स्वच्छ तीर्थ मोहीम अंतर्गत नवी मुंबईतील मंदिर स्वच्छता मोहिमेत आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्यासह अधिका-यांचा सहभाग
शहर स्वच्छतेला अधिक गतीमानता व प्रभावीपणा प्राप्त करुन देणा-या मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील सखोल स्वच्छता मोहीम नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यास सुरुवात झाली असून याबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत सूचित केल्याप्रमाणे नमुंमपा आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांनी आज स्वच्छ तीर्थ मोहीम अंतर्गत प्रार्थनास्थळांच्या स्वच्छतांतर्गत वाशी व कोपरखैरणे विभागातील प्रसिध्द मंदिरांना भेटी देऊन स्वच्छता मोहीमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला व काटेकोरपणे संपूर्ण स्वच्छता करण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरिष आरदवाड सहभागी झाले. तसेच जागृतेश्वर शिव मंदिर, सेक्टर-6, वाशी येथे माजी नगरसेवक श्री. दशरथ भगत व श्रीम. फशीबाई भगत आणि देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य त्याचप्रमाणे कोपरखैरणे विभागातील पावणेश्वर मंदिर परिसराच्या स्वच्छतेत माजी नगरसेवक श्री. शशिकांत भोईर आणि मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. त्यासोबतच या मोहीमेत आपापल्या क्षेत्रात वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री.सागर मोरे व त्यांचे कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकर्मी तसेच कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री.सुनिल काठोळे व त्यांचे कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकर्मी सहभागी झाले होते.
यावेळी मंदिर व्यवस्थापन पदाधिका-यांशी संवाद साधत आयुक्तांनी त्यांस मंदिराच्या अंर्तगत व बाह्य स्वच्छतेचे महत्त्व सांगितले तसेच मंदिराचे वातावरण पवित्र राखण्यासाठी स्वच्छतेची गरज अधोरेखित केली. या मोहीमेच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने मंदिर व परिसर स्वच्छतेत पुढाकार घेतला असला तरी या पुढील काळात अशा प्रकारची स्वच्छता नियमितपणे राखली जाईल याकडे मंदिर व्यवस्थापनाने काळजीपूर्वक लक्ष देण्याची अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली. तसेच सर्व धार्मिक स्थळांना टाकाऊपासून टिकाऊ संपत्ती तयार करण्यासाठी प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीने फुले, प्रसाद अशा निर्माल्याची पावित्र्य राखून विल्हेवाट लावावी व थ्री आर तत्वांचे पालन करावे असेही आवाहन आयुक्तांनी केले. त्याचप्रमाणे 20 व 21 तारखेला नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मंदिरावर तेथील व्यवस्थापनामार्फत विद्युत रोषणाई केली जाईल याकडे महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयांनी लक्ष दयावे असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
नवी मुंबईचा स्वच्छ शहर नावलौकिक वाढविण्यामध्ये मंदिरे व प्रार्थनास्थळे यांची स्वच्छता हा एक महत्त्वाचा घटक असून महापालिका आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांनी या स्वच्छता मोहिमेत स्वत: सहभागी होत प्रार्थना स्थळांचे स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे तसेच सर्वांचा उत्साह देखील वाढविला आहे.
Published on : 14-03-2024 11:54:03,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update