परकाव्यवाचन स्पर्धेतून मराठीतील समृध्द काव्यपरंपरेचे नवी मुंबई मनपा कर्मचा-यांनी घडविले दर्शन
मराठी कवितेला अतिशय समृध्द अशी परंपरा असून त्याचे मनोहारी दर्शन नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारीवृंदाने परकाव्यवाचन स्पर्धेतून घडविले. यामध्ये प्रत्येकाने आपल्या आवडत्या कवितेचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे प्रत्येक स्पर्धकाची निवड वेगळी होती. स्पर्धेत सादर करण्यासाठी कविता निवडताना कर्मचा-यांना अनेक कवितांचे वाचन करावे लागले असेल. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून मराठी कवितेचे वैभव कर्मचा-यांनी अनुभवले, हे या स्पर्धेचे यश असल्याचे मत स्पर्धा परीक्षणानंतर आपले मनोगत व्यक्त करताना परीक्षक, कवी श्री. मोहन काळे यांनी व्यक्त केले. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या हस्ते परीक्षकांचा सत्कार करण्यात आला.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून 14 ते 28 जानेवारी या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषेचा गौरव वाढविणारे तसेच भाषेची आवड निर्माण करणा-या विविध उपक्रमांचे आयोजन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. त्यामध्ये परकाव्यवाचन स्पर्धा हा एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यात नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या आवडत्या कवितेचे सादरीकरण करणे अपेक्षित होते.
त्यास अनुसरून 32 कर्मचा-यांनी यामध्ये सहभागी होत आपल्या आवडत्या कवीची पसंतीची कविता सादर केली. संत, पंत, तंत काव्यापासून ते आधुनिक कवितेपर्यंतचा प्रवास या सादरीकरणातून उलगडला. विशेष म्हणजे स्पर्धा असूनही इतरांच्या सादरीकरणाला कर्मचारी रसिक म्हणून उत्स्फुर्त दाद देत होते. त्यामुळे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही परकाव्यवाचन स्पर्धा पार पडली. कवितांना मिळणारी दाद ही मान्यवर कवींच्या कवितेतील शब्दकळेला होतीच, तितकीच ती कविता सादर करणा-या कर्मचा-यांच्या सादरीकरणालाही होती असे निरीक्षण कवी श्री. मोहन काळे यांनी आपल्या मनोगतात नोंदविले. त्यांनीही काही मान्यवर कवींच्या कवितांचे सादरीकरण केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका इतर कोणत्याही शासकीय संस्थांपेक्षी अत्यंत वेगळे व अभिनव उपक्रम राबवित असून विशेष म्हणजे त्यामध्ये अधिकारी, कर्मचा-यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो ही कौतुक करण्यासारखी व समाधान देणारी गोष्ट असल्याचे मत परीक्षक कवी श्री. मोहन काळे यांनी व्यक्त केले.
Published on : 18-03-2024 12:20:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update