणे, शक्य तेथे मल्टीलेयर पार्किंग उभारणे, नागरिकांना शहरामध्ये प्रवेश करतांना किंवा अंतर्गतरित्या पार्किंग कुठे उपलब्ध आहे याची माहिती सहजपणे ऑनलाईन उपलब्ध होण्यासाठी मोबाईल ॲप विकसीत करणे अशा विविध बाबी पार्किंग सुनियोजनासाठी करण्यात येत आहेत.
- दिव्यांगांकरितासेवासुविधा :-
Ø शीघ्र हस्तक्षेप केंद्र :- जन्माला येणारी जवळपास 10% मुले कोणत्या ना कोणत्या दिव्यांगत्वामुळे ग्रस्त असतात. या मुलांच्या दिव्यांगत्वाचे लवकरात लवकर निदान झाल्यास तसेच त्यांच्यावर तत्परतेने योग्य उपचार सुरू केल्यास दिव्यांगत्व कमी करण्याची त्यांना एक संधी प्राप्त होईल. यामुळे दिव्यांग मुलांची कार्यक्षमता वाढण्यास अथवा असलेल्या कार्यक्षमतेचा जास्तीत जास्त़ वापर करता येण्यास मदत होईल. तांत्रिक कारणांमुळे अशी केंद्रे सुरु करण्यामध्ये अडचण निर्माण झालेली होती, ती अडचण दूर करुन नमुंमपा क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर शीघ्र हस्तक्षेप केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.
Ø दिव्यांग काळजी केंद्र :- दिव्यांग मुलांच्या पालकांना तसेच पालकत्व धारण करणा-या व्यक्तींना त्यांच्या इतर दैनंदिन जबाबदा-या पार पाडण्यासाठी मदत व्हावी यादृष्टीने नमुंमपा कार्यक्षेत्रात प्रायोगिक तत्वावर दिव्यांग काळजी केंद्र सुरु करणे प्रस्तावित आहे.
- क्रीडाव सांस्कृतिक विकास :-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गुणवंत खेळाडू घडावेत याकिरात खेळांची मैदाने विकसित करणे, अत्यावश्यक सेवा सुविधांवर भर देणे, प्राविण्यप्राप्त खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देणे तसेच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रशुध्द प्रशिक्षण देणे यावर भर देण्याचे नियोजन आहे.
Ø तरण तलाव सुविधा :-
से.12 वाशी येथे इनडोअर स्टेडियम व बस स्थानक यांचे काम सुरु असून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव उभारण्यात येत आहे. सदरचे काम बहुतांशी पूर्ण झालेले असून जून 2024 पर्यंत लोकार्पण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे खेळाडूंना पोहण्याची दर्जेदार सुविधा मिळणार आहे. यामुळे खेळाडू घडण्यास मोलाचा हातभार लागणार आहे.
Ø उड्डाणपूलाखालील क्रीडा सुविधा :- नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सानपाडा येथील उड्डाणपुलाखाली नागरिकांकरिता बॅडमिंटन कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, बॉक्स क्रिकेट पीच, रोलर स्केटिंग रिंग इ. अशा आवश्यकता लक्षात घेऊन बनविण्यात आलेल्या क्रीडा सुविधांप्रमाणे कोपरखैरणे, सेक्टर 1 ए महापे ब्रीजखाली तसेच नेरुळ येथील एल ॲन्ड टी ब्रीजखाली नागरिकांकरिता क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या क्रीडा सुविधा डिसेंबर 2024 पर्यंत उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
Ø घणसोली क्रीडा संकुल :- घणसोली, सेक्टर 13 मधील भूखंड क्रमांक 1 येथे क्रीडा संकुल विकसीत करण्याचे नियोजन असून पहिल्या टप्प्यामध्ये जागेचे सपाटीकरण करणे, कुपण भिंत बांधणे, प्रवेशव्दारे बांधणे, शौचालय बांधणे तसेच आवश्यकतेप्रमाणे वृक्षारोपण करणे इ. कामे हाती घेण्यात येणार असून 28 एकरामध्ये विविध प्रकारचे क्रीडाप्रकार सुरु करण्याचे नियोजन आहे.
Ø कुस्तीचे मैदान :- सानपाडा, सेक्टर 4 ए येथील मैदानात तसेच कोपरखैरणे, सेक्टर 4 ए येथील भूखंड क्रमांक 1 वरील मैदानात कुस्ती आखा़डा बांधण्याचे नियोजन सन 2024-25 या वित्तीय वर्षामध्ये करण्यात आलेले आहे.
- समाजविकास:-
Ø महिला व बालकल्याण घटकांतर्गत प्रस्तावित योजना :- नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील वय वर्ष 11 व त्यापुढील किशोरवयीन गटातील मुलींना HPV कॅन्सर प्रतिबंधक लस देणे.
न.मुं.म.पा. कार्यक्षेत्रातील महिलांकरिता स्वतंत्र उदयान / मैदान उपलब्ध करुन देऊन त्याठिकाणी वेगवेगळया सुविधा देणे. (जीम, जॉगींग ट्रॅक, योगा सेंटर, ॲम्फीथिएटर व उपहारगृह इ.)
Ø आदिवासी घटकांकरिता विविध कल्याणकारी योजना :- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोपरखैरणे येथील कातकरीपाडा येथे आदिवासी घटकांसाठी घरकुल योजना राबविणे प्रगतीपथावर असून त्यामुळे 59 आदिवासी कुटुंबियांना पक्की घरे उपलब्ध होणार असून त्याठिकाणी अंगणवाडी / समाजमंदिर या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
Ø इतर घटक :- नमुंमपा कार्यक्षेत्रातील खुला प्रवर्ग, आर्थिक दुर्बल, इतर मागासवर्ग युवक/युवतींना विविध कौशल्यपर व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य देणे. (वाहन चालविणे, संगणक, टायपिंग व लघुलेखन, हॉटेल मॅनेजमेंट, एअर होस्टेस, पोलीस भरती, एम.पी.एस.सी व यू.पी.एस.सी. प्रशिक्षण इ.)
इयत्ता 10 वी / 12 वी मधील विदयार्थ्यांकरिता तज्ञ शिक्षकामार्फत मार्गदर्शन शिबीर आयोजित करणे.
Ø तृतीयपंथीयांसाठी विविध योजना :- संसाधन केंद्र उभारणे. (कायदेविषयक सल्ला, समुपदेशन, छंद वर्ग, प्रशिक्षण, मनोरंजन कार्यक्रम इ.)
Ø व्यावसायिक प्रशिक्षण:- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील युवक – युवतींना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विविध 41 प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण दिले जात असून ते आगामी वर्षातही सुरु ठेवून त्यामध्ये सद्यस्थितीचा विचार करुन रोजगार उपलब्ध होईल अशा प्रकारच्या प्रशिक्षण विषयांची वाढ करणे प्रस्तावित आहे. त्यासोबतच त्यांच्या कौशल्य विकासाकडेही विशेष लक्ष देण्याचे नियोजन आहे.
- अग्निशमन विभाग :-
अग्निशमन वाहन खरेदी :-
Ø 68 मीटर उंचीचे टर्न टेबल लॅडर वाहन माहे सप्टेंबर-2024 पर्यंत प्राप्त होणे अपेक्षित असून याचा वापर आग विझवणे व रेस्क्यू करणे यासाठी होणार आहे.
Ø सध्या नमुंमपा क्षेत्रात High Rise इमारतींचे प्रमाण वाढत असून त्यादृष्टीने लहान रस्त्यांवरील उंच इमारतीतील अग्निविमोचनासाठी 32 मीटर उंचीचे टर्न टेबल लॅडर वाहन आणि High Rise Building Fire Fighting Vehicle अशी दोन वाहने खरेदी करणे प्रस्तावित आहे.
Ø मोठया आगीवर नियंत्रण करण्याकरिता तसेच रासायनिक कारखाने यांची आग विझविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विदेशी बनावटीचे Water Mist Turbine System वाहन खरेदी करणे प्रस्तावित आहे. हे वाहन पेट्रोल पंप, गोडाऊन, गॅस स्टेशन व बाजार क्षेत्रात लागणा-या मोठया प्रमाणाच्या आगीवर तात्काळ नियंत्रण करण्याकरिता उपयोगी आहे. तसेच हवेतील धुळीवर नियंत्रण करण्याकरिता देखील उपयोगी आहे.
- शिक्षण सुविधा:-
Ø नवीन शाळा सुरु करणे :- यादवनगर येथे झोपडपट्टी भागात तळ + 3 मजल्याची सर्व सुविधायुक्त 28 खोल्यांची शाळा बांधण्याचे काम पूर्ण झालेले असून पुढील शैक्षणिक वर्षात त्याठिकाणी शाळा सुरु कऱण्याचे नियोजन आहे.
Ø e - RUPEE :- शैक्षणिक वर्षे 2024-25 पासून शिक्षण विभागातील DBT योजनेऐवजी National Payment Corporation of India (NPCI) यांचा माध्यमातून बँकेकडील QR Code वर आधारित अभिनव e - RUPEE प्रणाली निश्चित दरानुसार राबविण्यात येणार आहे. सदर प्रणालीनुसार विद्यार्थ्यांनी खरेदी केलेल्या वह्या, ऑल सिजन बूट/मोजे, दप्तर, रेनकोट इत्यादींच्या QR कोडनुसार तात्काळ रक्कम अदा करण्याचे प्रस्तावित आहे. सदर योजनेमुळे खरेदी केलेल्या वस्तूची रक्कम तात्काळ अदा केली जाणार असून, प्रत्यक्ष वस्तू खरेदीची खातरजमा करणे सोपे होणार आहे. तसेच त्याबाबतचा तपशील तात्काळ उपलब्ध होणार आहे. या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना रु.19.50 कोटीचा लाभ देणे अपेक्षित आहे.
Ø संगीत शिक्षण :- विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी प्रायोगिक तत्वावर आधुनिक सुविधांसह संगीत, गायन, वादन शिकविणेबाबतचा उपक्रम प्रस्तावित करण्यात येत असून याचा लाभ साधारणत: 1000 विद्यार्थ्यांनी घेणे अपेक्षित आहे.
Ø कृत्रिम बुध्दिमत्ता प्रयोगशाळा (Artificial Intelegence Lab) :- आजचा शैक्षणिक प्रगतीचा वेग लक्षात घेता नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान हे अभ्यासक्रमाचा भाग असणे ही काळाची गरज बनली आहे. त्यादृष्टीने सोलर ऑपरेटेड रोबोटिक्स कोडिंग आर्टिफिशीअल इंटेलिजेन्स प्रयोगशाळा ही प्रत्येक शाळेमध्ये असणे आवश्यक आहे. त्यामुळे आधुनिक ज्ञान प्रात्यक्षिकासह प्राप्त करून घेणे सोपे होणार आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या एकूण 78 प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ‘महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजना’ अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या 500 लक्ष निधीमधून ‘सोलर ऑपरेटेड रोबोटिक्स कोडिंग आर्टिफिशीअल इंटेलिजेन्स प्रयोगशाळा’ प्रस्तावित करण्यात येत आहे.
Ø डिजीटल हजेरी:- नमुंमपा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची हजेरी डिजीटल ओळखपत्राद्वारे घेण्याचे प्रस्तावित आहे. सदर पध्दतीद्वारे विद्यार्थ्यांचे Tracking करणे व प्रत्यक्ष हजर विद्यार्थ्यांची अचूक संख्या निश्चित होऊन त्याद्वारे इतर विविध योजना योग्यप्रकारे राबविणे शक्य होणार आहे.
Ø समाज माध्यमातून जनजागृती :- नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ आणि लैंगिक शिक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी समाज माध्यमांचा सुयोग्य वापर करुन विशेष कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- आपत्ती व्यवस्थापन विभाग :-
Ø आपत्ती प्रतिसाद पथक निर्मिती :- राष्ट्रीय व राज्य प्रतिसाद (NDRF व TDRF) पथकाच्या धर्तीवर नमुंमपाचे ‘आपत्ती प्रतिसाद पथक’ निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे. या पथकाकडे विविध आपत्तींमध्ये उपयोगात आणण्याकरिता अद्ययावत यंत्रसामुग्री असलेले वाहन (रेस्क्यू वाहन) खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे.
- अतिक्रमणविभाग :-
Ø समर्पित पोलीस ठाणे :- अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण निर्मुलनासाठी नवी मुंबई महानगरपालिका (क वर्ग ) क्षेत्रात पोलीस आयुक्त कार्यालयाशी संलग्न ‘समर्पित पोलीस ठाणे’ स्थापन करण्याची बाब प्रक्रियेत आहे.
Ø नागरिकांची जनजागृती :- नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात होत असलेल्या अनाधिकृत बांधकाम / अतिक्रमणांवर नागरिकांनी सदनिका/वाणिज्य गाळे खरेदी करू नये याबाबत खबरदारी म्हणून तसेच नागरिकांची फसवणूक होऊ नये याकरिता अनाधिकृत बांधकाम / अतिक्रमणाची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर व वर्तमानपत्रात दरमहा प्रसिद्ध करण्यात येते. तसेच अनाधिकृत बांधकाम /अतिक्रमित असलेल्या इमारतीच्या दर्शनी भागात फलक लावून नागरिकांची जनजागृती करण्यात येणार आहे.
- गतीमान प्रशासन :-
Ø ई-ऑफिस :- गतीमान व लोकाभिमुख प्रशासनाच्या अंमलबजावणीकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभाग / कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. ई-ऑफिस प्रणालीमुळे संगणकाचा अधिकाधिक वापर करून प्रशासकीय कामकाज हे अधिक गतीमान आणि कागदविरहीत (पेपरलेस) होईल. सर्व कार्यालये ई-ऑफिस प्रणालीचा वापर करुन आपल्या फाईल्स डिजिटल स्वरुपात पदानुक्रमाने सादर करतील व त्यावर पदानुक्रमे अधिकाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरी होईल. त्यामुळे विविध सेवा/सुविधा या नागरिक/लाभार्थी यांना विनाविलंब मिळणे शक्य होईल. सदर प्रणालीद्वारे कामकाजाच्या फाईल्स़, कागदपत्रे कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईन पाहता येणे शक्य होणार असल्याने संबंधितांना विविध सेवा/सुविधा जलदगतीने व पारदर्शकपणे उपलब्ध़ होऊन कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता येण्यास मदत होईल, तसेच सर्व दस्त़ऐवज सुरक्षित राहतील.
**********
* नवी मुंबई शहराने आजवरच्या वाटचालीत दूरगामी विचार करत नाविन्यपूर्ण प्रकल्प, उपक्रम राबविलेले असून उत्तमाचा ध्यास घेऊन विविध क्षेत्रात काम केले आहे. त्यामुळे विकासाच्या भरीव क्षमता असणारे व त्यादृष्टीने ठाशीव वाटचाल करणारे शहर म्हणून नवी मुंबईकडे राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरून विश्वासाने पाहिले जाते.
* हा विश्वास आजवरच्या सातत्यपूर्ण कामगिरीतून नवी मुंबई महानगरपालिकेने टिकवून ठेवलेला आहे. यामध्ये येथील सुजाण, जागरूक नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा राहिला आहे.
* शहराच्या प्रगतीसाठी कोणत्याही लोकोपयोगी कामात सेवाभावी वृत्तीने सहभागी होणारे नागरिक हे नवी मुंबई शहराचे बलस्थान असून नागरिकांना अभिप्रेत असणाऱ्या सुविधापूर्तीकरिता नवी मुंबई महानगरपालिका कटिबद्ध राहून काम करीत आहे.
* त्यामुळे याही वर्षी अर्थसंकल्पीय अंदाजात कोणत्याही प्रकारची करवाढ न करता नागरिकांना दिलासा देतानाच शहर विकासाला नवी गती लाभेल अशा अनेक प्रकल्पांचा, कामांचा अर्थसंकल्पीय अंदाजात अंतर्भाव करण्यात आलेला असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आलेले आहे.
* जनतेच्या मताला प्रधान्य देण्याची भूमिका जपत अर्थसंकल्पीय अंदाज निर्मितीमध्ये नागरिकांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश असावा यादृष्टीने नागरिकांकडून शहर विकासाला हातभार लावणाऱ्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. या आवाहनाला चांगला प्रतिसाद लाभला. नागरिकांकडून प्राप्त सूचनांमधील सुयोग्य सूचनांचा अंतर्भाव या अर्थसंकल्पीय अंदाजात करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा 'लोकाभिमुख अर्थसंकल्पीय अंदाज' आहे हे सांगताना मला विशेष आनंद होत आहे.
* नवी मुंबईची 'निवासयोग्य उत्तम शहर' ही प्रतिमा अधिकाधिक उंचावण्यासाठी शहर विकासाला गती देणारे प्रकल्प राबविण्यासोबतच उत्पन्न वाढीवर भर देणारा, गतीमान प्रशासनासाठी उपाययोजना करणारा तसेच
आरोग्य सुविधांची क्षमतावृद्धी,
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या शैक्षणिक संकल्पनांचा प्रभावी वापर,
भविष्याचा दूरगामी विचार करून नव्या जलस्त्रोतांचा शोध,
पार्किंग समस्या सोडवणुकीसाठी ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी,
स्वच्छता कार्यात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आणखी व्यापक लोकसहभागावर भर देत 'निश्चय केला - नंबर पहिला' हे ध्येय साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध आखणी,
पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने अभिनव उपक्रमांचे - कामांचे नियोजन,
लोककल्याणकारी योजनांमध्ये सर्वसमावेशक व्यापकता
- अशा विविध माध्यमांतून नवी मुंबईकर नागरिकांना अधिक उत्तम सुविधा आणि पर्यावरणशील वातावरण पुरविण्यासोबतच नवी मुंबईच्या नावलौकिकात अधिक भर घालणारे काम करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आलेले आहे.
* या अर्थसंकल्पीय अंदाजात नवी मुंबई शहरातील बालके, विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथीय, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल अशा सर्वच समाज घटकांच्या कल्याणाचा साकल्याने विचार करण्यात आलेला आहे.
* त्यामुळे या सर्वस्पर्शी अर्थसंकल्पीय अंदाजाचे स्वागत येथील लोकप्रतिनिधी, संस्था, मंडळे, नागरिक व प्रसारमाध्यमे अशा सर्वांकडून होईल आणि या अर्थसंकल्पीय अंदाजात मांडलेल्या बाबींच्या पूर्ततेसाठी महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उत्साहाने कटिबद्ध राहून काम करतील हा विश्वास.
* नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2024 - 25 चे हे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करण्यासाठी महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच सर्व विभागप्रमुख यांनी अत्यंत महत्त्वाचे योगदान दिलेले आहे.
* मागील वर्षामधील अंदाजपत्रकात असलेल्या अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत प्रत्यक्षात प्राप्त झालेल्या उत्पन्नाचा साकल्याने विचार करून नवी मुंबईकर नागरिकांच्या संकल्पनेतील शहर आकारास यावे याकडे हे अंदाजपत्रक सादर करताना विशेष लक्ष देण्यात आलेले आहे.
मागील उद्दिष्टपूर्ती करणारे, आरंभीची शिल्लक रु.1547.60 कोटी व जमा रु.3238.58 कोटी अशी मिळून एकत्रित जमा रु.4786.18 कोटी आणि रु.3408.50 कोटी खर्चाचे सन 2023-24 चे सुधारित अंदाज.
तसेच रु.1377.68 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह रु.4950.00 कोटी जमा व रु.4947.30 कोटी खर्चाचे आणि रु.2.70 कोटी शिलकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2024-25 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज मंजूर करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी घोषित केले.
Published on : 21-02-2024 05:46:44,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update