मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात नवी मुंबई महापालिका कर्मचा-यांचा मराठी भाषा गजर
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महापालिका आयुक्त् श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकारी,कर्मचारी वृंदासाठी मराठी भाषा विषयक विविध उपक्रमांचे आयोजन केले असून या स्पर्धात्मक उपक्रमांना मिळालेला उत्तम प्रतिसाद मराठी भाषा प्रेमाची महती दर्शविणारा असल्याचे मत व्यक्त करीत अतिरिक्त् आयुक्त् श्रीम. सुजाता ढोले यांनी नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांच्या मनात असलेले मराठी भाषा प्रेम व अभिमान यामुळेच प्रत्येक कार्यक्रमाला व स्पर्धात्मक उपक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळाला याबद्दल कर्मचारीवृंदाचे कौतुक केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध स्पर्धात्मक उपक्रमांचा पारितोषिक वितरण सोहळा अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपआयुक्त श्रीम. ललिता बाबर, भांडार विभागाच्या उपआयुक्त श्रीम. मंगला माळवे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी श्रीम. अरूणा यादव, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार 14 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्यपूर्ण आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिध्द साहित्यिक प्रा.प्रवीण दवणे यांच्या मायबोली मराठी या विषयावरील व्याख्यानाने शुभारंभ झालेल्या पंधरवड्याच्या उपक्रमात साहित्यिक, भाषा अभ्यासक श्री. प्रल्हाद जाधव यांचे भाषाविषयक व्याख्यान, लेखिका निवेदिका डॉ. मृण्मयी मगदूम यांचे ललितगद्यात्मक अभिवाचन अशा कार्यक्रमांसोबतच अधिकारी, कर्मचारी यांच्यामधील साहित्य, कला गुणांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यामधील ‘वक्तृत्व स्पर्धा’ ही भारतीय संविधानाच्या विद्यमान अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘माझे संविधान – माझा अभिमान’ या विषयावर आयोजित करण्यात आली होती. संविधान अभ्यासक ॲड. निलेश खानविलकर यांनी स्पर्धा परीक्षण केले. सहभागी स्पर्धकांमधून नारायण लांडगे यांना प्रथम तसेच अभय जाधव यांना व्दितीय आणि उज्वला खैरनार यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. वैजनाथ कळसे, बाबुराव इंगळे, मधुकर वारभुवन यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मानीत करण्यात आले.
‘परकाव्यवाचन’ स्पर्धेत पुष्पांजली कर्वे यांनी प्रथम क्रमांक तसेच अरूणा यादव यांनी व्दितीय आणि चित्रा बाविस्कर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. त्याचप्रमाणे स्मिता ठेंगळे, रूपाली घोडके, पुजा जोशी, मधुकर वारभुवन व स्वप्निल मोरे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केली.
‘स्वच्छ नवी मुंबई / पर्यावरणशील नवी मुंबई’ या विषयावरील ‘घोषवाक्य / चारोळी लेखन’ स्पर्धेत चंद्रसेन विश्वासराव यांनी प्रथम क्रमांक संपादन केला. धनपाल तांबे यांनी व्दितीय तसेच भूषण जयसिंगपुरे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. क्रांती म्हात्रे, दत्तात्रय माने, शैलजा विचारे, विश्वेश्वर देशपांडे, प्रशंसा राणे उत्तेजनार्थ पारितोषिकांचे मानकरी झाले. परकाव्यवाचन तसेच घोषवाक्य / चारोळी लेखन स्पर्धेचे परीक्षण कवी श्री. मोहन काळे यांनी केले.
नमुंमपा 32 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संगीत खुर्ची स्पर्धेतील विजेत्या महिला योगिता डुंबरे, कार्तिकी वाडकर व रुपाली वानिवडेकर यांना अनुक्रमे तीन क्रमांकाची पारितोषिके प्रदान करण्यात आली.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने नमुंमपा अधिकारी, कर्मचारी मराठी साहित्य वाचनाकडे नव्याने वळले आणि यातून मराठी भाषेचा जागर झाला.
Published on : 18-03-2024 12:46:21,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update