राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेत सामुहिक मतदार प्रतिज्ञा ग्रहण
भारत निवडणूक आयोग यांचेमार्फत प्राप्त निर्देशानुसार 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात राष्ट्रीय मतदार दिवसाची सामुहिक प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आली. जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असणा-या भारत देशात मतदानाचे महत्व अधोरेखीत करणा-या मतदार दिवसाचे औचित्य साधून नमुंमपा निवडणूक विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जागृतीविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटरच्या एलईडी स्क्रीनवर दिवसभर मतदार जनजागृतीविषयक विविध चित्रफितींचे प्रसारण करण्यात आले. ठिकठिकाणी बॅनर्स, होर्डींग, स्टँडी प्रदर्शित करण्यात आले. त्याचप्रमाणे ज्ञानकेंद्रात अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्यासमवेत मोठ्या संख्येने उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी सामुहिकरित्या मतदार प्रतिज्ञा ग्रहण केली. यावेळी प्रशासन व निवडणूक विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त श्रीम. ललिता बाबर, भांडार विभागाच्या उपआयुक्त श्रीम. मंगला माळवे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी श्रीम. अरूणा यादव, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखून व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वेश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडाता मतदान करू – अशा आशयाची प्रतिज्ञा उपस्थितांनी ग्रहण केली.
25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली असून 2011 पासून 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही या दिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
Published on : 18-03-2024 12:14:06,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update