मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात विविध कार्यक्रमांतून नवी मुंबई महानगरपालिका करणार मराठी भाषा जागर
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने जारी केलेल्या 19 डिसेंबर 2023 रोजीच्या परिपत्रकानुसार 14 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत संपूर्ण राज्यभरात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. त्यास अनुसरून साहित्यप्रेमी महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून मान्यवरांच्या व्याख्यानांसोबत अधिकारी, कर्मचारीवृंदामधील मराठी साहित्यप्रेमाला वाव देत नानाविध स्पर्धा उपक्रम संपन्न होत आहेत.
या कार्यक्रमांतून संपन्न मराठी भाषेचा प्रचार – प्रसार व्हावा तसेच कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर व्हावा अशाप्रकारे पंधरवडा कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवार, 15 जानेवारी रोजी सुप्रसिध्द साहित्यिक, व्याख्याते प्रा.प्रवीण दवणे यांच्या ‘मायबोली मराठी’ या विषयावर उपस्थितांशी ह्रदयसंवादाने होणार असून सकाळी 11 वा. नमुंमपा मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
मंगळवार, 16 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक, नाटककार आणि ललित लेखक श्री. प्रल्हाद जाधव यांचे कार्यालयीन कामकाजात मराठीचा वापर या अनुषंगाने ‘वाणी, भाषा, लेखणी… (शासकीय कामकाजातील यशाची त्रिवेणी)’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार, 19 जानेवारीला सायं, 4 वा. लेखक, निवेदक डॉ. मृण्मयी भजक या ‘अमेरिका खट्टी मीठी’ या नाट्य अभिवाचनात्मक कार्यक्रमातून मराठी चष्म्यातून आंबटगोड अमेरिकेची सफर घडविणार आहेत.
या सोबतच नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांचा मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांत प्रत्यक्ष सहभाग असावा यादृष्टीने त्यांच्याकरिता 3 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पहिला स्पर्धा उपक्रम मंगळवार, 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून राबविला जात असून यावर्षी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नमुंमपा अधिकारी - कर्मचारी यांची ‘माझे संविधान माझा अभिमान’ या विषयावर ‘वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये 5 मिनिटे कालावधीत आपले विचार मांडायचे आहेत.
याशिवाय दुस-या स्पर्धा उपक्रमांतर्गत मराठी कवितेचा समृद्ध वारसा नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून वाचला जावा व त्यामधील आवडलेल्या कवितेचे त्यांनी सादरीकरण करावे यादृष्टीने गुरूवार, 25 जानेवारी रोजी 'परकाव्यवाचन स्पर्धा' आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये नमुंमपा अधिकारी, कर्मचारीवृंदाने स्वतःच्या नव्हे तर इतर कवींच्या आवडत्या कवितेचे सादरीकरण करणे अपेक्षित आहे.
याशिवाय नुकताच नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये तांत्रिकदृष्टया व्दितीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त केलेला असून महाराष्ट्र शासनच्या ‘माझी वसुंधरा अभियाना’तही नवी मुंबई ‘क’ वर्ग महानगरपालिकांमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. या अनुषंगाने नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांच्यामधील प्रतिभेला संधी मिळावी यादृष्टीने 'स्वच्छ नवी मुंबई / पर्यावरणशील नवी मुंबई' या विषयावर ‘घोषवाक्य / चारोळी लेखन स्पर्धा’ आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धा सहभागाकरिता नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी 22 जानेवारीपर्यंत दिलेल्या विषयावर जास्तीत जास्त 3 घोषवाक्य / चारोळी एका कागदावर लिहून 22 जानेवारीपर्यंत नमुंमपा माहिती व जनसंपर्क विभागात द्यावयाच्या आहेत. वक्तृत्व व परकाव्यवाचन स्पर्धा सहभागाकरिताही 22 जानेवारीपर्यंत तिथेच नाव नोंदणी करावयाची आहे. याबातच्या अधिक माहितीसाठी 9930020814 अथवा 8169812997 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे सूचित करण्यात आलेले आहे.
कोणत्याही कामात व उपक्रमांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आघाडीवर राहिली असून मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील कार्यक्रमही नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनव प्रकारे आयोजित करण्यात आलेले आहेत. हे कार्यक्रम रसिक म्हणून अनुभवण्यासाठी नवी मुंबईकर नागरिकही श्रोते म्हणून सहभागी होऊ शकतात, त्यांचे स्वागत असेल असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 12-03-2024 12:05:01,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update